आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइलवर शूटिंग करणाऱ्या नगरसेवकाला बाहेर काढण्यासाठी बोलावले पोलिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - सर्वसाधारण सभेत मोबाइलने शूटिंग करणाऱ्या नगरसेवकाला बाहेर काढण्यासाठी नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वसाधारण सभेत पोलिसांना बोलावण्यात आले. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात तब्बल सव्वा तीन तास वाया गेले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शूटिंग होणार नसल्याचे सांगितल्यानंतर केवळ २५ मिनिटांतच सभा संपली. या घडामोडींमुळे पालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा घडला. दरम्यान, शहरात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होण्यासाठी उजनी पाणीपुरवठा योजनेसाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

यापूर्वीच्या सर्वसाधारण सभेत जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने पत्रव्यवहार करण्यात आला नसल्यामुळे मंगळवारी पुन्हा सभा बोलावण्यात आली होती. या वेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष सूरज साळुंके यांची उपस्थिती होती. सुरुवातीला मुख्याधिकारी नसल्यामुळे त्यांच्याशिवाय सभा सुरू करण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली. सभेतील विषय सुरू होण्याअगोदर नगरसेवक अभिजित काकडे यांनी मोबाइलने शूटिंग करण्यास सुरुवात केली. त्यांना शूटिंग थांबवण्यासाठी नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी हरकत घेत शूटिंग बंद करण्यास सांगितले. मात्र, राष्ट्रवादीचे गटनेते युवराज नळे, माणिक बनसोडे, खलिफा कुरेशी, अभय इंगळे यांनी शूटिंग बंद होणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

 

तेवढ्याच जोरदार प्रत्युत्तरात नगराध्यक्षांनी काकडे यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्यानंतर पोलिस कारवाई करण्याचा इशारा दिला. तरीही काकडे बाहेर गेलेच नाहीत. ‘इतिहासात कधीच पोलिस आले नाहीत, मात्र, त्यांना येण्यास तुम्ही भाग पाडत आहात.’ असा इशाराही नगराध्यक्षांनी दिला. तेव्हा नगराध्यक्षांनी आनंदनगर पोलिस ठाण्यात काॅल करून संपर्क साधला. हा सर्व प्रकार होईपर्यंत दीड वाजले होते. पोलिसांना संपर्क साधल्यावर पोलिस दाखल झाले. 

बातम्या आणखी आहेत...