आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचित आघाडी, राज ठाकरे यांच्यासारख्या समविचारी पक्षांनी आता तरी एकत्र यावे; काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांचे आवाहन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकांच्या ताेंडावर काँग्रेसने माजी मंत्री व आमदार बाळासाहेब थाेरात यांची प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्ती केली. यानंतर प्रथमच नाशिक दाैऱ्यावर आलेल्या थाेरात यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयास भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्नांना उत्तरे दिली...

 

‘महाजनांनी काँग्रेसची नव्हे तर खेकड्यांची चिंता करावी’ 
‘काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नूतन प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा निवडणुकीत सरकार स्थापन करणे तर साेडाच, पण काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून ५० जागाही निवडून आणाव्यात,’ असे आव्हान नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बाळासाहेब थाेरातांना रविवारी पत्रकारांसमाेर दिले. तरीही आघाडीचाच मुख्यमंत्री होणार, असे आमदार बाळासाहेब थोरातांना वाटत असेल तर माझ्या त्यांना ‘शुभेच्छा’, असा टाेलाही त्यांनी लगावला हाेता. त्याला प्रत्त्युत्तर देताना थाेरात म्हणाले, ‘गिरीश महाजन यांनी काँग्रेस पक्षाचे आमदार फुटण्याची काळजी करण्यापेक्षा धरणे पाेखरणाऱ्या खेकड्यांचा विचार केला तर राज्याचे नुकसान टाळून जनहित साधता येईल.’ २००४ मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारने ‘फील गुड’चे वातावरण निर्माण केले हाेते. जनतेने मात्र त्यांना नाकारून सत्तेतून पायउतार केले हाेते. त्याचप्रमाणे यंदाही भाजपकडून आभासी वातावरण निर्माण केले जात असले तरी प्रत्यक्षात सर्वच क्षेत्रांत मंदी असल्याने निश्चितच काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीत उभारी घेईल,’ असा दावा थाेरात यांनी पत्रकार परिषदेत केला.

 

> विधानसभेसाठी वंचित  बहुजन आघाडीबाबत भूमिका काय?
थाेरात : समविचारी पक्षांना महाआघाडीत सामावून घ्यायचे ही आमची भूमिका आहे. त्यामुळे वंचित आघाडीलाही आम्ही विनंती करणार आहाेत. ही लढार्इ विकासाची, जीवनमानाची तशीच ती तत्त्वाचीदेखील आहे. हा देश कसा पुढे जाणार हे ठरवण्यासाठी त्यांनी साेबत यावे, अशी आमची अपेक्षा आहे. 


> राज ठाकरे यांनी साेनिया गांधी यांची भेट घेतलीय. त्यांनाही तुमच्या आघाडीत स्थान मिळेल का?
थाेरात : मनसेने लाेकसभेच्या प्रचारात खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली. सगळ्यांनाच त्यांचे भाषण पटत हाेते... पण त्याचे मतात का रूपांतर झाले नाही हा भाग वेगळा. त्यावर मी भाष्य करणार नाही, परंतु जे बराेबर येतात त्यांना साेबत घेतले जावे, ज्यांचा राज्यघटनेच्या तत्त्वांवर विश्वास आहे त्यांना साेबत घेतले जावे या मताचा मी आहे. यासंदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर चर्चा हाेऊन घेतला जाईल. 

 

> बिकट काळात प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी तुमच्यावर आली. आता तुमची रणनीती काय असेल?
थाेरात :  कार्यकर्त्याला साद घालणे ही खरी गरज असते. यापूर्वीही अतिशय अडचणीत गेलेला काँग्रेस पक्ष आणि त्यातून सत्तेत आलेला पक्षही आपण पाहिला आहे. मात्र आता भविष्यात काँग्रेस पक्षाचे अतिशय चांगले संघटन झालेले बघायला मिळेल. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उपाध्यक्ष, सरचिटणीस अशी सर्व प्रदेशांशी संबंधित पदाधिकाऱ्यांची टीम पक्षाने दिलेली आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून कमी काळात चांगले काम केले तर सर्वसामान्य माणसापर्यंत पाेहाेचणे शक्य हाेऊन भूमिका समजावून सांगणे शक्य हाेईल.

 

> राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधील २० आमदार संपर्कात असल्याचे सांगत आहेत. ही गळती कशी थांबवणार?
थाेरात :  विखे पाटलांना काय वाटते, त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे. मला मात्र त्यात तथ्य वाटत नाही. मला आत्मविश्वास आहे, काँग्रेस पुन्हा उभारी घेईल. लाेकसभा व विधानसभा या दाेन्ही निवडणुकांमध्ये फार फरक आहे. त्यामुळे आता निकाल वेगळा दिसेल. काेणत्याही संघटनेमध्ये लाेक साेडून गेले की तिथे तरुणाईला वाव मिळताे. आजवर त्यांना प्रस्थापितांमुळे संधी मिळत नव्हती. 

 

> आता प्रचाराचा मुद्दा काय असणार?
थाेरात : लाेकसभेच्या प्रचारात मुद्दे वेगळे हाेते, मात्र विधानसभेत स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरतात. आज काेणत्याही शेतकऱ्याची नाडी तपासा ताे सरकारच्या कामगिरीवर नाराजच दिसेल. शेतकरी जेव्हा समाधानी नसताे तेव्हा आपाेआपच गावातील अर्थव्यवस्था काेलमडते, आज मंदीची लाट दिसतेय. ती वाहन उद्याेग का मागे गेला, या उद्याेगाचे उत्पादन घटणे म्हणजे देशाचा विकास खुंटताे, अर्थव्यवस्था मागे गेली असे समजावे, हे मुद्दे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच निर्णायक ठरतील.

बातम्या आणखी आहेत...