आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिउत्साहाचे प्रयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संवेदनशील मन आणि त्यामुळे उद्भवणारा अतिउत्साहीपणा चांगलाच इंगा दाखवतात. खूप जुनी घटना आहे. शाळेत असताना सायन्सचे टीचर चांगले शिकवत असत. विज्ञानाचे प्रयोगही करून दाखवायच्या. जमल्यास प्रयोग करून पाहत चला, असेही सांगत असत. एकदा शिकवताना त्यांनी पारा जर सोन्याला लागला तर सोने पांढरे पडते असे सांगितले. त्यांचे बोलणे ऐकल्यानंतर माझ्या मनात विचार येऊ लागला की, केव्हा एकदा घरी जाते आणि प्रयोग करून बघते. घरी गेल्याबरोबर सोन्याची अंगठी घेतली. आजीने ती काढून ठेवलेली होती. मग काय, हातात घेतली आणि तिला पारा लावला. अंगठी पांढरी झाली. मी ऐटीत आजीला सांगायला लागले, आजी, मजा बघ; मी एक प्रयोग केलाय. सोन्याला पारा लावला की सोने पांढरे पडते. ही बघ अंगठी. आजीने आधी बोलणं ऐकून घेतलं. काय म्हणत होती, वगैरे. मग जे जोरात ओरडली. म्हणाली, अगं, आता सोने खराब झाले त्याचे काय? वाया गेले ते सोने. सोने किती महाग असते काही कल्पना आहे का तुला? आणि असले प्रयोग करायला मॅडमनी सांगितले काय? चल आता त्यांच्या घरी म्हणजे विचारतेच त्यांना. आजीचे ओरडणे चालूच होते. आजीचा राग कसाबसा शांत केला. मी म्हटलं, आजी, मॅडमनी नव्हतं सांगितलं घरी प्रयोग करायला. मलाच उत्सुकता होती म्हणून घरी प्रयोग करून बघितला. माझंच चुकलं. पुन्हा अशी चूक करणार नाही! आजीचा राग मावळला खरा; पण म्हणाली, अक्कलवान! जरा शहाणपणा शिका! आजीचा प्रश्नांचा भडिमार आणि ओरडणे आतापर्यंत चांगलेच लक्षात राहिले आहे. मला मात्र एक चांगलाच अनुभव मिळाला. जरा शांतपणे विचार करून दुस-यांना विचारून पुढे जावे आणि निर्णय घ्यावेत, असे मनाने ठरवले आणि तेव्हापासून उताविळपणाचा स्वभाव सोडून दिला. कारण असा प्रकार अंगलट येण्याचीच शक्यता अधिक असते.