आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'गीत भीमायन'मधून साकारणार बाबासाहेबांचे समग्र चरित्र, हरिहरन, सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्तींसह दिग्गज गायकांनी दिला आवाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उषा बोर्डे 

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवनचरित्र संगीतमय पद्धतीने जगासमोर आणण्याचा मानस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगीत विभागाने केला आहे. लोककवी वामनदादा कर्डक यांच्या १० हजार गाण्यांतून १०० गाणी निवडून 'गीत भीमायन' हा संगीत प्रकल्प तयार केला जात आहे. दिग्गज गायक सुरेश वाडकर, हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, साधना सरगम यांच्या आवाजामध्ये आतापर्यंत ६० गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले आहे. या संदर्भात विद्यापीठाची टाइम्स म्युझिक कंपनीसोबत चर्चा सुरू आहे.
 


डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती पर्वानिमित्त (२०१५)तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली होती. आता विद्यमान कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी या प्रकल्पाला नवसंजीवनी दिली आहे. स. भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ. संजय मोहड समन्वयक आहेत. डॉ. मोहड यांनी शंभर गीतांना शास्त्रीय रागदारीत संगीतबद्ध केले आहे. प्रा. मोहड २१ वर्षांपासून कर्डक यांची गाणी सादर करतात.
१० गाण्यांना मिळाले कॉपीराइट : केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून या कलाकृतीतील १० गीतांना स्वामित्व अधिकार(कॉपीराइट) प्रदान करण्यात अाले आहे. अनेक नामांकित कॅसेट कंपन्या या प्रकल्पाच्या वितरणासाठी स्वेच्छेने पुढे येत असल्याचे मोहड यांनी सांगितले.५० हजार संगीतप्रेमींनी दिली वेब पोर्टलला भेट


१ जून २०१९ रोजी दहा गाणी वेब पोर्टलवर टाकली आहेत. या पोर्टलला आतापर्यंत ५० हजार संगीतप्रेमींनी भेट दिली आहे. या पोर्टलवर 'जन्मले भीमाईचे बाळ' (कविता कृष्णमूर्ती), 'थोर धुरंधर करुणासागर' (हरिहरन), 'भीमवाणी' (सुरेश वाडकर), 'घटना घटनाकाराची' (रवींद्र साठे), 'उमलून फूल मनाचे' (रघुनंदन पणशीकर) , 'गाेदातीरी पडला' (आरती अंकलीकर), 'ये कोकिळे' (सावनी शेंडे), 'मन माझे आता भीमापाठी' (मंजूषा पाटील), 'भीमाच्या फुलबागेची' (बेला शेंडे), 'भायखळ्याच्या मंडीमधले (साधना सरगम) ही गाणी ऐकायला मिळत आहेत.कोरसमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज 
 
कविता कृष्णमूर्ती, हरिहरन, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, रघुनंदन पणशीकर, शुभा जोशी, आरती अंकलीकर, साधना सरगम, मंजूषा पाटील, सावनी शेंडे, बेला शेंडे यांनी गायन केले असून नरेंद्र भिडेंचे संगीत संयोजन आहे. कोरसमध्ये संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी आवाज दिला आहे.विद्यार्थ्यांना होणार फायदा
 
या प्रकल्पाचा मराठवाड्याच्या भूमीतील विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे. या प्रकल्पाद्वारे भविष्यात भारताबरोबरच जगातील मोठ्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन आपल्या विद्यापीठातून करणे सहज शक्य होणार आहे. - डॉ. संजय मोहड, प्रकल्प समन्वयककाम अंतिम टप्प्यात
 
'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही महान तत्त्वे जगभर पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या म्युझिक अल्बमचे काम अंतिम टप्प्यात आहे. याविषयी आमची टाइम्स म्युझिक कंपनीशी सविस्तर चर्चा सुरू आहे. - डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू
 

बातम्या आणखी आहेत...