आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षणात नाती हिरावली..!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

16 जून 2013 माझ्या आयुष्यातील सर्वात दु:खद दिवस! कोणाच्याही आयुष्यात हा दिवस पुन्हा उगवू नये अशीच भावना माझ्यासह लाखो नागरिकांच्या मनात असणार! आम्ही 15 तारखेस केदारनाथला पोहोचलो. मनात तर खूप आनंद वाटत होता. कारण पुढे काय घडणार आहे, याची कल्पना कोणी स्वप्नातही केलेली नव्हती. आम्हाला परमेश्वराच्या दर्शनाची ओढ होती, म्हणूनच इतक्या लांबवर येथे येऊन पोहोचलो होतो. 16 तारखेला पहाटे उठून सकाळीच दर्शनासाठी निघालो. गौरीकुंडापासून वर जाण्यासाठी घोडे ठरवले. मनात कोणतीही शंका नव्हती; परंतु वर जाण्यास आम्हाला प्रतिबंध करण्यात आला. तो कशामुळे करण्यात आला याची पुसटशी कल्पनाही आली नाही. निराश होऊन परत फिरलो आणि त्याच रात्री भयानक प्रलय आला. पाण्याचा लोंढा इतका वाढला की, आम्ही आमचे हॉटेल सोडून दुस-या उंच जागी असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो.

रात्र जीव मुठीत धरून काढली. सकाळ उजाडताच सगळीकडे आक्रोश पसरलेला पाहिला. पळापळ चालू झाली. आम्ही डोंगर चढत होतो. अंगावरच्या कपड्यानिशी भटकत असताना आम्हा नातेवाइकांची ताटातूट झाली. आपण कोठे चाललो आहोत कोणासही माहिती नव्हते. घरच्या लोकांचा संपर्क तुटला. ते चार दिवस माझ्या आयुष्यातील भयानक प्रसंगांनी भरलेले दिवस होते. आजही त्या आठवणीने अंगावर शहारे येतात. आमच्या सोबतचे किती लोक गेले याची माहिती उपलब्ध होत नव्हती. आमच्या गाडीचा चालक पुरामध्ये वाहून गेल्याचे समजले. आम्हाला धक्काच बसला. तो आमच्यासोबत आठ दिवसांपासून सोबती होता. त्यानेच आम्हाला केदारनाथला सुरक्षित पोहोचवले होते. चार दिवस उपाशी राहून काढले. जे काही मिळाले ते वाटून खाल्ले. औरंगाबादला विमानतळावर पोहोचलो. आम्हाला सोडून गेलेले नातेवाईक अजूनपर्यंत परत आलेले नाहीत. त्यांची प्रतीक्षा अजूनही आहे.