आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकाश्रय नव्हे रसिकाश्रय हवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुशिक्षितांची एक मोठीच अडचण आहे. काही बाबतीत आपले (गैर) समज ठाम असतात. हे समज बहुतांश वेळा ऐकीव माहिती, माध्यम सुनामीच्या अफाट वेगात आपल्यावर आदळलेले असतात. ते आपण निमूटपणे स्वीकारतो. शहानिशा करण्याचा सद्सदविवेक बाजूला सारून. विचारदुवे जोडण्याचे कष्ट न घेता. चित्रपट सृष्टीनं ­­­­­­­­लावणी, तमाशा कलाकारांबदद्ल करून ठेवलेले समज हे अशापैकीच एक. यामुळेच कामुक, अश्लील हावभाव म्हणजे लावणी इतकंच आपल्यापर्यंत पोहोचलेलं असतं. पण खरंच लावणी म्हणजे इतकंच असतं? कशी असतात लावणी सादर करणारी माणसं? कसा असतो त्यांचा मेकअपमागचा चेहरा? मुळात आपण त्यांना आपल्यासारखंच माणूस समजतो का?

 

आजच्या लावणी, तमाशा कलावंतांची अवस्था ही डोंबाऱ्याच्या माकडासारखी झालीय. लोकं अश्लील शेरेबाजीचे दगड फेकतात. हावभाव करतात. आणि आम्हीही तसंच करून दाखवावं, अशी अपेक्षा करतात. त्यांच्या मागणीप्रमाणे केलं नाही तर गोंधळ घालतात. नंतर गंमत बघत बसतात. प्रेक्षकांच्या मागणीनुसार पुरवठा केला नाही तर कलावंत भिकेला लागतो. मग आम्ही काय करायचं तुम्हीच सांगा?’ संवादाच्या सुरुवातीलाच लावणी सम्राज्ञी सीमा पोटे यांनी मला खणखणीत सवाल केला. ज्याचं उत्तर अर्थातच माझ्याकडे नव्हतं.सीमाताई पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या. लोककलेची पंढरी हे बिरुद मिरवणाऱ्या नारायणगावच्या. दत्तोबा तांबे शिरोलीकरांच्या तमाशात सीमाताईंचे आई-वडील काम करायचे. सीमाताईंचा जन्मही याच तमाशातला. चंद्रकांत ढवळपुरीकरांच्या तमाशातून त्यांनी बालकलाकार म्हणून सुरुवात केली. सीमाताईंना एक भाऊ, एक बहीण. आई-वडिलांच्या मिळकतीत घरखर्च निघणं अवघड होतं. भावाच्या शिक्षणासाठी सीमाताई, त्यांची बहीण स्टेजवर नृत्यासाठी उभ्या राहिल्या. नंतर नृत्याची आवड निर्माण झाली. मग लावणी हाच उत्पन्नाचा मार्ग निवडला. आज सतरा वर्षे त्या लावणी करत आहेत ते केवळ या कलेवरच्या श्रद्धेपोटी. याच तमाशात ओळख झालेल्या सुधाकरांशी त्यांचा प्रेमविवाह झाला. मेकॅनिकल डिप्लोमा केलेला मुलगा आणि पती असं त्यांचं कुटुंब आहे. आर्थिक स्थिती ठीक आहे. त्यांनी लावणीचे कार्यक्रम बंद केले तरी उदरनिर्वाह सुरू राहील अशी परिस्थिती आहे. मात्र, केवळ कलेवरच्या प्रेमाखातर त्या कार्यक्रम करतात. आणि त्याच लावणी प्रेमापायी तुळजापूरहून कार्यक्रम करून पहाटे नारायणगावला  परतल्यानंतरही त्या उत्साही आणि प्रसन्न चेहऱ्यानं  बोलत होत्या.कलेवर जगणारे उपाशी मरतात.

 


पूर्वीच्या लावणी,तमाशात गवळण, रंगबाजी, वगनाट्य, गाणी हे धार्मिक पौराणिक कथांवर आधारित होतं. मुख्य नृत्याच्या आधी हे एक-दीड तास चालायचं. आजकालच्या लोकांना फक्त चित्रपटातल्या गाण्यांवर नाचणारी बाई हवी असते. लोकांच्या इच्छेनुसार सादरीकरण केलं नाही तर आम्ही टिकणार नाही. त्यामुळे आधुनिक नृत्य करणाऱ्या बायका लावणी कला जोपासण्यापेक्षा कला विकणं पसंत करतात. केवळ कलेसाठी जगणारा लावणी कलावंत आता दुर्मिळ आहे. कलेवर आणि कलेसाठी जगणारे कलावंत उपाशी मेले हे पाहून खूप वाईट वाटतं, अशी खंत सीमाताई व्यक्त करतात.

 


कलाकृती स्वातंत्र्यानं गैरसमज वाढवले
अनेक वर्षांपासून मराठी आणि काही हिंदी चित्रपटांतून तमाशा, लावणी आधारित गाणी चित्रित होतात. त्यात नाचणाऱ्या बायका श्रीमंत पुरुषांना नादी लावतात, या बायकांवर नोटा उधळल्या जातात, लावणी-तमाशात जबरदस्तीनं मुली आणून नाचवल्या जातात, तमाशा, लावणी फडात अतिप्रसंग केले जातात असे खूप प्रसंग दाखवले गेले. मात्र, वास्तवात यापैकी काहीच घडत नाही. 


चित्रपट दिग्दर्शकांनी कलाकृतीच्या नावाखाली घेतलेलं हे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे सुशिक्षितांमध्ये या लोककलेबद्दल चुकीचे संदेश पोहोचले. सादरीकरणात सगळ्या महिला असुनही या कार्यक्रमांना महिलांची उपस्थिती नसते ती यामुळेच. अस्सल लावणी कार्यक्रमात प्रेक्षकाला बक्षिसी द्यावी वाटली तर कार्यक्रम काही मिनिटं थांबवला जातो. ती बक्षिसी संबंधित कलाकाराच्या नावे स्टेजमागच्या निवेदकाकडे आणून देण्याची विनंती केली जाते. जमा झालेली बक्षिसी कार्यक्रमानंतर सर्व कलावंतांमधे समान वाटली जाते. प्रत्येकाच्या कष्टाची कदर करणारी लावणी कला वाईट कशी? ह्या प्रश्नाचं उत्तर सीमाताईंना आजही मिळालेलं नाही.


‘ उचली ’वरचा संसार
लावणीचे कार्यक्रम वर्षातले ठराविक महिनेच होतात. दसरा ते बुद्धपौर्णिमा हा लावण्याच्या फडांचा काळ. लावणीसाठी मिळणारं मानधन तुटपुंज असतं. हंगामाव्यतिरिक्तचा खर्च भागवण्यासाठी फड मालकाकडून पैशांची उचल घेतली जाते. ती उचल आगामी हंगामात फड मालक टप्प्याटप्यात वसूल करतो.पुन्हा लावण्यांचा हंगाम संपला की नंतरच्या काही महिन्यांची नड या उचलीवरच भागवली जाते. इतकी आर्थिक अस्थिरता असतानाही या कलावंतांनी ही कला जगवली आहे.


‘रसिक’ श्रोते हवेत
लावणी-तमाशासाठी पूर्वी येणारं पब्लिक आणि आताचं पब्लिक यात जमीन-अस्मानाचं अंतर असल्याचं सीमाताई सांगतात.माझ्या लहानपणचे श्रोते जाणकार होते. कलेतले बारकावे जाणणारे नसले तरी दाद कशी द्यावी हे जाणणारे होते. आजकालच्या लोकांना कलेतलं कळत तर काहीच नाही, पण  दाद कशी द्यावी हेसुद्धा त्यांना कळत नाही. प्रेक्षक दर्दी असेल तर कलाकाराच्या कष्टाचं चीज होतं. कला सादर करून भरून पावल्याची भावना हीच कलाकाराची खरी कमाई असते. समाधान, पूर्णत्वाची ही प्रचिती फक्त रसिक प्रेक्षकच देऊ शकतो, अशा त्या भावना व्यक्त करतात.


उतारवयातल्या वाढत्या वेदना
नारायणगावच्या या भेटीत सीमाताईंसह उमा खुडे या निवृत्त लावणी कलाकारालाही भेटले. उमाताईंनी १५-१६ वर्षे या कलेची सेवा केली. १९९२ ला झालेल्या अपघातानंतर उमाताईंचं नृत्य बंद झालं. तरीही गायिका, वगनाट्य यासह संचामधली जमेल ती कामं करतच राहिल्या. अशा वयोवृद्ध कलावंतांच्या अडचणी तर आणखीनच दु:खदायक आहेत. अनेक लावणी कलाकार निवृत्तीकडे झुकल्यात. लावणीतल्या मुख्य ­­­नृत्यांगनेला नाव, प्रसिद्धी मिळते. कधी मुख्य नर्तिकेच्या नावावरच फडाचं नाव ठेवलं जातं. फडाचं नाव गाजतं. मात्र, संचातल्या सहनर्तिका उपेक्षितच राहतात. त्यांची मेहनतही मोलाची असते. मात्र त्यांना ओळख मिळत नाही. प्रसिद्धी मिळत नाही.  प्रसिद्धी न मिळू शकलेल्या सहकलाकारांची अवस्था हलाखीची आहे. ‘आमच्या वेळी गावातल्या मोकळ्या जागेत राहुट्या लागायच्या. मात्र आता राहुट्यांना तारेचं कुंपण घालावंच लागतं.’उमाताईंची ही प्रतिक्रिया समूह मानसिकतेबद्दल खूप काही सांगते. लेखाच्या सुरुवातीला मी, सीमाताई नुकत्याच लांबच्या दौऱ्यावरून आल्या होत्या, असा उल्लेख केला. मात्र त्यांच्या घरी गेले तेव्हा याच्या पुसटशाही खाणाखुणा कुठेच दिसल्या नाहीत. सगळं घर  अगदी नीटनेटकं होतं. सीमाताईंचे पती सुधाकर आणि मुलगा हे घर लख्ख असण्यामागचं कारण. दौरा असो अथवा नसो, घरातल्या सर्व कामांमध्ये सुधाकर आणि त्यांचा मुलगा समान वाटा उचलतात. परस्पर सामंजस्याचा, घरच्या स्त्रीसाठी जा‌णिवेचा असा नि:शब्द वाहणारा झरा पाहिला की फुले-शाहू-आंबेडकर केवळ विचारातच नव्हे, तर आचारातही जिवंत आहेत याचं मोठंच समाधान मिळतं.  नारायणगावला मी गेले होते ते खरं तर लावणी कलावंतांची मुलाखत घेण्यासाठी. त्यांना प्रश्न विचारण्यासाठी. पण त्यांच्या भेटीतून माझ्याच मनात असंख्य प्रश्नांनी गर्दी केली. विचारांनी गोंधळ घातला. विचारांचा हा गुंता आज ना उद्या सुटेलही. पण या कलावंतांच्या आत दडलेला माणुसकीचा अमृत कलश या मंथनातून हाती लागलाय हे नक्की.

 

वंदना धनेश्वर

लेखकाचा संपर्क : ९३४००६१६२९

बातम्या आणखी आहेत...