Election / महाआघाडीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत वंचित बहुजन आघाडीचा विदर्भात उमेदवारांचा शोध सुरू

प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री म्हणूनच प्रोजेक्ट करणार

विशेष प्रतिनिधी

Jul 14,2019 12:02:00 PM IST

नागपूर - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजप आणि शिवसेना युतीच्या विरोधात महाआघाडी उभारण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असताना महाआघाडीच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत वंचित बहुजन आघाडीने विदर्भात उमेदवारांचा शोध सुरूही केला आहे. रविवारी नागपुरात वंचित आघाडीच्या वतीने संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू करण्यात आली.


विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढवण्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रयत्न असून रविवारी आघाडीच्या संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील, अशोक सोनोने, रेखा ठाकूर या नेत्यांनी नागपूरसह भंडारा, गोंदिया आणि वर्धा संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती पार पाडल्या. उमेदवारीसाठी या जिल्ह्यांतून आतापर्यंत ७० अर्ज आले असल्याची माहिती वंचित आघाडीच्या संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेतून दिली. राज्यात तिसरा सक्षम पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी राहणार असून आमच्या मदतीशिवाय राज्यात सरकार स्थापन होणार नाही, असा दावा पाटील यांनी केला. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला ४१ लाखांच्या वर मते मिळाली आहेत, याकडे लक्ष देऊन पाटील म्हणाले की, समाजातील वंचित घटकांना संधी दिल्यानेच हे यश मिळाले.


आगामी विधानसभा निवडणुकीत निवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातूनच व्हावी, ईव्हीएमला आमचा विरोध राहील असे सांगताना मतदानानंतर व्हीव्हीपॅटच्या सर्व पावत्यांची मोजणी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बंडखोरी करणारे नेते लक्ष्मण माने यांचा बोलवता धनी कोणी वेगळाच असून त्याचा शोध सुरू असल्याचे पाटील यांनी यावेळी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले. वंचित आघाडीचे प्रदेश सरचिटणीस सागर डबरासे, अशोक सोनोने, रेखा ठाकूर यावेळी उपस्थित होते.


राज्यात ८२ जागा मिळतील, चांगल्या व्यक्तींना उमेदवारी
वंचित आघाडीला किमान ८२ जागा मिळतील, असा दावा अण्णाराव पाटील यांनी केला. उमेदवारांची निवड करताना प्रामाणिक, सामाजिक कार्यात असलेला चारित्र्यवान व्यक्तींना प्राधान्य दिले जाणार अाहे. केवळ वंचितच नाही तर समाजातील इतरही घटकांतील चांगल्या व्यक्तींना उमेदवारी देण्याचा विचार होणार आहे. प्रदेशाध्यक्षांकडून योग्यवेळी उमेदवार जाहीर केले जातील,असे त्यांनी या वेळी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.


आंबेडकरांना मुख्यमंत्री म्हणूनच प्रोजेक्ट करणार
प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणूनच प्रोजेक्ट करणार आहोत. त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, असेच आमचे प्रयत्न असल्याचे अण्णाराव पाटील यांनी या वेळी सांगितले.

X
COMMENT