Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Vanchit Bahujan Aghadi will decide Chavan and Chikhlikar's future

वंचित बहुजन आघाडी ठरवणार चव्हाण-चिखलीकरांचा निकाल

विनायक एकबोटे | Update - Apr 16, 2019, 08:32 AM IST

मुस्लिम समाजाची किती मते विभाजित होतात यावर निर्णय लागणार आहे.  

  • Vanchit Bahujan Aghadi will decide Chavan and Chikhlikar's future

    नांदेड- नांदेड मतदारसंघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण विरुद्ध भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात लढत होत आहे. शेवटच्या टप्प्यात या दाेन्ही उमेदवारांकडे विजयाच्या समान संधी असल्या तरी वंचित बहुजन अाघाडी काेणाची मते खाणार यावरच येथील निकालाचे भवितव्य अवलंबून अाहे.


    पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते तथा जिल्ह्यातील चव्हाणांचे कट्टर राजकीय विराेधक प्रताप पाटील चिखलीकरांनी चव्हाणांला त्यांच्या बालेकिल्ल्यात आव्हान दिले आहे. सुरुवातीला अगदीच नगण्य वाटणारे आव्हान दिवसेंदिवस तगडे होत गेले. त्यात वंचित बहुजन आघाडीच्या भूसुरुंगाने बालेकिल्ला हादरायला लागला. सध्या मतदारसंघात जी स्थिती आहे त्यावरून लढत अटीतटीची आहे. दोघांनाही विजयाचे फिफ्टी-फिफ्टी चान्सेस आहेत असेच म्हणणारे बहुसंख्य आहेत. याचा अर्थ यापूर्वीप्रमाणे यंदाची निवडणूक अशाेक चव्हाणांसाठी एकतर्फी राहिली नाही. दलित समाज आजघडीस वंचितमागे एकवटला आहे. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकातूनही हे पाहायला मिळाले. त्यामुळे काँग्रेसची एक व्होट बँक तर गेली आहे. या वेळी हरो किंवा जिंको, पण प्रकाश अांबेडकरांच्याच मागे राहायचे, असे दलित समाजातील बहुसंख्याकांचे मत आहे. त्यात तरुणाईही मागे नाही. भोकरचे उत्तम बाबळे म्हणाले, ‘या वेळी दलित समाजाचे एकही मत वंचित आघाडीपासून दूर जाणार नाही. या निवडणुकीत वंचित आघाडीला ८ टक्के मते मिळाली तर राजकीय पक्षाचा दर्जा मिळतो. दुसरी बाब एक व्होट बँक तयार होऊन त्याचा फायदा विधानसभेत होईल. दलित मतांमुळे काँग्रेसची व्होट बँक फुटली आहे. ती अाता एकवटली जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.


    वंचितचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे हे धनगर समाजातील आहेत. त्यामुळे या समाजाची मते त्यांच्याकडे वळतील आणि त्याचा फटका भाजपलाही बसेल, असेही अाडाखे बांधले जात अाहेत. मुस्लिम समाजातील बहुसंख्याकांचे मत असे आहे की, सत्तेवर कोणीही आले तरी आमचे प्रश्न सुटत नाहीत. मुस्लिम समाजातील तरुणाई एमआयएमकडे आकर्षित झाली आहे तर चाळिशी पार केलेले मतदार अजूनही काँग्रेसकडे झुकलेले आहेत. सपा-बसपा आघाडीही या वेळी रिंगणात आहे. त्यामुळे वंचित आणि सपा-बसपा या दोन्ही आघाड्यात मुस्लिम समाजाची किती मते विभाजित होतात यावर निर्णय लागणार आहे.


Trending