आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघूर घाेटाळ्यात अटक न करताच दाेषाराेपपत्र; तपासाला झालेला उशीर पडला पथ्यावर; पाचही संशयिताना जामीन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सन १९९६ ते २००६पर्यंत वाघूर पाणीपुरवठा याेजना प्रकरणी तत्कालीन नगरपालिका, महापालिकेत विविध ठराव होऊन कामांना मंजुरी देणे, प्रत्यक्ष कामास सुरुवात व व्यवहार झाले. सन २००८मध्ये योजनेचे विशेष लेखापरीक्षण झाल्यानंतर आर्थिक अफरातफर झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. यानंतर २०१२मध्ये तत्कालीन नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर सहा वर्षांनी म्हणजेच २०१८मध्ये सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या दरम्यान पोलिसांनी एकाही संशयिताला अटक केली नाही. थेट दोषारोपपत्र दाखल करून सहा जणांना हजर राहण्याची नोटीस दिली. याच बेसवर न्यायालयाने गुरुवारी न्यायालयात हजर झालेल्या पाचही संशयितांना जामीन मंजूर केला.

 

गुन्ह्याच्या तपासावेळी संशयितांना अटक करण्याची गरज भासली नसल्यामुळे आता अटक करून काय करणार? असा थेट युक्तिवाद बचाव पक्षाने केला होता. वाघूर योजनेच्या घोटाळा प्रकरणी गुरुवारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी बी.डी. पाटील यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या वेळी संशयित आरोपी प्रदीप रायसोनी, सदाशिव ढेकळे, लक्ष्मीकांत चौधरी व पी.डी. काळे हे चौघे हजर होते. तर सिंधू कोल्हे यांनी वैद्यकीय उपचार सुरू असल्यामुळे गैरहजर राहण्याचा अर्ज दिला होता. सहावे संशयित मोतीलाल कोटेचा यांचे निधन झाले असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध खटला चालणार नाही. दरम्यान, गुरुवारी जवळपास ३ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर झाले. यानंतर न्यायालयाने संशयित हजर असल्याबाबतची खात्री करून कामकाज सुरू केले. संशयितांना जामीन मिळू नये, न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी, असा युक्तिवाद सरकारी वकील अॅड. रंजना पाटील यांनी केला. त्यावर रायसोनी, कोल्हे व चौधरी यांच्यातर्फे अॅड. प्रकाश पाटील, ढेकळे यांच्यातर्फे अॅड. गोविंद तिवारी व काळे यांच्यातर्फे अॅड. नितीन जोशी यांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने पाचही संशयितांना प्रत्येकी २० हजार रुपयांची सॉल्व्हन्सी व २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्याच्या जामिनावर मुक्त केले.

 

कोल्हे यांना वॉरंट काढण्याची मागणी 

वाघूर पाणी याेजना घाेटाळ्यातील संशयित आरोपी सिंधू कोल्हे वैद्यकीय कारणामुळे न्यायालयासमोर हजर झाल्या नाहीत. सहा वर्षांनंतर दोषारोपपत्र दाखल झालेले असल्यामुळे त्यांनी न्यायालयात हजर राहणे अपेक्षित होते. तरी त्या हजर राहिल्या नाहीत, म्हणून त्यांच्या विरुद्ध वॉरंट काढावे, असा युक्तिवाद अॅड. रंजना पाटील यांनी केला. दरम्यान, कोल्हे यांना जामीन मिळवण्यासाठी न्यायालयापुढे हजर राहावेच लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अॅड. प्रकाश पाटील यांनी सिंधू कोल्हेंच्या गैरहजेरीबद्दल न्यायालयाची माफी मागितली.

 

सॉल्व्हन्सी भरण्यासाठी उडाली धांदल 

जामीन अर्जावर सुनावणीचे कामकाज सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत चालले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाल्यानंतर आर्थिक व गंभीर गुन्हा असल्यामुळे न्यायालयाने सॉल्व्हन्सी व वैयक्तिक जात मुचलक्यापोटी प्रत्येकी ४० हजार रुपये भरण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. आदेश होईपर्यंत सायंकाळचे सहा वाजले होते. दरम्यान, साॅल्व्हन्सीची रक्कम शुक्रवारी भरण्याची विनंती बचाव पक्षाच्या वकिलांनी केली होती. न्यायालयाने ती अमान्य करत जागेवरच पैसे भरण्याचे आदेश केले. संशयित व त्यांच्या सोबत असलेल्यांची धांदल उडाली होती. जवळपास अर्ध्या तासांनी सर्व संशयितांनी पैसे भरले. 
 

बातम्या आणखी आहेत...