आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंबरठा ओलांडताना...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपतीबाप्पाला निरोप देऊन झोपेच्या अधीन झालेल्या किल्लारी आणि आसपासच्या गावांना भूकंपाचा धक्का बसून सारं होत्याचं नव्हतं झालं, त्याला यंदा २५ वर्षं होत आहेत. भूकंपानंतर सरकारी व स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून अव्याहत सुरू असलेल्या पुनर्वसनामुळे त्या कटू आठवणींतून लोक बाहेर पडलेत. भूतकाळ कुलूपबंद करून उमेदीनं भविष्याला सामोरे गेले आहेत. जात आहेत. पण आचारविचार स्वातंत्र्य नसलेल्या, स्वयंपाकघरात कोंडलेल्या बायाबापड्यांच्या नजरेतून या मोठ्या आपत्तीतून सावरणं म्हणजे काय होतं? ठसठशीत कुंकू मिरवणाया, डोक्यावरचा पदर चुकूनही ढळू न देणाया या ताई-माई-अाक्कांच्या लेखी पुनर्वसनाचा अर्थ नक्की काय होता? अशाच काही प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा, पर्यायांचा वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. लातूर, किल्लारी, तुळजापूर, मसला खुर्द, सास्तूर, या भूकंपग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांच्यासोबत पुनर्वसनाच्या वाटेवरच्या आठवणी जाग्या केल्या. या भेटींवर आधारित लेखमालेअंतर्गत स्त्रियांच्या या २५ वर्षांतल्या अथक प्रयत्नांचा धांडोळा आपण घेणार आहोत. या प्रवासाची सुरुवात होते महिलांना स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीपर्यंत आणि तिथून पुढे उंबरठ्याबाहेर आणणं या प्राथमिक पायरीपासून.


साठी पार केलेल्या मसला खुर्द (तुळजापूर)च्या पार्वतीआज्जी. भूकंपाच्या पडझडीत नवऱ्याचा आधार गेला. मुलगी छायाला त्यांनी एकटीनं वाढवलं. तिचं लग्न करून दिलं, पण एक मुलगी पदरी टाकून छायाच्या नवऱ्यानंही जगाचा निरोप घेतला. शिक्षण नाही. उत्पन्नाचं साधन म्हणजे नवऱ्यानं मागं ठेवलेली तुटपुंजी जमीन. स्वत:च्या शेतात मजूर म्हणून काम करणाऱ्या पार्वतीबाईंना एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत पडली. त्यातून मुलगी आणि नातीची जबाबदारी. पार्वतीबाई आयुष्यभर स्वयंपाकघराच्या बाहेर पडल्या नव्हत्या. नवऱ्याच्या हयातीत निर्णय घेण्याची त्यांच्यावर वेळ आली नव्हती. त्यांच्या पुढ्यात हे संकट उभं राहिलं. मात्र, त्यांनी कच खाल्ली नाही. निभाव लागायचा असेल तर घराबाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही हे लक्षात घेतलं. पदर खोचला. आसपासच्या महिलांच्या संपर्कात आल्या. बचत गटाबद्दल माहिती मिळवली. अवघ्या दहा रुपयांपासून बचतीला सुरुवात केली. शेतीत काम करून उरलेल्या वेळात बचत गटाच्या कामात वेळ दिला. उत्पन्नाचे मार्ग शोधले. छायानंही आईच्या पावलावर पाऊल टाकलं. आज पार्वतीआज्जी, छाया चांगल्या स्थितीत आहेत. त्यांच्या डोक्यावर पत्र्याचं का होईना पण हक्काचं छत आहे. छाया तिच्या मुलीला शिकवण्याइतपत सक्षम झाली आहे. वयोमानानुसार बचत गटाच्या कामातून आता आजी निवृत्त झाल्या असल्या तरी छाया त्यांचा वारसा पुढे नेतेय. 


पार्वतीआज्जी आणि छायासारखीच थोड्याफार फरकानं समान परिस्थिती होती भूकंपग्रस्त भागातल्या आयाबायांची. एक तर घरातला कर्ता पुरुष भूकंपात जिवाला मुकलेला किंवा बेपत्ता. दुसरं, सरकारी पातळीवर आणि जगभरातून आलेल्या पैशांच्या आणि इतर स्वरूपातल्या मदतीची घरातल्या जिवंत असलेल्या पुरुषांनी, नातेवाइकांनी परस्पर विल्हेवाट लावली होती. शासनाकडून मिळालेल्या मदतीच्या पहिल्या हप्त्यातली बहुतांश रक्कम पुरुषांनी दारूवर उडवली होती. उरलेल्या रकमेत सावकाराच्या कर्जाचा हप्ता. अशा स्थितीत संसार रेटायचा कसा हा यक्षप्रश्न, चुलीजवळ फुकणी मारायला न बसताही बाईच्या डोळ्यांत पाणी आणायचा. उंबरठ्याबाहेरचं जग माहीत नाही. जेमतेम शिक्षण. व्यवहारज्ञान नाही. कुटुंबातल्या कुठल्याच मुद्द्यांवर मत मांडण्याचा अनुभव नाही. अधिकार नाही. अशा स्थितीत करायचं तरी काय? कुठून सुरुवात करायची? आपल्याला स्वतंत्रपणे काही करता येईल का, एकटीला उभं राहता येईल का, अशा प्रश्नांनी त्यांची रात्रीची झोप उडवली होती. महिलांची ही मानसिकता बदलण्यासाठी पुढे सरसावली ‘एसएसपी’ अर्थात ‘स्वयं शिक्षण प्रयोग’ ही स्वयंसेवी संघटना. 


भूकंपबाधित १२०० गावांतल्या महिलांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेनं पुनर्वसनाचं काम सुरू केलं. उंबरठ्याबाहेर पाऊल टाकायला तयार नसलेल्या महिलांची मानसिकता बदलण्याचं पहिलं मोठं आव्हानं संस्थेसमोर होतं. मात्र हातातोंडाची गाठ घालण्यातली घुसमट व्यक्त करण्यासाठी एसएसपीनं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. बघता बघता एक मोठी चळवळच उभी राहिली. आज पन्नाशी साठीत असलेल्या बायका पंचवीस वर्षांपुर्वी या चळवळीत सहभागी झाल्या. आज त्यांच्या मुली-सुनां या परिवर्तन पालखीच्या भोई झाल्या आहेत. 
हे काम वाटतं तितकं सोपं नव्हतं. पुनर्वसनाच्या या कामासाठी सुरुवातीला पुरुषच पुढे यायचे. बाया घराबाहेर पडायला तयार नव्हत्या, म्हणजे घरातल्या पुरुषांचीच तशी इच्छा नव्हती. शिवाय जातिरचनेचा सामाजिक पगडा वेगवेगळ्या स्तरातल्या बायकांना एकत्र येऊ देत नव्हता. अशा स्थितीत एसएसपीचे संवाद सहायक पुढे सरसावले. या आपत्तीतून महिलाच घराला  कसं सावरून शकते हे या सहायकांनी समजावून सांगितलं. प्रत्येक घरी जाऊन संवाद वाढवला. स्त्रिया घराबाहेर पडल्यानं मिळणारे चार पैसे संसारालाच उपयोगी पडतील हे सांगत बाप्यांचं समुपदेशन केलं. उंबरठ्यातल्या बायांच्या अडचणी समजून घेतल्या. ‘अच्छे दिन’साठी महिलांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे पटवून दिलं. संवाद सहायकांच्या या सातत्यामुळे गावातल्या बायका हळूहळू एकत्र आल्या. एकमेकींकडे मोकळं व्हायला लागल्या. आपण स्वत: आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याला पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आलं. शेतात मरमर करूनही आपण शेताची मालकीण नाही तर मजूरच आहोत, याची जाणीव या बायकांना संवाद सहायकांनी करून दिली. आणि या जाणिवेतूनच उभे राहिले बचत गट. 


बचत गटाच्या स्थापनेनंतर गटबैठकांच्या निमित्तानं बायका नियमित एकत्र यायला लागल्या. संवाद सहायक महिन्यातून एकदा या महिलांची बैठक जवळच्या एखाद्या गावी घेऊ लागले. बायकांनी दूर अंतरावरचा प्रवास एकटीनं करावा, बाहेरच्या जगाचा अनुभव घ्यावा हा त्यामागचा उद्देश. कालांतरानं एकत्र येऊन काम करण्याचं महत्त्व, एकत्र येण्यातली जादू समजली. या जादूचा प्रभाव इतका होता की, एखादी महिला बैठकीला गैरहजर राहिली तर इतर सर्वजणी तिला उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन द्यायच्या. या गटांच्या माध्यमातून या महिलांना शेतीपूरक उद्योगांचं प्रशिक्षण, शिवणकाम, किराणा दुकान, बांगडी दुकान, भाजीविक्री, दुग्ध व्यवसाय, ब्युटी पार्लर अशा विविध प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. एकत्रित महिलांच्या बैठकांच्या जागेसाठी ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी दिलेल्या जागेवर महिला माहिती केंद्रं उभारण्यात आली. आजघडीला लातूर उस्मानाबाद मिळून चाळीस पेक्षाही अधिक महिला माहिती केंद्र सुरू आहेत. दैनंदिन गरजांसंदर्भातल्या कामकाजाची, बँकांची माहिती, अधिकाऱ्यांशी संवाद, शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळण्याचं महिलांचं ते आज एक हक्काचं ठिकाण बनलं आहे. शिक्षण नाही, आपण ग्रामीण भागातल्या आहोत, कुणी फसवलं तर, अशा सगळ्याच शंकांना दूर सारत महिला या केंद्रातून सर्व गोष्टींबद्दल बिनदिक्कत जाणून घेतात. विचारांची देवाणघेवाण करतात.


भूकंपानंतरच्या काही काळातल्या संवाद सहायकांच्या ध्यासामुळे आज लातूर, उस्मानाबाद, तुळजापुरातल्या महिलांची बँक खाती आहेत. बँक म्हणजे काय याची पुसटशी कल्पनाही नसलेल्या या महिलांना आज बँकेत पत असल्यानं कर्जही मिळतं. महिन्याकाठी दहा रुपये शिलकीत टाकणं ज्यांना अवघड वाटायचं त्या बाया आज महिना पाचशे रुपयांची बचत करताहेत. शेतमजुरी करणाऱ्या बायांनी एकाच वेळी छोट्या प्रमाणात का होईना पण एकाच वेळी विविध व्यवसायाची कास धरली. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे या बायांचा वार्षिक नफा दहा-पंधरा हजारांच्या आसपास आहे. निलंग्याच्या कांताबाई पाटील, उस्मानाबादच्या वैशाली घुगे, अर्चना भोसले, बेंडकाळच्या सुदामती गोरे यांच्याकडे थोडी का होईना पण हक्काची जमीन असल्याचं, पूर्वीच्या संवाद सहायक आणि आता प्रकल्प संचालक असणाऱ्या नसीम शेख सांगतात. 


अनेक प्रश्नांची उत्तरं या बायकांच्या उंबरठ्याबाहेरच्या एकत्रीकरणातून त्यांना सापडली आहेत. पाणी, रस्ते, रेशन कार्ड, स्वच्छता, जलव्यवस्थापन, शौचालय, वाहतूक, दारूबंदी यासारख्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायत व्यवस्थेचा नेमका उपयोग करायला त्या शिकल्या आहेत. गावच्या विकासाशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या मुद्द्यांत त्यांच्या मताला महत्त्व आहे. आदर आहे. विशेष म्हणजे या महिला आता धीटपणे स्टेजवर उभ्या राहून आपल्या कामाची माहिती देतात. बोलण्याच्या ओघात विविध संदर्भ सांगतात. मुलांचं शिक्षण असो की स्थानिक विकास, गावचा पार असो की शेतातला पेरा, सगळ्या ठिकाणच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा क्रियाशील सहभाग आहे. आर्थिक सक्षमीकरणाबरोबरच महिलांच्या एकत्र येण्यानं जातीपातीची उतरंड मोडीत निघाली, सामाजिक सलोखा निर्माण झाला ही या चळवळीची शंभर नंबरी कमाई आहे. शिवाय पुनर्वसनाच्या या पंचवीस वर्षांच्या प्रक्रियेत स्थानिक पातळीपासून राज्य स्तरापर्यंतच्या शासनव्यवस्थेला या बायाबापड्यांनी स्वत:ची दखल घ्यायला भाग पाडणं हे त्यांच्या एकत्रिकरणाचं बावनकशी फलितच म्हणावं लागेल.

-  वंदना धनेश्वर, किल्लारी
vandana.d@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...