आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना लावा भौतिकशास्त्राची गोडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याना भौतिकशास्त्राची गोडी लावणाऱ्या पुस्तकाबद्दल...

भौतिकशास्त्र हा हमखास गुण मिळवून देणारा विषय. त्यामुळे अनेक मुले त्यातील संकल्पना पाठांतर करून स्मरणात ठेवण्यावर भर देतात. त्याचा अपेक्षित उपयोग होतोच, असे नाही. शिवाय भौतिकशास्त्र बारावीनंतरच्या अभ्यासक्रमात आणि दैनंदिन व्यवहारातही अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकांसाठी उपयुक्त यंत्रे, उपकरणे तयार करणे किंवा अन्य संशोधनातही हा विषय मोलाची भूमिका बजावतो. ही बाब लक्षात घेऊन २०१९-२० मध्ये बालभारतीने नवीन अभ्यासक्रम तयार केला आहे. राष्ट्रीय आणि राज्याचे अभ्यासक्रम समोर ठेवून मांडणी केली आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून विषयाची जागरूकता निर्माण व्हावी. भौतिकशास्त्राच्या मूलभूत संकल्पना सहज समजाव्यात आणि त्या संकल्पनांचा वापर दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी करता यावा. मुलांनी जास्तीत जास्त स्व-अध्ययन करावे अशी त्याची रचना आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी गरजेचे ज्ञान मिळावे, याकडे लक्ष दिले आहे. एकूण ६ भागांमध्ये पुस्तक विभागले आहे. प्रत्येक विभागात विद्यार्थी काय शिकणार, त्याचे कोणते कौशल्य विकसित होऊ शकते, याची माहिती दिली आहे. प्रत्येक धड्याचा प्रारंभ कॅन यू रिकॉल म्हणजे यापूर्वी काय शिकलो, याची आठवण करून देतो. पुढे धड्यामध्ये रंगीत आकृत्या, चित्रांचा वापर केला आहे. धडा संपल्यावर लगेच सोडवलेले प्रश्न आहेत. कॅन यू टेल या विभागात मुलांना विचार करण्यास भाग पाडणारे प्रश्न विचारले आहेत. प्रत्येक धड्याच्या शेवटी भरपूर सराव प्रश्न आणि न्युमरिक्स आहेत. पुस्तकाच्या प्रारंभी क्यूआर कोडचा वापर करून अतिरिक्त आणि ताजी माहिती विद्यार्थी, शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.


या पुस्तकात प्रथमच सोपे प्रयोग किंवा निरीक्षणे मांडलेली आहेत. त्याचा उपयोग धड्यातील मुद्दे आणखी स्पष्ट करण्यासाठी होऊ शकतो. शिवाय मॅथेमॅटिकल मेथड्स हा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. भौतिकशास्त्रासाठी लागणाऱ्या गणितीय संज्ञा यात आहेत. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा देणाऱ्या मुलांना डोळ्यासमोर ठेवून हे लिखाण केले आहे. आजूबाजूच्या घडामोडींना आजच्या काळात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून करंट नॉलेज अँड अॅडिशनल इन्फर्मेशन या पुस्तकात आहे. ऑलवेज रिमेंबर असे शीर्षक असलेल्या चौकटीत ही माहिती आहे. शिवाय इंटरनेट माय फ्रेंड या विभागात मुलांसाठी उपयुक्त वेबसाइट्स दिलेल्या आहेत.


हे शिक्षकांसाठी 

चढत्या क्रमाने धड्यांची मांडणी केली असल्याने ते त्याच क्रमाने शिकवले तर मुलांना मागच्या संदर्भांची जुळणी पटकन करता येईल. ‘डू यू नो’मधील माहिती मुद्दे समजण्यासाठी वापरावी. पण त्यावर परीक्षेत प्रश्न विचारू नयेत. प्रश्नपत्रिका तयार करताना सर्व धड्यांना समान गुण द्यावेत. नीट, जेईई परीक्षेसाठीही हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरू शकते. भौतिकशास्त्राची गोडी मुलांना लागू शकते. त्या दृष्टीनेही विद्यार्थी, माता-पिता आणि शिक्षकांनी या पुस्तकाकडे पाहावे.


(लेखिका  पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ सदस्य आहेत.)

बातम्या आणखी आहेत...