आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांच्या आधार कार्ड नोंदणीमध्ये उस्मानाबाद जिल्हा राज्यात प्रथम 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- अंगणवाडी केंद्रातील बालकांच्या आधार नोंदणीत उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. यामुळे जिल्ह्यातील तळागाळातील बालकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचणार असून पोषण आहारातील गैरप्रकारांना आळा बसणार आहे. मात्र, उर्वरित नोंदणीकडे महिला व बालविकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. 

 

जिल्ह्यात १ हजार ८९० अंगणवाडी केंद्रे असून यामध्ये एक लाख १५ हजार ६३९ बालके आहेत. त्यापैकी एक लाख ५९४ बालकांची आधार नोंदणी झाली आहे. यामध्ये जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आहे. मात्र, उर्वरित १५ हजार ४५ बालकांची अद्याप नोंदणी बाकी आहे. लाभार्थींच्या निश्चित संख्येनुसार बालकांना जि.प.च्या महिला व बालकल्याण विभागामार्फत पोषण आहारासह इतर योजना पोहोचवण्याचे शासनाचे नियोजन आहे. अनेक अंगणवाडी केंद्रांत बोगस बालकांची संख्या दाखवून पोषण आहारासह विविध योजनांचा लाभ लाटल्याचे गैरप्रकार होत आहेत. हे प्रकार थांबवण्यासाठी शासनाने पोषण आहार व अन्य योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील लाभार्थींची संख्या निश्चित करण्यासाठी ० ते ६ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. यामुळे पालकांत व मातांमध्ये आधार नोंदणीसाठी पेच निर्माण झाला होता. यातून मार्ग काढण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिकांना ७४ मोबाइल टॅब देऊन जुलै २०१८ पूर्वी बालकांची आधार नोंदणी पूर्ण करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे जिल्ह्यातील ० ते ६ वर्षे वयोगटातील एकूण एक लाख १५ हजार ६३९ बालकांपैकी एक लाख ५९४ बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, उर्वरित १५ हजार ४५ बालकांची आधार नोंदणी अद्याप झाली नाही. यामुळे पोषण आहारासह विविध योजना राबवण्यासाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. 

 

'आधार'च्या लाभार्थी संख्येनुसार मिळणार लाभ 
शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील बालकांच्या संख्येनुसार पोषण आहारासह इतर योजनेचा लाभ देण्याचे नियोजन आहे. यासाठी ० ते ६ वयोगटातील आधार नोंदणी केलेल्या बालकांचीच संख्या ग्राह्य धरण्यात येणार आहे. सध्या नोंदणीचे काम पूर्ण न झाल्यामुळे काही दिवस पूर्वीप्रमाणे पोषण आहार देण्यात येत आहे. मात्र, आगामी काळात आधार नोंदणीनुसारच पोषण आहारासह इतर योजनेचा लाभ पुरवण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालकल्याण विभागाला उर्वरित बालकांची आधार नोंदणी करावी लागणार आहे. 

 

पोषण आहारासह योजना राबवण्यासाठी आधार महत्त्वाचे 
अंगणवाडी केंद्रांमार्फत दिला जाणारा पोषण आहारासह इतर लाभ पात्र बालकांपर्यंत पोहोचावा तसेच बोगस लाभार्थींना आळा बसावा व पोषण आहारातील गैरप्रकार थांबावा म्हणून आधार नोंदणी आवश्यक आहे. जिल्ह्यात अंगणवाडी पर्यवेक्षिकांना मोबाइल टॅब देऊन आधार नोंदणी करण्यात आली असून उर्वरित काम सुरू आहे. -डॉ. संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. 
 

बातम्या आणखी आहेत...