दिव्य मराठी विशेष / नवरात्रात वैष्णोदेवी मंदिरास असेल सोन्याचे दार

२९ ते ७ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रात ३ ते ४ लाख भाविक येण्याची अपेक्षा

दिव्य मराठी

Sep 22,2019 08:35:00 AM IST

मोहित कंधारी

जम्मू - वैष्णोदेवी मंदिरास सोन्याचा दरवाजा बसवण्यात येत आहे. ९६ फूट लांबीच्या या प्राचीन गुहेचा दरवाजा येत्या २९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रीत बसविण्यात येत आहे. याआधी गुहेबाहेर संगमरवराचा दरवाजा लागत होता. ही प्राचीन गुहा फक्त थंडीच्या दिवसांत काही दिवसांसाठी भाविकांना खुली करण्यात येते. मात्र, या प्राचीन गुहेच्या दरवाजाचा वापर येथील पुजारी दरराेज आरती-पूजेसाठी करत असतात. साेन्याच्या या नव्या दरवाजाच्या एका बाजूला लक्ष्मीमाता व दुसऱ्यावर आरती कोरण्यात आली आहे. याशिवाय गणपतीचे छायाचित्र व मंत्राचेही कोरीव काम आहे. दरवाजाच्या वरच्या बाजूला घुमट व छत्र कोरण्यात आले आहे. त्याला ९ पायऱ्या आहेत. त्या ९ देवीसाठी आहेत. श्राइन बोर्डाचे सीईओ सिमरनदीपसिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा हा दरवाजा श्राइन बोर्डाच्या नव्या देणगीच्या धोरणानुसार तयार करण्यात आला आहे. नवरात्रीत मातेचे भवन सजवण्यासाठी थायलंड, हॉलंड, मलेशिया, सिंगापूर, उटी व पालमपूर आदी ठिकाणांहून देश-विदेशातील फुले व फळे मागविण्यात आली आहेत. यंदा प्रथमच कटरा बेस कँपपासून भवनापर्यंतच्या १३ किमी लांब वळणदार रस्त्यावर रंगीत लायटिंग करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या लंगरमध्ये नवरात्रात फलाहार देण्यात येईल. या नवरात्रीच्या सणात नऊ दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते याचे उद््घाटन होईल. नेहमीप्रमाणे नवरात्रातील प्रसिद्ध दंगल आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, २००५ ते २०१२ पर्यंत पाकिस्तानातील पहिलवान या दंगलीत सहभागी होत असत. परंतु भारत-पाकदरम्यान निर्माण झालेला तणाव पाहता २०१३ पासून त्यांना निमंत्रित करणे बंद करण्यात आले. या वर्षीसुद्धा पाकिस्तानी पहिलवान बोलावला जाणार नाही. कटरा येथे या फेस्टिव्हलचे आयोजन १९९६ पासून होत आहे. दर्शन घेण्यास येणाऱ्या भाविकांची सुरक्षा लक्षात घेता खास सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

३ महिन्यांत कारागिरांनी गुहेजवळ वर्कशॉपमध्ये तयार केला दरवाजा

हा दरवाजा तयार करण्यासाठी कारागिरांना तीन महिने लागले. मुंबईत सिद्धिविनायक व दिल्लीत झंडेवाला मंदिरात ज्यांनी नक्षीकाम केले आहे, अशा कारागिरांनाच बोर्डाने दरवाजाच्या कामासाठी बोलावले आहे. बोर्डाने गुहेजवळील एका खास वर्कशॉपमध्ये हा सोनेरी दरवाजा तयार केला. दरवाजा चांदीचा असून याला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.

X
COMMENT