Home | News | veteran actress lalan sarang passed away pune

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे पुण्यात निधन:कलाक्षेत्र शोकमग्न, आज मुंबईत अंत्यसंस्कार

प्रतिनिधी | Update - Nov 10, 2018, 07:49 AM IST

लालन सारंग यांचा जन्म 26 डिसेंबर 1941 रोजी गोव्यात झाला होता.

 • veteran actress lalan sarang passed away pune

  पुणे - आपल्या सशक्त अभिनयाने चाकोरीबाहेरच्या भूमिका प्रत्ययकारी करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री लालन कमलाकर सारंग (वय ७९) यांचे शुक्रवारी सकाळी पुण्यात खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा राकेश, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे. शनिवारी दुपारी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे कुटुंबियांच्या वतीने राकेश सारंग यांनी कळवले आहे. त्यापूर्वी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात सकाळी सात वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. लालनताईंच्या निधनामुळे नाट्य-चित्रपट-छोट्या पडद्यावरील कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे.


  गेल्या काही दिवसांपासून लालनताई पुण्यातील जोशी रुग्णालयात उपचार घेत होत्या. तेथेच त्यांनी शुक्रवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. लालनताईंचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी गोव्यात झाला. त्यांचे कुटुंब पैंगणकर. त्यांच्या घरात अभिनयाचा कुठलाही वारसा नव्हता. लालनताई या सर्वार्थाने सेल्फ मेड कलावती होत्या. सिद्धार्थ महाविद्यालयात शिकत असताना, नाट्यस्पर्धांमधून भाग घेतल्याने त्यांच्यातील कलाजाणिवा अंकुरल्या. इथेच त्यांची भेट कमलाकर सारंग यांच्याशी झाली. त्यांनी प्रेमविवाह केला आणि त्या लालन सारंग झाल्या.
  आपल्या भूमिकांना त्यांनी सशक्त अभिनायच्या माध्यमातून मनोरंजनाच्या पलीकडे नेले. चाकोरीबाहेरच्या भूमिका स्वीकारण्याचे धाडस त्यांनी केले. नंतरच्या काळात तेंडुलकरांच्या नाटकांतून प्रमुख भूमिका साकारताना सर्वार्थाने बंडखोर अभिनेत्री, अशीच त्यांची ओळख निर्माण झाली. लालनताईंनी रंगभूमीवर विशेष आत्मीयतेने भूमिका साकारल्या, पण चित्रपट आणि छोटा पडदाही त्यांनी आपलासा केला होता. त्यामुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या. कणकवली येथे २००६ साली झालेल्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.

  कमला, सखाराम बाईंडर, पुरुष, गिधाडे, रथचक्र, खोल खोल पाणी, जंगली कबूतर, सूर्यास्त अशा अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. ‘सखाराम बाईंडर’ नाटकासंदर्भातील संघर्ष, त्यासाठी त्यांनी दोघांनी (कमलाकर आणि लालनताई) दिलेला लढा ग्रंथबद्धही झाला.सुमारे पाच दशके लालनताई सातत्याने रंगभूमी, चित्रपट आणि छोट्या पडद्यावर वावरल्या. नेहमीच प्रवाहाविरुद्ध जाऊन, प्रेक्षकांना वेगळा नाट्यनुभव देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. २०१७ मध्ये लालनताईंना नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला होता. गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी-सखी-सचिव सन्मानही त्यांना देण्यात आला होता.

  नाटकांमागील नाट्य, मी आणि माझ्या भूमिका, जगले अशी, बहारदार किस्से आणि चटकदार पाककृती अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले होते. सामना, हा खेळ सावल्यांचा..हे त्यांनी अभिनीत केलेले चित्रपटही गाजले. रथचक्र या हिंदी मालिकेतूनही त्यांनी काम केले होते. याशिवाय मी मंत्री झालो, बुवा तेथे बाया, मोरुची मावशी, उद्याचा संसार, बेबी, कालचक्र, घरटे अपुले छान या नाटकांतील त्यांच्या भूमिकाही रसिकांच्या स्मरणात राहिल्या. पुण्यात त्यांनी सुरू केलेले ‘मासेमारी’ हे हॉटेल मत्स्यप्रेमींसाठीचे आकर्षण ठरले होते.

Trending