आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळवणाची ‘त्याची’ लगबग...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायांच्या पाचवीला पुजलेल्या स्वयंपाकघरात पुरूषांचा वावर कमीच. सुग्रास भोजन बनवणारे व्यावसायिक ‘शेफ’ हाच काय तो अपवाद. या आडवाटेवर एक पाऊल पुढे टाकलं आहे, बुलडाण्याच्या भिंगारा गावच्या तरूणांनी. पंचविशी-तिशीतले हे तरूण वाळवणाचे पदार्थ तयार करतात. तरूणांच्या या पुढाकारामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी साधल्या गेल्यात. एक तर या तरूणांना आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग गवसलाय. दुसरं म्हणजे कामाबद्दलचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याला यामुळे मोठंच बळ मिळणार आहे.

 

सकाळी साडेआठ-नऊची वेळ. बुलडाण्याच्या सुवर्णनगर परिसरातलं मातृभूमी फाउंडेशनचं ऑफिस. या ऑफिसात पोहोचले तेव्हा ४-५ पोरसवदा मुलांची लगबग सुरू होती. घरवजा कार्यालयातली ही मुलं नक्की कसल्या गडबडीत आहे याचं मला कुतूहल वाटलं. काही वेळानं त्या मुलांनी अंगणात बाज आणून ठेवली. त्यावर प्लास्टिकचा मोठा कागद अंथरला. आणि आत जाऊन ही मुलं पापड लाटायला बसली. थोड्याच वेळात ती बाज गोलगरगरीत, सुबक, पांढऱ्याशुभ्र पापडांनी भरून गेली. मुलांची मघाची घाई तांदळाची खिशी घेण्यासाठीची होती हे लक्षात आलं.
उन्हाळी वाळ‌वणं म्हणजे बायांचं काम हे गणित आजवर परंपरेनं मेंदूत फिट्ट बसवलेलं. या प्रक्रियेत वाण्याकडून सामान आणणं इतकंच पुरुषांचं यातलं ‘योगदान’ हे ही ओघानंच आलं. मात्र अनिल, मुकेश, राजेश आणि विजय यांना वाळवण करतांना बघून ‘ कुछ अच्छा पक रहा है’ अशी माझी मनोवस्था झाली. जी अर्थातच सुखावणारी होती. केवळ पापडच नव्हे तर सांडगे, कुरडया, मुग-उडीद पापड,खारोड्या, शेवया, साबुदाणा चकल्या, बटाटा पापड, चिप्स, खरडा चटणी, कोरूडा, तांदूळ सांडोळी, बिबड्या, यसवार असे अनेक पदार्थ ही मुलं तयार करतात. बुलडाण्याच्या भिंगारा या आदिवासी परिसरातली ही मुलं सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या चाळीसटपरी, वडपाणी, चुनखडी गावातली. राठी ही इथली बोलीभाषा. लोकसंख्या केवळ काही हजारांच्या घरातली. शेती हे उत्पन्नाचं मुख्य साधन. मात्र खरीप हंगामानंतर हाताला काम नाही- पोटाला घास नाही अशी गावची अवस्था. त्यावर उपाय म्हणून पावरा समाजातल्या या मुलांनी वाळवणाचे पदार्थ शिकून उत्पन्नाचा मार्ग शोधला. 
त्याहीपेक्षा कामाकडे पाहण्याचा तुमच्या-माझ्यासारख्या ‘सुशिक्षितांचा’ दृष्टिकोन बदलला ही महत्त्वाची बाब.  
अशी सुचली कल्पना : मुलांना उत्पन्नाचा हा मार्ग शोधून देण्याची कल्पना प्रा. मृणाल सपकाळ यांची.

 

बुलडाण्याच्या महाविद्यालयात त्या इंग्रजीच्या प्राध्यापिका आहेत. सामाजिक कार्याच्या निमित्तानं मृणालताईंचा भिंगारा गावाशी संपर्क होता. अकोल्याला मैत्रिणीकडे गेल्या असतांना मृणालताईंना मैत्रीणीचं वाळवणाचं काम बघून ही कल्पना सुचली. भिंगारा गावात येऊन त्या मुलांशी बोलल्या. मत जाणून घेतलं. मुलांनीही प्रतिसाद दिला. अकोल्याला जाऊन वाळवणाचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. आज ‘पॉवर ऑफ पावरा @ प्युरिटी’ च्या माध्यमातून ही मुलं पायावर उभी आहेत. मृणाल ताईंसह सुमेधा देशपांडे,प्रिया ठोसर, पुजा देशमुख, श्रद्धा आढाव या मैत्रिणींनीही हातभार लावला आहे.

 

गव्हाचा चीक अन् तांदळाची खिशी
पदार्थाच्या पूर्वतयारीवर वाळवणाची गुणवत्ता अवलंबून असते. घटकपदार्थाचं प्रमाण, त्याची नेमकी तयारी हे कौशल्याचं काम. मात्र, फारसं शिक्षण नसलेल्या या मुलांनी ही प्रक्रिया समजून घेतली. आज गव्हाचा चीक काढणं, तांदळाची खिशी घेणं,पापड लाटणं, तिखट-मीठ,पापडखाराचं प्रमाण ठरवणं, बाजरी शिजवणं, ज्वारीच्या बिबड्या करणं, चिकासाठी गहू पाण्यात भिजू घालणं, तांदळाच्या पिठीचे सांडगे करणं ही सगळी कामं ही मुलं लीलया करतात. एखाद्या अनुभवी महिलेनं केलेल्या वाळवणाच्या पदार्थांची चव या मुलांच्या हाताला आहे, हे विशेष.
 

‘आदिवासी’ कोण तुम्हीच ठरवा 
भिंगारा आणि आसपासच्या गावात मुलभूत सोयींचा अभाव आहे. शहरात मिळणाऱ्या भौतिक सुविधाही तिथं नाही. मात्र तुलनेनं हा समाज वैचारिक,व्यावहारिकदृष्ट्या कथित सुशिक्षितांपेक्षा पुढारलेला दिसतो. स्त्रियांबद्दलचा आदर, त्यांना दिलं जाणारं स्वातंत्र्य हे त्यांच्या कृतीतून व्यक्त होतं. स्त्री-पुरूष समानता हा त्यांच्यासाठी केवळ चर्चेचा विषय नाही, त्यांना तो स्वत:च्या जगण्याचाच एक भाग वाटतो. जगण्याचं हेच सत्त्व अनिल, विजय, मुकेश आणि राजेश सारख्या असंख्य तरूणांच्या रूपानं पुढच्या पिढीत झिरपतंय...