आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड - घरात घुसून महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी वडवणी येथील भाजपचा नगरसेवक प्रेमदास राठोड याला वडवणी येथील न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवून तीन वर्षे कारावास, आठ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
प्रेमदास राठोड हा २०१५ च्या वडवणी नगर पंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आला हाेता. २० नोव्हेंबर २०१८ रोजी त्याने पहाटे २ वाजता वडवणी शहरातीलच एका
महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर तिला घराच्या छतावर येण्याचा आग्रह करून महिलेचा विनयभंग केला होता. सदरील महिलेने आरडाओरड केल्यानंतर तो पळून गेला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वडवणी पोलिस ठाण्यात प्रेमदास राठोड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला होता. यानंतर वडवणी ठाण्याचे पोहेकॉ. सी. के. माळी यांनी तपास करून दोषारोपपत्र वडवणी न्यायालयात सादर केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे पीडित महिला, तपास अधिकारी यांच्या साक्षी नोंदवल्या. साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने प्रेमदास राठोडला दोषी ठरवत शिक्षा सुनावली अाहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील एस. एच. जाधव यांनी काम पाहिले.
तडजोडीचे प्रतिज्ञापत्र फेटाळले :
या प्रकरणात पीडितेचे वडील तसेच घटनास्थळ पंचनाम्यावेळी साक्षीदार फितूर झाले होते. पीडित महिलेने गुन्हा तडजोडीने मिटवण्यासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. मात्र, न्यायालयाने प्रतिज्ञापत्र फेटाळून लावत प्रेमदास राठोडला शिक्षा सुनावली. त्यामुळे प्रकरण मिटवण्याचा प्रेमदास राठोड याचा डाव उधळला गेला.
कोण हे प्रेमदास राठोड?
वडवणी तालुक्यातील बिचकुलदरा तांडा येथील प्रेमदास राठोड रहिवासी आहे. २००७ साली वडवणी ग्रामपंचायत निवडणुकीत राठोड ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला हाेता. वडवणी नगर पंचायत अस्तित्वात आल्यानंतर प्रेमदास राठोड वार्ड क्रमांक १७ मधून भाजपच्या तिकीटावर नगरसेवक म्हणून विजयी झाला हाेता. मागील चार वर्षाच्या काळात त्यांची विविध कारणावरून कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.