Home | Business | Industries | venugopal dhoot, business

महिलांना मिळालेल्या रोजगारामुळे परिवर्तनाचे अर्थचक्र

agency | Update - May 31, 2011, 11:47 AM IST

व्हिडिओकॉनच्या कर्मचारीवर्गात 60 टक्के महिला आहेत. शिक्षण तसेच अर्थार्जनामुळे त्या स्वयंपूर्ण झाल्या. घर, कुटुंबाचा दर्जाही उंचावला. शहर, परिसर आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला.

 • venugopal dhoot, business

  महिलांना मिळालेल्या रोजगारामुळे परिवर्तनाचे अर्थचक्र

  -वेणुगोपाल धूत

  इलेक्ट्रॉनिक्समधल्या आमच्या भागीदारी उद्योगातून ‘व्हिडिओकॉन’ या नावाने मोठा उद्योग सुरू करायचा, असे आम्ही ठरवले. तेव्हा आमच्या समोर मुख्य प्रश्न शहर निवडण्याचा होता. अहमदनगरमधून आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली असली तरी मोठय़ा उद्योगाच्या दृष्टीने ते शहर सोयीचे नव्हते. मुंबई सर्व दृष्टीने सोयीयुक्त असली तरी तेथे उद्योग उभारणे मोठे खर्चीक काम होते. आमचे लक्ष औरंगाबाद शहरावर केंद्रित झाले. आमचे पैतृक गाव असलेल्या गंगापूरमध्ये काकासाहेबांनी यापूर्वी साखर कारखाना सुरू केला होता. माझे बंधू राजकुमार यांनी औरंगाबाद शहरात अनेक कंपन्यांची डीलरशिप घेतली होती.त्यामुळे या शहराशी आमचे व्यावसायिक संबंध होते.

  1985 मध्ये औरंगाबाद, वाळूज, पंढरपूर येथे नव्या एमआयडीसी सुरू झाल्या. उद्योजकांनी तेथे यावे यासाठी शासनाने उत्तम पॅकेजेस दिले.नाथसागरचे पाणी शंकरराव चव्हाणांनी औरंगाबाद एमआयडीसीला दिले आणि औरंगाबादमधील नव्या घडामोडींच्या संधी लक्षात घेता आम्ही आमचा उद्योग तेथेच सुरू करण्याचे ठरवले.

  पैठण रोडवर मोठी जागा घेऊन कामही सुरू केले. यापाठोपाठ राहुल बजाज यांचा ‘बजाज ऑटो’चा उद्योगही सुरू झाला. येथे दोन मोठे उद्योग सुरू होताच ‘वोक्हार्ट’सह अनेक मोठय़ा औषधी कंपन्या आल्या आणि शहराच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली.

  सरकारने पॅकेजेस दिलेले असले तरी उद्योग उभारताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.पहिली अडचण अर्थात भांडवलाचीच असते. आमच्या मूळ उद्योगाला आमच्या वडिलांनी म्हणजे काकासाहेबांनी दहा कोटी रुपये देऊन भांडवलाचा प्रश्न सोडवला होता. त्यानंतर आम्ही पब्लिक लिमिटेड कंपनी बनवून शेअर बाजारात उतरलो आणि त्यास देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. त्या काळात बँका आणि वित्तीय संस्था उद्योगास मोठे कर्ज देण्यास नाखुश असत. त्यामुळे शेअर्सद्वारे भांडवल गोळा करणे आम्हाला स्वीकारावे लागले. इंजिनिअर्स किंवा मॅनेजरपदासाठी काम करण्यास शहरात तसेच मराठवाड्यातून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नव्हते, तसेच पुण्या-मुंबईतून या कामासाठी येण्यास लोक तयार नव्हतेतरीही आम्ही पुण्या-मुंबईतून अनेक अधिकारी आणले आणि काम सुरू केले. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात अत्यंत गुंतागुंुतीचे आणि नाजूक काम असते म्हणून आम्ही महिलांना रोजगारासाठी प्राधान्य दिले. आजही आमच्या एकूण मनुष्यबळात 60 टक्के महिला काम करतात.

  महिला शिकल्या, अर्थार्जन करून लागल्या तर त्या स्वयंपूर्ण आणि स्वाभिमानी होतात. आपल्याबरोबर संपूर्णघराचा दर्जाच त्या उंचावतात. त्यामुळे एक कुटुंब स्वयंपूर्ण तर होतेच त्याचबरोबर गाव आणि परिसरही समृद्ध होतो. आमच्या महिलाप्रधान रोजगाराच्या भूमिकेमुळे एक महत्त्वपूर्ण परिवर्तन आम्ही घडवले.

  शहरातील काही राजकीय नेते व उद्योजकांनी चांगल्या शिक्षण संस्था उभारल्या. येथे हॉटेल्स आणि मनोरंजनाची साधने आली.त्यामुळे भविष्यकाळात कुशल मनुष्यबळ औरंगाबादला येण्याची अडचण दूर झाली. शिवाय येथे असलेल्या आयटीआयसारख्या शिक्षण संस्थातून तरुणही उपलब्ध झाले.

  ''व्हिडिओकॉनच्या कर्मचारीवर्गात 60 टक्के महिला आहेत. शिक्षण तसेच अर्थार्जनामुळे त्या स्वयंपूर्ण झाल्या. घर, कुटुंबाचा दर्जाही उंचावला. शहर, परिसर आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला.''-वेणुगोपाल धूत.

Trending