आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकत्वाची मानसशास्त्रीय उकल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक मुलाची वाढ ही एक लोभस प्रक्रिया असते. मात्र, अनेकदा पालकांना या प्रक्रियेचे आकलन होत नाही. ते होत नाही, त्यामुळे पालकत्वाचा अर्थही उमगत नाही आणि जबाबदारीचे भानही येत नाही. अशा प्रसंगी अलका काकडेलिखित प्रस्तुत पुस्तक सहृद मार्गदर्शकाची भूमिका बजावते.


विविध विषयांवर व्याख्याने, मुलाखती महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतात आणि परदेशात जाऊन पालकत्वावर शिबिरे - कार्यशाळा यशस्वीपणे घेणाऱ्या सोलापूर येथील मानसशास्त्राच्या अभ्यासक अलका काकडे यांचे “मुलांच्या अडचणी सोडवताना’ हे अलीकडेच प्रकाशित झालेले पुस्तक अत्यंत जिव्हाळ्याने पालकत्वाची मानसशास्त्रीय उकल करते. हा आहे २२ लेखांचा संग्रह. त्यामधून मुलांच्या सर्वांगीण विकासासंदर्भात घडून येणाऱ्या स्थित्यंतराविषयी लेखिकेने केलेल्या सखोल चिंतनाचे वाचकांना दर्शन घडत राहते.


भलतेसलते तर्क-विर्तक न करता मुले आपले काय म्हणणे मांडतात, याकडे पालकांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे, हा या पुस्तकाद्वारे अलका काकडे यांनी मांडलेला मध्यवर्ती विचार आहे. त्यालाच अनुसरून, पालकत्व निभावताना अधिकारवाणीची भाषा न करता प्रेमाने मुलांचे मन जिंकावे, हा लेखिकेने दिलेला सल्ला या भूमिकेचे सार्वकालिन महत्त्व अधोरेखित करणारा आहे. याचबरोबर पालकांनी  मुलांच्या नैसर्गिक वाढीवर जबरदस्तीने प्रयोग करू नये, त्यांच्या प्रगतीच्या कक्षा अरुंद करू नयेत, नपेक्षा तत्परता, समयसूचकता  ठेवावी आदी मुद्दे सविस्तरपणे मांडून काकडे यांनी पालकांमध्ये सजगता निर्माण करणारे दिशादर्शन या पुस्तकाच्या माध्यमातून साधले आहे. 


मुले वयात येताना म्हणजे बाल्यावस्थेकडून पौगंडावस्थेत प्रवेश करताना किंवा ऐन तारुण्यात असताना त्यांच्यामध्ये वेगाने शारीरिक बदल होतात, ते होत असताना पालकांनी मैत्रीच्या नात्याने त्या काळातले मानसिक-भावनिक ताण  सांभाळून घ्यावे, असे सूचित करून या नाजूक काळात मुलांना आरोग्याविषयी, आहाराविषयी, खेळाविषयी मार्गदर्शन करणे यास पालकांचे प्राधान्य असले पाहिजे, हे लेखिकेने पुरेशा उदाहरणांसह या पुस्तकात स्पष्ट केले आहे. 
आजच्या काळात सभोवती अनेक गम्य-अगम्य घटना घडत आहेत. हजारो प्रश्नांचे जाळे आपले दैनंदिन जीवन वेढून आहे. अशा वेळी मुलांइतकेच पालक सैरभैर होण्याची शक्यता आहे. हे वास्तव ओळखून  काकडे यांनी पालकांकडे सबुरी आणि समतोल विचारांचा आग्रह बोलून दाखवला आहे. मुलांच्या बौद्धिक क्षमतेचा, मानसिक क्षमतेचा व भावनिक क्षमतेचा विचार करूनच करिअर निवडीचा सल्ला दिला आहे. मानसिक स्वास्थ्य देणारे करिअर महत्त्वाचे असते, हा यामागचा त्यांचा मोलाचा विचार आहे.


हा प्रगत तंत्रज्ञानाचा काळ आहे. परंतु दुसऱ्या बाजूला स्त्री-पुरुष असमानता, मुलगा-मुलगी भेद पाळले जात असल्याने  माणसाचे हे एकप्रकारे नैतिक अधःपतन होत आहे, या वर्तमान वास्तवाकडे काकडे यांनी पुस्तकात आवर्जून लक्ष वेधले आहे.  इंटरनेट आणि  प्रसारमाध्यमांच्या वाढत्या प्रसारामुळे नव्या-जुन्या पिढीसमोर यापूर्वी कधीही न अनुभवास आलेले प्रश्न आजचे समाजजीवन व्यापून आहेत. अशा प्रसंगी प्रथम आपण इंटरनेटवरील माध्यमांचा संयमी वापर करून तरुण पिढीला वेळेप्रसंगी मार्गदर्शन करणे नितांत गरजेचे असल्याकडेही लेखिकेने लक्ष वेधले आहे. पालक आणि मुलांमध्ये वैचारिक पातळीची मतभिन्नता कायम असते. त्या मतभिन्नतेचे स्वरूप काय असते,  त्यावर कोणते उपाय करता येतात, याविषयीचे अत्यंत सोप्या भाषेत विवेचन हेही या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य आहे.  पालकांनी वैश्विक घडामोडींबाबत सजग राहून नकळत सकारात्मक मूल्यांचे बीजारोपण करावे. मुख्य म्हणजे, मुलांना नैसर्गिकरित्या उमलू द्यावे, फुलू द्यावे हा लेखिकेने व्यक्त केलेला विचार नित्याचा भासला तरीही दुर्लक्षिण्यासारखा नक्कीच नाही. 


हे पुस्तक जितके शरीर-बुद्धीने सदृढ मुला-मुलींचा वेध घेते, तितकेच गतिमंद मुला-मुलींच्या वाढीवरही यथायोग्य मार्गदर्शन करते. त्यातूनच गतिमंद मुलांच्या पालकांमध्ये धैर्य, आत्मबळ, जिद्द, निर्माण होण्याच्या शक्यताही बळवतात . मूल होणं सोपं असलं, तरी त्याचे पालनपोषण, निकोप वाढ, त्याच्या समस्या, गरजा आत्मसात करुन पालकांनी  स्वतःमध्ये आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे, कारण पालकत्वाची जबाबदारी आयुष्यभर न संपणारी गोष्ट आहे,असेही लेखिकेने नमूद केले आहे. 


पुस्तकाला लेखिका शोभा भागवत यांचीअभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. प्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड यांनी अलका काकडे यांच्या विचारांची मुक्तकंठाने पाठराखण केली आहे. सोलापूर येथील सुविद्या प्रकाशनाने वर्तमानातल्या अत्यंत कळीच्या प्रश्नावर पुस्तक प्रकाशित करून समाजाच्या उभारणीस मोठाच हातभार लावला आहे. विषयाचे गांभीर्य आणि अलका काकडे यांची तितकीच गांभीर्यपूर्ण मांडणी यामुळे पुस्तकाला मोठे संदर्भ आणि संग्राह्य मूल्य आलेले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...