आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावध ऐका...पुढल्या हाका

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

 वैशाली पाटील

महिलांचे गुन्हेगारी क्षेत्राकडे पाऊल वळणे नवीन नाही. मात्र, वाढत्या भौतिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानं गुन्हा घडत असेल तर ही गंभीर बाब म्हणावी लागेल.     
 
गेल्या आठवड्यात जळगावात उच्चशिक्षित,  सधन कुटुंबातील तरुणीने महिलेच्या मानेवर केमिकल फेकून सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न केला.बातमी वाचून मी अवाक‌्च झाले. अशा गुन्ह्यासाठी ३७९ कलमांतर्गत गुन्हा नोंदवला जातो. ३ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली जाते. या शिक्षेत स्त्री-पुरुष असा भेद नसतो.  पण आता चोरी करणे फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही हेसुद्धा आता  महिलांनी सिद्ध केलेच आहे. सणासुदीच्या दिवसांत, गर्दीच्या ठिकाणी चोरी करणाऱ्यांमध्ये  महिला अधिक असल्याचे दिसते. अशा कृत्यांमागे काही महिलांची हलाखीची परिस्थिती, वाढती महागाई, कौटुंबिक गरजा, कौटुंबिक दडपण, अपूर्ण शिक्षण, पूर्णतः अशिक्षितपणा अशी अनेक कारणे असू शकतात. मात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या, सधन आणि राजकारणी पार्श्वभूमी असलेल्या घरातील तरुणी चोरी कोणत्या कारणासाठी करीत असाव्यात?  जळगावातली तरुणी सधन कुटुंबातली होती. पॉकेटमनी अपुरा पडत असल्यानं तिनं हे पाऊल उचलल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. असे गुन्हे का घडत असावेत? मुळात गुन्ह्याकडे तरुणाई वळते हीच ज्वलंत समस्या आहे. मात्र महिलांचे पर्यायाने सुशिक्षित, सधन घरातील मुलींचे गुन्हेगारी क्षेत्राकडे पाऊल वळणे ही त्याहून गंभीर समस्या आहे.  फॅशनेबल युगात, सोशल मीडियाच्या फसव्या काळात मुली स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांच्या गरजा प्रमाणाबाहेर वाढल्या आहेत. त्या गरजांचे व्यसनात रूपांतर झाले आहे.  शिक्षणानिम्मित बाहेरगावी असल्याने पालक सढळ हाताने पैसा देतात. त्या पैशाचा हिशेब घेतला जातोच असं नाही. हिशेब विचारलाच तर तो हिशेब मॅनेज करून सांगायचीसुद्धा शक्कल लढवली जाते. स्टायलिश राहणीमान, बॉयफ्रेंड, हॉटेलिंग, शॉपिंग हे सार मेंटेन करायचं म्हटलं तर घरून मिळणारा  पॉकेटमनी पुरत नाही. पालकांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा काही मुली गैरवापर करतात. प्रत्येक वेळी मुलीला बिघडवण्याची वृत्ती मुलाचीच असते असं नाही. किमान शिक्षित मुली तरी सारासार विचार करू शकतात. त्यांना समोरचा आपल्यावर जाळे फेकत आहे, फसवत आहे इतकं कळण्याइतपत व्यवहार ज्ञान नक्कीच असते. महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्याचा फायदा घेत अनेक शिक्षित महिला, मुली, पुरुषांना, तरुणांनाही टार्गेट करतात हे महिला असून खेदाने नमूद करावे वाटतेय. 

स्त्रियांची, मुलींची अशी दिशाभूल होण्याचे प्रमुख कारण सोशल मीडियाही असू शकते. जग मोबाइल, लॅपटॉपच्या माध्यमाने हातात आलेय. गुगलवर हवे ते ज्ञान मोफत आणि झटपट मिळतेय. साधं पुस्तक, वृत्तपत्र विकत घेऊन वाचण्याची वृत्ती शिल्लक नाही. कमी वेळात खूप काही मिळवण्याच्या स्पर्धेत तरुणाई आळशी होतेय. एका कॉलवर सहज उपलब्ध होणाऱ्या गरजा, सुविधा कधी व्यसन बनून कर्जबाजारी करून जातात याचं भान राहत नाही. आणि जेव्हा भान येतं तेव्हा वेळ निघून गेलेला असतो. वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी चोरी, देहविक्रीकडे महिला, मुली वळतात. 

या सर्वांचे मूळ कारण पुन्हा कुटुंब व्यवस्थेकडे येते. प्रत्येक कुटुंबातील पालक पाल्यांवर संस्कार करतात. पण तरीही कौटुंबिक संवाद, आपसातील विश्वास आणि सामाजिक जाणीव यांची कमतरता आढळतेच. हे टाळायचे असेल तर आपसात सुसंवाद आणि विश्वास अत्यंत गरजेचा आहे. 

तरुण मुलींवर बंधने न ठेवता त्याना प्रत्येक कृतीत,घरातील मुख्य चर्चेत सामावून घेतलं गेलं पाहिजे. काही निर्णय त्यांच्या कलेने घेतले गेले पाहिजे. सामाजिक प्रबोधनाच्या आत्मविकासाच्या विविध विषयांवर मुक्त चर्चा झाल्या पाहिजेत. गुन्ह्याच्या शिक्षा काय असू शकतात यांची कल्पना दिली गेली पाहिजे. आपलं कुटुंब आपली जबाबदारी आहे. कुटुंबासाठी मी महत्त्वाची घटक आहे. माझं प्रत्येक पाऊल योग्यच असलं पाहिजे याची जाणीव त्यांना होईल आणि दिशाहीन होण्यापासून वाचतील. त्यांची वैचारिक, मानसिक क्षमता  वाढून सकारात्मक  मार्ग कसे आखले जातील, याकडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 

लेखिकेचा संपर्क : ९४२०३५०१७१

बातम्या आणखी आहेत...