Home | Magazine | Madhurima | Vandana Khare writes about women and smartphones

स्मार्टफोन आणि दृष्टिकोन

वंदना खरे | Update - Aug 07, 2018, 06:38 AM IST

मुलींच्या भल्यासाठी म्हणून त्यांना स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण करायच्या संधी नाकारल्या जातात.

 • Vandana Khare writes about women and smartphones

  मुलींच्या भल्यासाठी म्हणून त्यांना स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची ओळख निर्माण करायच्या संधी नाकारल्या जातात. कुटुंबातून, शाळेतून, प्रसारमाध्यमांतून आणि एकूणच समाजातून त्यांना मोबाइल फोन तंत्रज्ञानाच्या जोखमीपासून दूर ठेवायचे प्रयत्न केले जातात, काय आहे यामागचं वास्तव?


  समाजात दंगलींचे प्रमाण वाढण्याचे कारण? स्मार्टफोन
  स्त्रियांवरच्या वाढत्या अत्याचारांचे कारण? स्मार्टफोन
  तरुणांमधल्या व्यसनाधीनतेचे कारण? स्मार्टफोन
  स्मरणशक्ती कमी होण्याचे कारण? स्मार्टफोन
  आपल्या देशात सध्या ज्या काही वाईट घटना घडत आहेत, त्या सगळ्याचे खापर फोडायला एक नवा व्हिलन गेल्या काही वर्षांपासून मिळालेला आहे. तो म्हणजे स्मार्टफोन! खरं तर आपल्या देशात मोबाइल फोन वापरात येऊनही आता वीसेक वर्षे उलटली आहेत. त्या काळीसुद्धा मोबाइल फोनच्या या तंत्रज्ञानाने माहिती आणि परस्पर संवादाच्या क्षेत्रात क्रांतीच घडवली होती. पण तेव्हा या तंत्रज्ञानाच्या दुष्परिणामांची फारशी चर्चा होत नसे. आज मात्र स्मार्टफोनचे समाजावर किती नकारात्मक परिणाम होत आहेत त्याविषयी वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, रेडिओ अशा निरनिराळ्या माध्यमांतून सतत गवगवा होत असतो! अगदी घराघरातदेखील मुलांनी आणि खासकरून मुलींनी स्मार्टफोन वापरावा की नाही, किती वेळ आणि कोणत्या कारणासाठी वापरावा, याविषयी खूपच वादविवाद झडत असतात. वेगवेगळ्या सोशल मीडियावरून तरुण मुलींना हिंसेचे कसे लक्ष्य बनवले जाते, त्याची उदाहरणे देऊन प्रसारमाध्यमांतून स्मार्टफोनविरुद्ध एक प्रकारचे घबराटीचे वातावरण निर्माण केले जात असते. पण स्मार्टफोनच्या उपयोगातून तरुण मुलींसाठी वैयक्तिक विकासाच्या किती शक्यता उपलब्ध झाल्या आहेत, त्याविषयीच्या यशोगाथा मात्र प्रसारमाध्यमे सांगत नाहीत. सायबर स्पेसमध्ये होणारा हिंसाचार प्रत्यक्षात होणाऱ्या हिंसाचारापेक्षा जास्त आहे – याबद्दल काहीही पुरावा उपलब्ध नाही. स्मार्टफोनचे केवळ दुष्परिणामच असतात का? खरं तर स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानाच्या सुविधा वापरून कौन्सिलिंगसारख्या उपयुक्त सेवा आणि माहिती पुरवण्याची अनेक उदाहरणे भारतातही आहेत. स्मार्टफोनचे तंत्रज्ञान बोटावर खेळवणाऱ्या नव्या पिढीचे स्वत:चे त्याबद्दलचे अनुभव कसे आहेत, त्यातले किती अनुभव सकारात्मक आहेत आणि नकारात्मक अनुभव टाळण्यासाठी ते काय उपाय करत आहेत, या अनुषंगाने मात्र फारसे संशोधन झालेले दिसत नाही.


  एकेकाळी खूपच महाग असलेले हे वैयक्तिक वापराचे फोन जसजसे स्वस्त होत गेले, तसतसे अगदी सर्वसामान्य माणसांच्या हातातसुद्धा हे तंत्रज्ञान पोहोचले. गेल्या काही वर्षांत जसा मोबाइल फोन्सचा वापर वाढत गेला आहे, त्याच बरोबरीने फोनचा उपयोग करून कायकाय करता येईल, त्याच्या शक्यतादेखील वाढत गेलेल्या आहेत. स्मार्टफोनने बातम्या, गाणी, फोटो, व्हिडिओ अशा सगळ्याच गोष्टींना प्रत्येकाच्या अगदी बोटाच्या टोकाशीच आणून ठेवले आहे. मुख्य म्हणजे फोनचा वापर करून व्हाॅट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा सोशल मीडियातून घरबसल्या जगाशी जोडलेले राहता येते. ज्या फोनमध्ये या सोयी नसतील, अशा बेसिक फोनला आता ‘डब्बाफोन’ म्हटले जाते. आपल्या देशात स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांपैकी पन्नास टक्के लोकांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी आहे. स्मार्टफोनमुळे स्वत:च्या शारीरिक आणि भौगोलिक मर्यादांना ओलांडून जाऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाची आपल्याला हवी तशी ओळख घडवण्याच्या अमाप शक्यता आजच्या तरुणांच्या हातात मिळालेल्या आहेत. त्याचा परिणाम स्त्री-पुरुष समता, लैंगिकता आणि आपल्या हक्कांची जाणीव अशा आयुष्यातल्या विविध घटकांवर होतो आहे. त्यातून आजच्या तरुण पिढीची काही नवीनच संस्कृती घडायला लागलेली आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न मुंबईतल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि युनिसेफ (महाराष्ट्र) यांनी एका संशोधन प्रकल्पाद्वारे केला. हे संशोधन मुंबईतल्या एका विभागातल्या कष्टकरी वर्गातल्या मुलामुलींपुरते मर्यादित होते. पण या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं आहे की, त्या निमित्ताने किशोरवयीन मुलामुलींचे हक्क, लैंगिकतेविषयी कुटुंबाचे-समाजाचे त्यांच्यावर असलेले नियंत्रण, सक्षमीकरण तसेच ते घेत असलेली जोखीम अशा विविध अनुभवांच्या संदर्भात त्यांचे स्मार्टफोनशी असलेले नाते पडताळून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे.


  या संशोधनात असे लक्षात आले आहे की, स्मार्टफोनमुळे तरुण पिढीला जे स्वातंत्र्य मिळते त्यामुळे त्यांच्यावरचे नियंत्रण आपल्या हातून निसटत चालल्याची मागच्या पिढीला भीती वाटत आहे. शिवाय मागच्या पिढीला स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानावर फारशी पकड मिळवता आलेली नाही, त्यामुळे त्यांना तरुण पिढीच्या भविष्याबद्दल खूपच काळजी वाटत असते. तरुण मुली थोड्याफार प्रमाणात स्वत:च्या खासगीपणावरचे पालकांचे नियंत्रण मान्य करत असल्या तरी मुलगे मात्र या बाबतीत पालकांना अजिबात जुमानत नाहीत. मुलींना घर आणि शाळा अशा दोन्ही ठिकाणी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची खास ओळख निर्माण करायच्या संधी नाकारल्या जातात. मुलींचे संरक्षण करण्यासाठी कुटुंबातून, शाळेतून, प्रसारमाध्यमांतून आणि एकूणच समाजातून त्यांना मोबाइल फोन तंत्रज्ञानाच्या जोखमीपासून दूर ठेवायचे प्रयत्न केले जातात. वरवर पाहता मुलींच्या भल्यासाठी हे सगळे आहे, असे दाखवले जात असले तरी महिलांच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवायची पितृसत्ताक मानसिकताच याच्या मुळाशी असते. दुर्दैवाने त्यामुळे मुलींना व्यक्तिमत्त्व विकासाच्या संधी कमी मिळतात आणि त्याचा दीर्घकालीन परिणाम म्हणजे त्या जास्तच असुरक्षित बनतात. याच्या अगदी उलट विचार मुलग्यांना फोनच्या वापराचे स्वातंत्र्य देताना केला जातो. मुले जर घरात बसून फोनचा वापर करत असतील तर ती विनाकारण बाहेर भटकणे, व्यसने, मारामारी करणे किंवा मुलींच्या मागे लागणे अशा उपद्व्यापापासून दूर राहतील, असा विचार केला जातो. मुलींवर असणाऱ्या नियंत्रणातूनही मार्ग काढून त्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून बनवल्या जाणाऱ्या सामाजिक संदेशांचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण मुलगे मात्र प्रसारमाध्यमातून मांडल्या जाणाऱ्या पुरुषार्थाच्या चुकीच्या कल्पनांना जास्त प्रमाणात बळी पडतात, असे या संशोधनातून लक्षात आले आहे.


  सध्या स्मार्टफोनमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत असे वाटते आहे, त्या खरं तर समाजातल्या पितृसत्ताक विचारसरणीमुळेच अस्तित्वात आलेल्या आहेत. मुलींना स्मार्टफोन हाताळायची संधी नाकारल्यामुळे या समस्या सुटणार नाहीत. यावर उपाय म्हणून सर्वांनीच ऑनलाइन अवकाशातली जोखीम कमी होईल आणि सुरक्षितता वाढेल यासाठी उपाययोजना अमलात आणायचे प्रयत्न वाढवायला हवेत. सरकारी धोरणे, शास्त्रज्ञ, माध्यम तंत्रज्ञ, माध्यमांचे ग्राहक अशा सर्वांचे विचार आणि वागणूक तरुण पिढीवर नियंत्रण करण्याऐवजी त्यांच्या हक्कांचा विचार करण्यावर केंद्रित होणे गरजेचे आहे, असे या संशोधनाने सुचवलेले आहे.

  - वंदना खरे, मुंबई
  vandanakhare2014@gmail.com

Trending