आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासिक पाळीत कापडमुक्तीसाठी वैशाली यांचे ‘दत्तक गाव’ अभियान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात अद्यापही जुन्या विचारसरणीमुळे मासिक पाळीत महिला कापडाचा वापर करतात. ही मानसिकता बदलावी यासाठी जळगावच्या वैशाली दरवर्षी एक गाव दत्तक घेतात. संबंधित गावातल्या महिलांमध्ये सॅनिटरी नॅपकीन वापराबद्दल जागृती करतात.  त्यांच्या अनोख्या उपक्रमाविषयी...

 

वैशाली विसपुते या गेल्या अनेक वर्षांपासून सॅनिटरी नॅपकीन याविषयी जनजागृती करण्याचे काम करत आहे. याअंतर्गत त्यांनी आतापर्यंत अनेक शाळा, महाविद्यालयांत सॅनिटरी पॅड मशीन बसवले आहे. त्यांनी दत्तक घेतलेल्या पोखरी तांडा येथे उपक्रमाला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे निधी फाउंडेशनतर्फे महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात येवून मासिक पाळीबाबत माहिती देण्यात आली. वैशाली यांच्या मुलीचे जन्मानंतर काही दिवसांत निधन झाले.  मुलीच्या स्मरणार्थ त्यांनी २००५ मध्ये निधी फाउंडेशनची स्थापना केली. यानंतर रिमांड होममधील मुली, महिलांची भेट घेऊन, त्यांचे पालकत्व स्वीकारले. या महिला, मुलींसाठी विविध उपक्रम राबवून नैराश्य दूर करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरवला. 


...अन् भयानक वास्तव समोर आले : एकेदिवशी शहरातील दुकानावर काम करत असताना दुकानासमोर एक मुलगी रडताना दिसली. तिची विचारपूस केल्यावर तिचे शाळेचे कपडे रक्ताने डागाळलेले असल्यानं ती रडत असल्याचे वैशाली यांच्या लक्षात आले.  एक महिला असल्यानं त्यांनी समस्या समजून घेतली.  आई, मुलीमधे मासिक पाळीबाबत कुठलाही संवाद होत नसल्याची शोकांतिकाही वैशाली यांच्यासमोर आली. अशा शाळांमध्ये भेटी दिल्यावर विसपुते यांना मासिक पाळीबाबत अनेक मुली अनभिज्ञ असल्याचे दिसले. तर महिला मासिक पाळीमध्ये वर्षानुवर्षे एकच कापड वापरत असल्याचे भयानक वास्तवही समोर आले.


पोखरी तांडा शंभर टक्के कापडमुक्त : प्रत्येक वर्षी एक गाव दत्तक घेऊन त्या ठिकाणी मासिक पाळीसह सॅनिटरी नॅपकीनबाबत जनजागृती करण्यासाठी वैशाली पुढे सरसावल्या. २०१८ मध्ये त्यांनी पोखरी तांडा दत्तक घेतले. तिथे महिला मासिक पाळीत कापड वापरत असल्याचे समोर आले. 


आशा स्वयंसेविकांच्या सहकार्याने निधी फाउंडेशनने कार्यक्रम घेतला. नॅपकीन तसेच त्याच्या फायद्याबाबत माहिती दिली.  प्रत्येक महिला, मुलीची मासिक पाळीच्या तारखेची नोंद ठेवत पाळी येण्याअगोदरच वर्षभर मोफत नॅपकीनही पुरवले. आज महिलांना त्याचे फायदे कळले आहेत. व्यसने, घरातील खर्च कमी करू, पण यापुढे कापड वापरणार नाही, असा निर्धार महिलांनी केला आहे.