आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाडव्याचा चिरंतन गोडवा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वासंती दुर्गाडे

स्त्रियांच्या मनात काय सुरू आहे हे ब्रह्मदेवालाही सांगता येणार नाही असं गमतीनं म्हणलं जातं. मात्र आपल्या आयुष्यातल्या स्त्रीचं थोडं निरीक्षण केलं तर त्यांची आवड-निवड सहज कळू शकते. आपल्या बायकोच्या मनातली आवड ओळखून ती आवड जोपासण्यासाठी तिला पाडव्याला भेटवस्तू देणाऱ्या नवऱ्याची ही आठवण...   
 
लग्नानंतरचा पहिला पाडवा म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यातील बदलाचा महत्त्वाचा टप्पा. नवीन लग्न झालेल्या प्रत्येकीच्या आयुष्यात गोडवा आणणारा सण. अशाच पहिल्या पाडव्याने माझ्याही आयुष्याला कलाटणी दिली. माझे लग्न ऑगस्टमध्ये झाले. पती नोकरीनिमित्त  कर्जतला, तर मी राजगुरूनगरला कार्यरत होते. दीड महिन्यानंतर दिवाळीची सुटी लागली. आम्ही दोघेही आमच्या गावी वाल्ह्याला  गेलो. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात आलेली पहिली दिवाळी. गाव, घरातल्या व्यक्ती, दोन्हीही माझ्यासाठी नवीन होते. आमचं एकत्र कुटुंब होतं त्यामुळे कोणत्याही गोष्टींबद्दल फारसं उघडपणे बोलता येत नव्हतं. पहिल्या पाडव्याचा मला प्रचंड उत्साह होता. पाडव्याचा दिवस उजाडला. नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्या नवऱ्याने पिण्यासाठी पाणी मागितले. मी त्यांना द्यायला गेले, पण त्यांना काहीतरी बोलायचं होतं हे जाणवलं. पण घरात माणसं असल्यामुळे त्यांना बोलताच आलं नाही. पाण्यात काहीतरी पडलंय या बहाण्याने त्यांनी मला परत आवाज दिला. मी पाण्यात काय बर पडलं असेल या विचारात गेले तर यांनी मला हळूच सांगितलं की, आज आपला पहिला पाडवा आहे, तुला काय गिफ्ट हवं? मला खूप हसू आलं. मी बोलले, माझ्या मनातलं तुम्ही जाणता. हीच तुमची खरी कसोटी आहे. जे योग्य वाटते ते आणा. माझ्या आवडी-निवडी, विचार करण्याचा कल हा इतरांपेक्षा थोडा वेगळा आहे हे त्यांनी जाणले होते. संध्याकाळी मी त्यांना ओवाळल्यानंतर त्यांनी लगेच मला गिफ्ट ताटात ठेवले. उघडून बघते तर काय एक गुलाबी रंगाची डायरी होती. माझे पती म्हणाले, तुला कविता करण्याची आवड आहे. आजपासून तुझ्या कविता डायरीत लिहून ठेव. तुझ्यातली कवयित्री, लेखिका मला जपायचीय. 

त्यांचे हे शब्द ऐकून माझे डोळे आनंदाने पाणावले. ही डायरी मला सोन्याच्या गिफ्टपेक्षाही महत्त्वाची वाटली. माझ्या पतीने पाडव्याच्या दिवशी डायरी देऊन एक प्रकारे नव्याने लिहिण्यासाठी तर मला प्रोत्साहन दिलेच, पण माझ्यातल्या लेखिका आणि कवयित्रीचा सन्मानदेखील केला. आजही त्या डायरीची पूजा मी प्रत्येक पाडव्याला करते. 

लेखिकेचा संपर्क- ९५५२५९३६७२