आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vasundhara Kashikar Writes About Iftikhar Imam Siddiqi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इरशाद : वो नहीं मिलता मुझे...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वसुंधरा काशीकर

इफ़्तिख़ार इमाम सिद्दिक़ी यांच्या या गझलेचा अनुभव ज्यांनी घेतला नाही, अशी माणसं फार कमी असतील. चित्रा सिंग यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स असलेल्या गझलांपैकी ही एक आहे. ती ऐकणं हा दिलकश अनुभव आहे, असं मी म्हणेन. माझी शिफारस म्हणून ही गझल जरूर ऐका. मुझे यकिन है, आप मुझे इस सिफारिश के लिए दुआ दोगे..!
माणूस प्रेमात पडला नाही, असं म्हणतो तो एक तर खोटं तरी बोलतो आहे किंवा तो ‘माणूस’ तरी नाही, असं समजावं. आणि बऱ्याचदा प्रेमात पडल्यावर प्रेमभंगाचा अनुभवही अनेकांना येतच असतो. या अपूर्णतेतून येणारी व्याकुळता कधी ना कधी प्रत्येकाने कमी-अधिक स्वरूपात अनुभवलेली असतेच. इफ़्तिख़ार साहेबांनी लिहिलेल्या ‘वो नहीं मिलता मुझे इसका गिला अपनी जगह..’ या गझलमध्ये जी खंत आहे, तिचा स्वीकार शायराने केला आहे. तो/ती माझी होऊ शकत नाही, याचं दु:ख एका बाजूला आणि त्याच्या आणि माझ्यातल्या दुराव्याची कारणं एका बाजूला. या गझलेतले दोन शेर मला खूपच आवडतात...


ज़िंदगी के इस सफ़र में 
सैंकड़ो चेहरे मिले, 
दिलकशी उनकी अलग 
पैकरा तेरा अ
पनी जगह।
आयुष्याच्या या प्रवासात शेकडो माणसं भेटली आणि त्यांचं सौंदर्य (दिलकशी) एका जागी, पण तुझं महत्त्व (पैकरा) दुसऱ्या जागी. तुझ्याशी झालेली भेट हीच वादळाची नांदी होती. येणाऱ्या भविष्याची नाराजी तुला भेटून मी ओढवून घेतली आणि तरीही तुझ्यापासून मी विलग होऊ नये, आपली ताटातूट होऊ नये, ही मी केलेली प्रार्थना एका बाजूला...‘तुझसे मिलकर आनेवाले कल से नफरत मोल ली’... वादळी व्यक्तिमत्व असलेल्या पुरुषाच्या प्रेयसीबाबत हे तंतोतंत लागू आहे. मला हिटलरची प्रेयसी इव्हा ब्राऊ आठवली. हिटलरने अगदी शेवटी, मरताना तिच्याशी लग्न केलं होतं म्हणे. कवयित्री मलिका अमरशेख यांचं ‘मला उद्ध्वस्त व्हायचंय’ वाचलं तर कळेल. हा शेर मला इव्हा ब्राऊ आणि मलिका अमरशेख यांच्यासाठी लिहिलेला वाटतो. कलंदर, प्रतिभावंत आणि बेपर्वाईने आयुष्य जगणाऱ्या कलाकारांच्या प्रेयसींसाठीही तो लागू आहे. माझ्या एका मित्रावर त्याच्या नात्यातल्या एका मुलीचं प्रेम होतं. आणि तिचं आपल्यावर किती प्रेम होतं, याची जाणीव त्याला तिच्या लग्नानंतर झाली. तो तिच्या घरी गेला. ती अर्थातच तिचं लग्न झाल्याने घरी नव्हती. तिच्या खोलीत गेल्यावर त्याला काही अदृष्य भावना जाणवल्या... त्याला अचानक जाणवलं की, ही मुलगी आपल्यावर किती प्रेम करत होती. हे जाणवणं शब्दात मांडता येत नाही.. ती परदेशात होती. त्याने तिला फोन केला आणि हे जाणवणं तिला सांगितलं. त्यावर, ‘मला आयुष्यात फक्त एकदा तुझ्या खांद्यावर डोकं ठेवायचं होतं..’ असं म्हणून ती रडू लागली... ‘ख्वाहिशों की भीड़ और उनकी सज़ा अपनी जगह’..!
शिक्षण, घर, पैसा, प्रतिष्ठा, मान्यता, ओळख, प्रेम या सगळ्या गोष्टींसाठी चाललेली, आयुष्यातली ही सतत काहीतरी मिळवण्यासाठी केलेली धडपड! हे धावणं.. मुक्कामाचं ठिकाण.. तिथवर पोचण्यासाठीचं अंतर.. ते अंतर पार करताना होणारी दमछाक.. हे सगळं कोणं करतंय..? पाय तर आपल्या जागी दिसताहेत आणि रस्ताही आपल्या जागीच आहे...
इफ़्तिख़ार इमाम सिद्दिक़ी यांनी लिहिलेल्या या गझलेचा अनुभव ज्यांनी घेतला नाही, अशी माणसं फार कमी असतील. इफ़्तिख़ार सिद्दिक़ी यांनी सिनेमासाठी लेखन सुरू ठेवलं असतं, तर आज ते कुठल्या कुठे असते. ‘अर्थ’ या महेश भट्ट दिग्दर्शित सिनेमातली ‘तू नहीं तो ज़िंदगी में और क्या रह जायेगा’ ही गझल इफ़्तिख़ार साहेबांनीच लिहिली आहे. उर्दूची सेवा करणं हे आपलं कर्तव्य मानत त्यांनी सिनेमासाठी लिहिण्यास नकार दिला. मुशायऱ्यामध्ये अप्रतिमपणे शायरी गात ते रसिकांना दुहेरी आनंद देतात. २००२ मध्ये लोकल ट्रेनमधून ते खाली पडले आणि त्यांचा कमरेखालचा भाग निकामी झाला. तरीही व्हिलचेअरवर बसून ते आजही त्यांच्या ८८ वर्ष जुन्या ‘शायरी’ या मासिकाचं संपादन करताहेत. चित्रा सिंग यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स असलेल्या एक गझलांपैकी ही एक आहे. यात चित्राजींच्या गाण्यातली Sincerity खूप जाणवते. पुन्हा जगजीत सिंग यांचं बेहतरीन कंपोझिशन. या गझलेमध्ये ओपनिंग गिटार, सारंगी आणि संतूर ऐका. खंत, व्याकुळता अधिक तीव्रतेने दाखवण्यासाठी व्हायोलिनऐवजी सारंगीचा केलेला वापर आणि मध्येच भावनेतलं पावित्र्य आणि आर्तता दाखवण्यासाठी बॅकग्राऊंडला येणारा मंद टाळांचा आवाज... पहिला शेर संपल्यानंतर ‘मुझे’ म्हणताना आलापामध्ये चित्राजींनी घेतलेली जागा.. अहाहा..! ही गझल ऐकणं हा एक दिलकश अनुभव आहे, असं मी म्हणेन... माझी शिफारस म्हणून ही गझल जरूर ऐका. मुझे यकिन है, आप मुझे इस सिफारिश के लिए दुआ दोगे..! 
वो नहीं मिलता मुझे इसका गिला अपनी जगह
उसके मेरे दरमियाँ का फ़ासला अपनी जगह ।
ज़िंदगी के इस सफ़र में सैंकड़ों चेहरे मिले 
दिलकशी उनकी अलग, पैकरा तेरा अपनी जगह । 
दिल तो मौसम के निखरने के लिये बेचैन है
जम गई है उनके होठों की घटा अपनी जगह ।
कर कभी तू भी तो मेरी ख़्वाहिशों का एहतिराम 
ख़्वाहिशों की भीड़ और उनकी सज़ा अपनी जगह ।
तुझसे मिलकर आनेवाले कल से नफरत मोल ली
अब कभी तुझसे न बिछडूं, ये दुआ अपनी जगह ।
इक मुसलसल दौड में है मंज़िले और फ़ासिले
पाँव तो अपनी जगह है रास्ता अपनी जगह । 

- इफ़्तिख़ार इमाम सिद्दिक़ी