आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध 'ओपिनियन पोल'चे कलही तळ्यात-मळ्यात, युती 180-232, तर आघाडीला 48 ते 105 जागांचा अंदाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला दोन दिवस उरले असताना विविध संस्थांनी आपले ओपिनियन पोल जाहीर केले आहेत. निवडणूक घोषित होताच काही ओपिनियन पोल आले होते. आता मतदानाच्या तोंडावरही हे ओपिनियन पोल आले आहेत. मतदानापूर्वी अशा प्रकारचे ओपिनियन पोल जाहीर करणे तांत्रिकदृष्ट्या योग्य असले तरी नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. विशेषत: सोशल मीडियावर यावर घमासान सुरू आहे. ओपिनियन पोल वेगवेगळ्या संस्थांनी केले असून त्यांचे या संदर्भात एकमत दिसत नाही. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ४८ ते १०५ अशा जागा देण्याइतकी तफावत या पोलमध्ये दिसते आहे. महाराष्ट्रात एबीपी माझा आणि सी व्होटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलच्या सर्वेक्षणात एकूण २८८ जागांपैकी महायुतीला १९४ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाआघाडीला ८६ जागा मिळतील आणि इतर पक्ष व अपक्षांना ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्वेक्षणात राज्यात भाजप १३४ जागांसह सर्वात मोठा पक्ष, शिवसेना ६० जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा, काँग्रेस ४४, राष्ट्रवादी काँग्रेस ४२ जागांसह चौथ्या क्रमांकावर राहील असे या अंदाजात म्हटले आहे. दरम्यान, रिपब्लिक भारत-जन की बातच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला २२५ ते २३२ जागा, महाआघाडीला ५५ जागा, तर अपक्ष व इतरांना ३३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. न्यूज एक्स - पोलस्ट्रॅटच्या मतदानपूर्व जनमत चाचणीनुसार (ओपिनियन पोल) भाजपला १३० ते १४०, शिवसेना ५० ते ६०, काँग्रेस ४५ ते ५५, राष्ट्रवादी ४० ते ५० आणि इतरांना १० ते २० जागा मिळू शकतात. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चांगलीच चुरस निर्माण झाली असून या समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे.

हरियाणातही भाजप पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज
जन की बातने घेतलेल्या ओपिनियन पोलनुसार एकूण ९० जागा असलेल्या हरियाणातही सत्ताधारी भाजपला ५८ ते ७० जागा, काँग्रेसला १२ ते १५ जागा, जननायक जनता पार्टीला ५ ते ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ओपिनियन पोल जाहीर करणे गैर नाही
विधानसभा निवडणूक सध्या अतिशय महत्त्वाच्या टप्यावर असताना विविध संस्थांनी जारी केलेेले 'प्री पोल अोपिनियन' वैध असल्याचा निर्वाळा निवडणूक अायोगाने दिला अाहे. 'दिव्य मराठी'ने 'प्री पोल अोपिनियन' विषयांच्या नियमांचे सत्य जाणून घेतले.

महाराष्ट्र व हरियाणा विधानभेसाठी २१ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी मतदान घेतले जाणार अाहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला अाहे. अशा स्थितीत विविध संस्थांनी 'कौल' जारी केला आहे. मतदानानंतर अंदाज वर्तवला जावा असे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. २०१७ दरम्यानही यासंदर्भात नियमावली जारी केली होती. असे असताना अंदाज का दाखवले गेले..? यासंदर्भात 'दिव्य मराठी'ने तपास केला तर मतदानाच्या ४८ तास आधी 'ओपिनियन पोल' प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, 'यामध्ये काहीच गैर नाहीये. मतदान २१ ऑक्टोबरला होणार आहे. त्याच्या ४८ तास आधी अंदाज वर्तवला जाऊ शकतो.' तसेच सेवानिवृत्त मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्याशी संपर्क केला तर त्यांनीही नियमानुसारच अंदाज वर्तवल्याचे म्हटले आहे.

कोणत्या ओपिनियन पोलमध्ये कुणाला किती जागा?
न्यूज एक्स पोलस्ट्रॅट
भाजप : 130-140
शिवसेना : 50-60
काँग्रेस : 45-55
राष्ट्रवादी : 40-50

सी व्होटर आणि जन की बात
पक्ष - सी - वोटर - जन की बात
महायुती - 194 - 224-232
महाआघाडी - 86 - 48-52
अपक्ष/इतर - 08 - 08 : 11

2014 पक्षीय बलाबल
भाजप - 122
शिवसेना - 63
काँग्रेस - 42
राष्ट्रवादी - 41

बातम्या आणखी आहेत...