आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयित माओवादी वरवरा राव यांना 8 दिवसांची पोलिस कोठडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - माअाेवाद्यांशी संबंधांचा अाराेप असलेले तेलगू कवी आणि लेखक वरवरा राव यांना २६ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने रविवारी दिला. १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे उसळलेल्या दंगलीस कारणीभूत असल्याच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून राव यांना पुणे पोलिसांनी शनिवारी रात्री हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली हाेती. 

राव यांचा नक्षलवादी कारवायांत सहभाग आहे. भूमिगत नक्षलवाद्यांच्या ते संपर्कात आहेत. राव हे नक्षलवाद्यांचा भूमिगत नेता गणपतीच्या संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. विविध राज्यांतील विद्यार्थ्यांना दहशतवादी प्रशिक्षणासाठी नक्षलवाद्यांकडे पाठवणे, काश्मीरमधल्या फुटीरवाद्यांना अतिरेकी हल्ल्यांच्या प्रशिक्षणासाठी मदत करणे अशा देशविरोधी कारवायांमध्ये राव यांचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पुणे पोलिसांनी ऑगस्टमध्ये देशभरात छापे टाकून हैदराबाद, मुंबई, दिल्ली व गुरुग्राम येथून राव यांच्यासह संशयित माओवाद्यांना ताब्यात घेतले होते. मात्र, २९ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने राव यांना त्यांच्या राहत्या घरी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. हैदराबाद उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपताच पुणे पोलिसांनी जलद हालचाली करून राव यांना ताब्यात घेत रातोरात पुण्यात आणले आणि रविवारी त्यांना विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्यासमाेर हजर केले. 

 

माओवादी नक्षलवाद्यांना नेपाळ आणि मणिपूर येथील बेकायदा शस्त्रास्त्रे व्यापाऱ्यांकडून शस्त्र खरेदीसाठी मदत केल्याचा गंभीर आरोप राव यांच्यावर आहे. शहरी नक्षलवाद्यांना आर्थिक मदत पुरवण्याची जबाबदारी राव पार पडत असत, अशीही पोलिसांची माहिती आहे. दरम्यान, राव यांनी या आरोपांचे खंडन केले आहे. फॅसिस्ट धोरणाच्या विरोधात लढा देणे म्हणजे कट असू शकत नाही, असे राव यांचे म्हणणे आहे. 

 

हैदराबाद उच्च न्यायालयाने नाकारली स्थानबद्धतेची मुदतवाढ 
हैदराबाद उच्च न्यायालयाने राव यांच्या स्थानबद्धतेची मुदत वाढवण्यास १५ नोव्हेंबरला नकार दिला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याची संधी पुणे पोलिसांना मिळाली. तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पाटील यांची टीम शनिवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास राव यांच्या हैदराबाद येथील घरी पोहोचली. या वेळी राव यांच्या समर्थकांनी निवासस्थानाबाहेर गर्दी करत पोलिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पुढच्या तासाभरातच सर्वांना चकवा देत पुणे पोलिसांनी राव यांना निवासस्थानातून बाहेर काढले आणि रात्रीत त्यांना पुण्यास घेऊन आले. दरम्यान, राव यांना ताब्यात घेण्यासाठीची आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता पुणे पोलिसांनी केली नसल्याचा आरोप राव यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...