आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादी शेळीच्या दुधाचा साबण देतोय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आधार; 250 कुटुंबे झाली आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'आत्महत्यामुक्त महाराष्ट्रा'साठी कृषी पदवीधारक विनायक हेगाणा या तरुणाचा उपक्रम
  • नीती आयोगाकडून दखल, भारत सरकार अटल इनोव्हेशनअंतर्गत करण्यात आली संकल्पनेची निवड

​​​​​​औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांनी व्यथित झालेल्या विनायक हेगाणा नावाच्या तरुणाने आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून त्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक बळ मिळावे यासाठी उस्मानाबादी शेळीच्या दुधापासून साबण बनवण्याचे मॉडेल विकसित केले आहे. त्याचे पेटंटही त्यांच्याकडे आहे. उस्मानाबादी शेळीपालन, शेळीच्या दुधाची विक्री, त्यापासून साबण निर्मिती व विक्री यातून सध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील २५० हून जास्त शेतकरी कुटुंंबांना समृद्धीचा सुगंध मिळाला आहे. या संदर्भात विनायक हेगाणा यांनी सांगितले की, शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याचे कुटूंब उघड्यावर पडते. या कुटूंबाला आर्थिक बळ देण्याच्यादृष्टीने उस्मानाबादी शेळीचा विचार मनात आला. त्यातून शिवार नॅचरल्सची स्थापना केली. या उस्मानाबादी शेळीच्या दुधात सेलेनियम नावाचा घटक असतो हे लक्षात आले. त्याचा अधिक अभ्यास केला. या दुधापासून साबणनिर्मिती केली, त्याचे पेटंट मिळवले. सेंद्रीय पद्धत आणि कर्करोग प्रतिबंधक गुण यामुळे या साबणाला जगभर मागणी आहे.हे साबण आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांसाठी आर्थिक स्वावलंबाचे कारण ठरू शकते हा विचार समोर आला. हेच मॉडेल उस्मानाबाद जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त कुटूंबासाठी वापरत आहोत. यात पुण्याच्या रोटरी क्लब पासून अनेक सामाजिक संस्थांची मदत झाली.

असे आहे सोप मॉडेल 

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला उस्मानाबादी शेळीपालनास देणे, दूध काढणे, दुधापासून साबण तयार करणे व विक्री करणे ही सर्व कामे त्या कुटुंबाने करणे व त्यापासून उत्पन्न मिळवणे असे या मॉडेलचे स्वरूप आहे. शिवार सोप नावाने हे साबण अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. कॅन्डूला(रानफूल), दालचिनी आणि चारकोल अशा तीन प्रकारात उस्मानाबादी शेळीच्या दुधाचा साबण मिळतो. या मुळे शेतकरी कुटुंबाला रोजगारही उपलब्ध होणार आहे.

नीती आयोगाकडून दखल


विनायक यांनी सांगितले की, उस्मानाबादी शेळी मिल्क सोप या मॉडेलची दखल नुकतीच नीती आयोगाने घेतली आहे. भारत सरकारच्या अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत यूथ को लॅब या संकल्पनेत देशपातळीवर शिवार सोप मॉडेलची निवड झाली आहे. (संपर्कासाठी विनायक हेगाणा यांचा मो. क्र. : 9890779842)

आत्महत्या रोखण्यासाठी शिवार हेल्पलाइन

मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील अजूनवाडचे रहिवासी विनायक हेगाणांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शिवार हेल्पलाइनही सुरू केेली आहे. नैराश्य आल्यास ते फोन करू शकतात. यावर समुपदेशन केले जाते व शेतकऱ्याला आत्महत्येपासून परावृत्त केले जाते.

 

बातम्या आणखी आहेत...