आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कृती सलामत तो स्त्रिया पचास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नथ घालून सोशल मीडियावरून स्त्रियांचं गुणगान करणाऱ्या सगळ्याजणींचे एकत्र फोटो असलेली एका चित्रपटाची जाहिरात वेगवेगळ्या वाहिन्यांवरून प्रसारित होत होती. डॉक्टर आनंदीबाई जोशी या नव्या सिनेमाचं हे प्रमोशन होतं. मुद्दा हा आहे की, आनंदीबाई आणि नथ यांचा एकमेकांशी काय संबंध? आनंदीबाई तर डॉक्टर होत्या मग त्यांचा स्टेथाेस्कोपशी संबंध असायला हवा की नथीशी? 

 

आता स्वत:च्या हातात बेड्या घालून घेतल्या आहेत कारण मी असं मानते की, बेड्या हे सामर्थ्याचं, कर्तृत्वाचं, देशाभिमानाचं प्रतीक आहे! स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशातल्या अनेक महिलांनी तुरुंगवास भोगला होता – त्यांच्या संघर्षाचा सन्मान म्हणून मी स्वत:च्या हातात बेड्या घालते आहे. भारतीय महिलांनी जगात खूप मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे. मला भारतीय स्त्री असण्याचा अभिमान वाटतो! तुम्हाला जर भारतीय स्त्री असण्याचा अभिमान असेल तर तुम्हीसुद्धा माझ्यासारख्याच हातात बेड्या घालून घ्या आणि सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट करा. जय हिंद!” 

 

असं आवाहन करणारी एखादी मोहीम लवकरच सुरू झाली तरी मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही. कारण गेल्या पंधरा दिवसांत स्त्रियांचं कर्तृत्व, स्वयंपूर्णता यांचा गौरव करण्यासाठी अगदी भलभलती प्रतिकं वापरून सोशल मीडियावर कॅम्पेन झालेल्या आहेत. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हाॅट्सअॅप आणि टीव्ही अशा वेगवेगळ्या माध्यमातून अगदी नामांकित, वलयांकित आणि स्वत:ला पुरोगामी समजणारे लोकदेखील कुंकवाची चिरी, नथ अशा जुन्यापुराण्या प्रतिकांचा वापर करून सावित्रीबाई फुले, डॉक्टर आनंदीबाई जोशी अशा महान स्त्रियांच्या संघर्षाला वंदन करायचे आवाहन स्त्रियांना करत होते. तीन जानेवारीला दारापुढे रांगोळी घालून, विवेकाची पणती पेटवून आणि कपाळाला सावित्रीबाई लावत तशी कुंकवाची आडवी चिरी लावून हा उत्सव साजरा करावा, असं आवाहन करणारे मेसेजेस डिसेंबर महिन्यापासूनच फेसबुकच्या मेसेंजरमध्ये येऊन पडायला लागले. जसजशी जयंती जवळ येऊ लागली तसतसं हे आवाहन व्हीडिओच्या रूपातही दिसायला लागलं. अनेक तरुण मुली कपाळावर कुंकवाची आडवी चिरी लावून शिक्षणाची महती सांगत ‘सावित्री उत्सव’ साजरा करायचे आवाहन करायला लागल्या; मग त्यात काही अभिनेत्रींच्या फोटोंची भर पडायला लागली, दोन जानेवारीला तर अनेक प्रथितयश पुरोगामी महिलांचे कुंकवाची चिरी लावलेले फोटो असलेलं एक मोठं पोस्टर झळकायला लागलं. अर्थातच तीन जानेवारीला अशा सेलिब्रिटीयुक्त आवाहनाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि अनेक जणींनी कुंकवाची चिरी लावून सेल्फी झळकवले! ही लाट ओसरते आहे तितक्यात आणखी काही ग्लॅमरस अभिनेत्रींच्या ‘नथ’ घातलेल्या व्हीडिओचा पाऊस पडायला लागला. 

 

हे व्हीडिओ तर फारच विनोदी होते. एका व्हीडिओमध्ये एकजण म्हणतेय की ‘नथ’ हा दागिना फक्त स्त्रीच घालू शकते म्हणून नथ हे बाईपणाचं प्रतीक आहे, तर दुसरी म्हणतेय नथ घातली की, बाई सुंदरच दिसते पण नथ घालण्यासाठी नाक टोचून घ्यायच्या वेदना सहन कराव्या लागतात आणि त्या सहन करायची क्षमता फक्त स्त्रीकडे असते म्हणून स्त्री महान आहे! तिसरी सांगतेय - हा मराठमोळा दागिना मराठी अस्मितेचा प्रतीक आहे आणि अस्मिता जपू शकते फक्त स्त्रीच! काही अभिनेत्री आणि काही गायिका अशा दहाबारा जणींनी मिळून एका छोट्याशा दागिन्याला बुद्धिमत्ता, पराक्रम, स्वातंत्र्य, अस्मिता, सौभाग्य, स्वाभिमान असे असंख्य गुण चिकटवून टाकले आहेत. खूप छान छान शब्द एकत्र आणून ही भाषणं लिहिलेली आहेत, खूप अभिनिवेशाने म्हटलीही आहेत; पण त्यात प्रचंड विरोधाभास आहेत. एकीकडे म्हणायचं की, कर्तृत्व स्त्रीचा दागिना आहे आणि पुढच्या श्वासात नथ या दागिन्याचं कौतुक सांगायचं. पूर्वी सौंदर्य स्पर्धेतल्या प्रश्नोत्तरांच्या फेरीत इव्हिनिंग गाऊन घातलेल्या मुली जशा मदर टेरेसा आपला आदर्श असल्याचं सांगायच्या तशीच या व्हीडिओत पोकळ बडबड आहे. 

 

पण अचानक हे नथीचं कौतुक कशासाठी सुरू झालंय याबद्दल या मोहिमेतून उत्सुकता निर्माण झालीच होती. ही एखाद्या जवाहिऱ्याची जाहिरात असेल की, एखाद्या टीव्ही मालिकेचं की, नाटकाचं प्रमोशन आहे याबद्दल तर्कवितर्क लढवले जायला लागले आणि आठ जानेवारीला भ्रमाचा भोपळा फुटला! आठवडाभर नथ घालून सोशल मीडियावरून स्त्रियांचं गुणगान करणाऱ्या सगळ्याजणींचे एकत्र फोटो असलेली एका चित्रपटाची जाहिरात वेगवेगळ्या वाहिन्यांवरून प्रसारित झाली. तेव्हा समजलं की हे तर डॉक्टर आनंदीबाई जोशी या झी स्टुडिओच्या नव्या सिनेमाचं प्रमोशन होतं. 


पण आनंदीबाई आणि नथ यांचा एकमेकांशी काय संबंध? आनंदीबाई तर डॉक्टर होत्या मग त्यांचा स्टेथाेस्कोपशी संबंध असायला हवा की नथीशी? असले बावळट प्रश्न मात्र विचारायचे नाहीत बरं का! सावित्रीबाई शिक्षिका असल्या तरी त्यांची आठवण जागी ठेवण्यासाठी खडूफळा किंवा पुस्तकाऐवजी जर कुंकवाची चिरी हे प्रतीक बनू शकते तर डॉक्टर आनंदीबाईंच्या आठवणीचं प्रतीक ‘नथ’ का नाही बनू शकत? सावित्रीबाईंनी कुंकवाची चिरी लावली किंवा डॉक्टर आनंदीबाईंनी नथ घातली त्यात त्यांची स्वत:ची आवड होती की त्या काळाचा रेटा होता, याच्याशी आपल्याला काय करायचंय? त्यानंतरच्या काळातल्या स्त्रियांनी दागिने, कुंकू, मंगळसूत्र यासारख्या प्रतिकांना झुगारण्यासाठी किती कष्ट घेतले त्याच्याशीसुद्धा आपला काही संबंध नाही! स्त्रीमुक्तीचे झेंडे नाचवणाऱ्यांच्या काळात सेल्फी होती का? आजच्या काळात दागिने नसलेल्या, रिकाम्या कपाळाच्या बायकांचे सेल्फी सोशल मीडियावर कसे दिसतील बरं? दागिने नसतील तर मिरवायची काही मज्जाच नाही! आपली ‘संस्कृती’ दागिन्यांमधूनच तर दिसते ना? पण नुसतेच दागिने घालून छानछान फोटो टाकले तर लोक कदाचित नटवेपणाला हसतील! म्हणून आपण सोयिस्कर कॉम्बो करायचा - एखाद्या दागिन्यालाच बुद्धिमत्ता, पराक्रम, अभिमान यांचं प्रतीक बनवून टाकायचं. एका दगडात कितीतरी पक्षी - इव्हेंट साजरा होतो, सेल्फीसाठी निमित्त मिळतं, प्रत्यक्षात विशेष काही करावं लागत नाही पण संस्कृतीचं गुणगान करता येतं आणि हातासरशी स्वत:च्या पुरोगामीपणाची जाहिरात होऊन जाते!  

 

लवकरच २६ जानेवारी येतेय - सेल्फीसाठी मस्त ओकेजन आहे. पण २६ जानेवारीसाठी प्रतीक काय निवडायचं? संविधान? छे! ते कुणाला कळणार आहे? त्यापेक्षा सेल्फीमध्ये चटकन दाखवता येईल असं प्रतीक पाहिजे. २६ जानेवारीला दागिने घालणं बरोबर दिसणार नाही, मग या वेळी हातात बेड्या घातल्या तर कसं वाटेल? स्वातंत्र्य संग्रामात कितीतरी महिलांनी तुरुंगवास पत्करला होता,त्यांच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी हातात बेड्याच घालून घेऊ या! शर्मिष्ठा भोसले यांनी तिच्या कवितेत सांगितलंच आहे - 
तू नथ घाल 
तू नौवारी नेस 
तू भगवा फेटा घालून 
हिरो होंडा चालव 
परंपरेचा काष्टा न सोडता 
आधुनिकतेचा गिअर टाक
शेवटी काय तर आपली संस्कृतीच आहे 
स्त्रियांना पुजणारी 
संस्कृती जगली तरच स्त्री जगेल 
संस्कृती सलामत तो स्त्रिया पचास, 
नाही का?

 

बातम्या आणखी आहेत...