आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रीचं शरीर म्हणजे फक्त पुरुषांच्या मालकीचं एक लैंगिक खेळणं असतं, अशी बहुसंख्य पुरुषांची गैरसमजूत असते. म्हणून आपापल्या कुटुंबातल्या, जातीतल्या, जमातीतल्या, धर्मातल्या, देशातल्या स्त्रियांच्या लैंगिकतेवरही फक्त पुरुषांचाच हक्क असतो, असंही त्यांना वाटतं! आमच्या मालकीच्या बायांवर आम्ही वाट्टेल ते अत्याचार करू, पण बाहेरच्या लोकांनी त्यांच्यावर प्रेम जरी केलं तरी तो आमचा आणि अर्थातच आमच्या जातीचा, धर्माचा, देशाचा अपमान समजण्यात येईल. आमचा अपमान करणाऱ्यांच्या बायकांचा आम्हीही अपमान करणार आणि सूड उगवणार, असं जणू काही सगळ्या पुरुषांनी ठरवलेलं आहे! जगभरात अनेक वेळा अनेक ठिकाणी पुरुष एकमेकांच्या मालकीच्या स्त्रियांवर अन्याय, अत्याचार करून एकमेकांचा बदला घेत असतात. शत्रुपक्षातल्या स्त्रियांवर प्रत्यक्षात बलात्कार करूनच सूड घेतला जातो, पण आता सामाजिक माध्यमांचा वापर करूनदेखील असे हल्ले व्हायला लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून सोशल मीडियावर अशाच काही हल्ल्यांची उदाहरणं पाहायला मिळताहेत. त्याला निमित्त ठरले आहेत एका कवितेतले काही शब्द! 


चार वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या पाण्याविषयीच्या कवितेमुळे इतकी आग भडकेल असं कोणालाच वाटलं नसेल! दिनकर मनवर यांचा "दृश्य नसलेल्या दृश्यात' हा कवितासंगह मुंबई विद्यापीठाच्या तिसऱ्या वर्षाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात आहे. ‘पाणी कसं असतं’ ही त्यातलीच एक कविता. या कवितेत पाण्याच्या विविध रूपांविषयी आणि त्याच्या भोवतीच्या राजकारणाविषयी कवीने भाष्य केलेलं आहे. कवीने पाण्याला अनेक उपमादेखील दिलेल्या आहेत. त्यापैकी एक उपमा आहे आदिवासी मुलीच्या स्तनांची. त्या कवितेतल्या - "आदिवासी पोरीच्या स्तनासारखं जांभळं' या एका ओळीमुळे राज्यभरातल्या आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या! ‘कवितेमध्ये उल्लेख करण्यासाठी तुम्हाला "आमच्या' मुलींचेच स्तन आठवले का?’ असा प्रश्न विचारत आदिवासी संघटनांनी कवितेवर आक्षेप घेतला. ही कविता म्हणजे आदिवासी स्त्रियांचा विनयभंग आहे, कविता अश्लील आहे, असे अनेक आरोप कवितेवर व्हायला लागले. मुंबई विद्यापीठाच्या कक्षेत येणाऱ्या डहाणू, पालघर अशा आदिवासी क्षेत्रातल्या अनेक महाविद्यालयांमध्ये या कवितेचा निषेध करण्यात आला, कवितेच्या प्रतींची होळी करण्यात आली आणि ती कविता अभ्यासक्रमातून काढून टाकावी, अशी मागणी केली गेली. 

 

इतक्या भडकलेल्या भावना पाहूनच विद्यापीठाने ती कविता ताबडतोब अभ्यासक्रमातून काढून टाकली. पण तेवढ्याने आदिवासी समाजाचे समाधान होईना! काही राजकीय पक्षांच्या सोबतीने आदिवासी संघटनांनी मोर्चा काढला आणि कवीला अटक करावी, एक कविताच नव्हे, तर संपूर्ण पुस्तकच रद्द करावे, अशा मागण्या पुढे यायला लागल्या. ‘आम्ही गप्प बसणार नाही, आदिवासी समाजाचे लचके तोडणाऱ्या त्या हलकट कवीला आमच्या ताब्यात द्या, आम्हाला त्याचे हातपाय तोडायचे आहेत,’ अशाही मागण्या मोर्चेकरी करत होते. या मोर्चाच्या बातम्या वृत्तपत्रांतून आणि वृत्तवाहिन्यांवर झळकायला लागल्या. पण ज्या कवितेविषयी इतका बोलबाला चाललेला होता, ती कविता अनेकांनी वाचलेलीच नव्हती. म्हणून अभ्यासक्रमातून रद्द झालेली ती कविता सोशल मीडियावर बरेच लोक एकमेकांना पाठवायला लागले. जसजशी चर्चा वाढत गेली तसतशी कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला लागली आणि - ‘या कवितेत तर काहीच आक्षेपार्ह नाही’ असं म्हणणारे लोकसुद्धा वाढायला लागले. अर्थातच असं म्हणणारे हे लोक बिगर आदिवासी वर्गातले होते! कवितेला विरोध करणारे आदिवासी आणि कवितेला पाठिंबा देणारे बिगर-आदिवासी असे दोन तट पडले. अभ्यासक्रमातून तडकाफडकी कविता काढून टाकल्यामुळे अनेक साहित्यिक मंडळीसुद्धा नाराज झाली होती. हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे, असंदेखील अनेकांना वाटत होतं. कवीला पाठिंबा देण्यासाठी हे लोक जेव्हा कवितेच्या बाजूने लिहायला लागले तेव्हा स्वत:ला आदिवासी म्हणवणारे लोक त्यांना विचारायला लागले – "तुमच्या' आयाबहिणींच्या स्तनाविषयी आम्ही बोलू का? थोडक्यात, आता हा वाद एका कवितेपुरता उरला नाही, तर तो "तुमच्या बायका' आणि "आमच्या बायका'पर्यंत गेला. 


बिगर आदिवासी कवीने आदिवासी बाईच्या स्तनाचा उल्लेख करून एक प्रकारे आदिवासी पुरुषांचा अपमान केलेला आहे, म्हणून आदिवासी पुरुषांनी त्याचा बदला घेण्यासाठी बिगरआदिवासी बायांच्या स्तनाविषयी बोलायचे... या लढाईमध्ये कवितेचा आशय काय आहे, कवितेत पाण्याचं वर्णन केलं आहे की स्तनांचं – हे सगळे मुद्दे हरवूनच गेले. खरं म्हणजे कवितेतल्या उपमा, उत्प्रेक्षा आणि त्यामुळे कवितेचा एकूण आशय अनेकपदरी असू शकतो आणि तो वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या माणसांना वेगवेगळ्या प्रकारे उमजतो. त्यातला एकुलता एकच अर्थ योग्य आणि बाकी सगळे अर्थ मात्र अयोग्य - असा आग्रह धरणे वाङ्मयाच्या आकलनासाठी हानिकारक आहे. 


कवितेची बाजू घेणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडणाऱ्या काहींनी कवितेसोबत नग्नतेविषयीचे विचारही सोशला मीडियावर मांडायला सुरुवात केली. रेणुका खोत आणि रेशमा रामचंद्र या दोघींनी कवीची बाजू घेत असतानाच काही नग्न चित्रेदेखील आपापल्या फेसबुकच्या भिंतीवर लावली होती. पण रेणुका खोतच्या फेसबुक अकाउंटला काही जणांनी रिपोर्ट केले आणि तिची पोस्ट फेसबुकने काढून टाकली. शिवाय तिला आठ दिवस स्वत:चे अकाउंट वापरता येणार नाही, असा दंड करण्यात आला. कवीच्या बाजूने बोलणाऱ्यांंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरसुद्धा गदा आली! 


कवितेला विरोध करणारे लोक अजूनही असा एक तर्क मांडत आहेत की, जर ही कविता वर्गात शिकवली गेली असती तर आदिवासी विद्यार्थिनींना किंवा शिक्षिकांना शरम वाटली असती. महाविद्यालयातल्या वर्गाखोलीच्या नियंत्रित वातावरणातसुद्धा प्रौढ वयातले विद्यार्थी जर एखाद्या कवितेतल्या उपमा निरामय मनाने समजून घेऊ शकत नसतील तर आपली शिक्षणप्रक्रिया किती खालच्या थराला पोचल्याचं ते लक्षण आहे? ‘स्तन’ हा अवयव फक्त लैंगिकतेशीच संबंधित नाही, हे समजावून घेण्याची या कवितेच्या निमित्ताने एक चांगली संधी उपलब्ध झालेली होती. साधारण पंचवीस वर्षांपूर्वी उर्मिला पवार यांच्या ‘कवच’ या कथेतल्या "चोळीतले आंबे' या शब्दांवरूनसुद्धा असाच वाद निर्माण झाला होता. त्या वेळी एसएनडीटी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लावलेल्या "चौकट' पुस्तकातली ही कथा काढून टाकावी म्हणून अभाविपतर्फे आंदोलन करण्यात आले होते. आंबे विकणाऱ्या एका खेडूत महिलेला तिच्याकडे आलेले ग्राहक कसा त्रास देतात त्याविषयीची ही कथा "अश्लील' असल्याचे आंदोलकांचे म्हणणे होते. पण त्यावेळी अनेक विद्यार्थिनींनी विद्यापीठाला कळवले होते की, ‘कवच’ कथेमुळे कष्टकरी वर्गातल्या स्त्रियांच्या लैंगिक शोषणाची व्यथा आमच्यापर्यंत पोचली! ‘चौकट’ कथासंग्रहातल्या स्त्रीवादी जाणिवांच्या इतरही कथांमुळे ‘घरं तोडण्याचे’ कुसंस्कार एसएनडीटीच्या विद्यार्थिनींवर होतील, असे अभाविपने म्हटले होते. 


या निमित्ताने महाराष्ट्रातल्या अनेक विचारवंतांनी, साहित्यिकांनी आणि स्त्रीवादी महिलांनी जागोजागी चर्चा घडवून आणल्या होत्या. त्यामुळे एक वैचारिक दबाव तयार झाला आणि पुस्तक अभ्यासक्रमातून काढले गेले नाही. पाठ्यपुस्तके म्हणजे एक महत्त्वाचे प्रसारमाध्यम असते, याची जाणीव ठेवली तर श्लील-अश्लीलतेच्या वादांना न घाबरता संस्कारक्षम पिढीशी संवाद साधण्याची संधी घेता येऊ शकते. पण मुळात त्यासाठी स्त्रियांच्या शरीरावर फक्त स्त्रियांचाच अधिकार असतो, या तत्त्वावर शैक्षणिक धोरण आखणाऱ्यांचाही विश्वास असायला हवा! नाहीतर स्त्रियांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुरुष पुन्हापुन्हा स्वत:च्याच मान-अपमानाचे डाव खेळत राहतील आणि स्त्रिया मात्र या माध्यमाच्या कक्षेतून बाहेर फेकल्या जातील.

- वंदना खरे, मुंबई
vandanakhare2014@gmail.com

बातम्या आणखी आहेत...