Home | Maharashtra | Vidarva | Akola | Vaishali Yede Speech in 92nd Akhil Bharatiya Marathi Sahitya sanmelan Yawatmal

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यवतमाळमध्ये थाटात उद्घाटन; वैशालींनी मांडले वास्तव

विशेष प्रतिनिधी | Update - Jan 12, 2019, 07:16 AM IST

माझ्या वैधव्याला आजची व्यवस्थाच खऱ्या अर्थाने जबाबदार आहे, अशी भावना संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी मांडली.

 • Vaishali Yede Speech in 92nd Akhil Bharatiya Marathi Sahitya sanmelan Yawatmal

  यवतमाळ- लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्यामुळे वादग्रस्त ठरलेेल्या ९२ व्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन गुरुवारी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची विधवा पत्नी वैशाली येडे यांच्या हस्ते झाले. सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यामुळे सरकारवर झालेले आरोप, आयोजकांवर झालेली टीका व नंतर साहित्यिकांचा बहिष्कार या पार्श्वभूमीवर उद्घाटन समारंभाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे यांचे भाषण अत्यंत मर्मभेदी ठरले. तर, प्रमुख पाहुणे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या वादाशी सरकारचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले.

  ... निमंत्रण नाकारणे ही आयोजकांची चूक
  कुणीही यावं आणि साहित्य संमेलन वेठीला धरावं हे चालणार नाही. साहित्यबाह्य प्रकरणांनी संमेलनात वाद निर्माण हाेणे चुकीचे आहे. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे ही संयोजकांची चूक आहे, अशा शब्दांत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी खडसावले. झुंडशाही व धर्माच्या राजकारणापुढे झुकणे चुकीचे आहे, असेही ढेरे म्हणाल्या. आज प्रत्येकाने विवेक जागा ठेवण्याची ही वेळ असल्याचे सांगून नयनतारा सहगल यांचे विचार स्वीकारले जायला हवेत, असे त्यांनी नमूद केले.

  मलेशियातील विश्व संमेलनात उमटले पडसाद
  मलेशियातील शब्द विश्व साहित्य संमेलनात गुरुवारी नयनतारा सहगल यांच्या भाषणाने संमेलनाचे उद्घाटन झाले. सहगल यांचे पूर्ण भाषण या प्रसंगी वाचले गेले. मलेशिया महाराष्ट्र मंडळाच्या शिल्पा टाकसाळे यांच्या उपस्थितीत प्रा. ज्योती भगत यांनी हे भाषण वाचून दाखवल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अनुमोदन दिले. संमेलनाध्यक्ष संजय आवटे यांनीही याच विषयावर आपली मांडणी केली.

  नयनतारा यांचे मुखवटे घालून निषेध :
  साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी उपस्थित साहित्यप्रेमींनी नयनतारा यांचे मुखवटे घालून असा निषेध नोंदवला.

  माझ्या वैधव्याला ही संपूर्ण व्यवस्थाच जबाबदार
  अडचणीच्या वेळी दिल्लीची नव्हे, गल्लीतील बाईच कामी येते हे सिद्ध झाले आहे. आम्ही विधवा नाही, तर महिला आहोत. नवरा कमकुवत होता, तो गेला. मी मात्र सदैव लढणार आहे. माझ्या वैधव्याला आजची व्यवस्थाच खऱ्या अर्थाने जबाबदार आहे, अशी भावना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी व संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे यांनी मांडली. त्यांच्या हस्तेच ९२ व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.

  सरकारला विनाकारण गोवू नका : तावडे
  लेखिका नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण पाठवून नंतर मागे घेण्यात आले. महामंडळाच्या या कृतीमुळे महाराष्ट्राचे नाक कापले गेले. हे सरकारलाही पटलेले नाही. व्हायला नको त्या गोष्टी झाल्या. या प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही. राज्य सरकारला यात नाहक गोवले जाऊ नये, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे म्हणाले.

 • Vaishali Yede Speech in 92nd Akhil Bharatiya Marathi Sahitya sanmelan Yawatmal
 • Vaishali Yede Speech in 92nd Akhil Bharatiya Marathi Sahitya sanmelan Yawatmal
 • Vaishali Yede Speech in 92nd Akhil Bharatiya Marathi Sahitya sanmelan Yawatmal
 • Vaishali Yede Speech in 92nd Akhil Bharatiya Marathi Sahitya sanmelan Yawatmal

Trending