आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्गज नेत्यांची काेंडी; अडकले आपल्याच मतदारसंघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत शिंदे 

मुंबई - निवडणुकांच्या प्रचारात पक्षाच्या प्रमुख नेत्यांना स्टार प्रचारकांचा दर्जा दिला जाताे. जनमानसावर गारुड करण्याचे या प्रचारकांचे कसब फायदेशीर ठरत असल्यामुळे अशा नेत्यांच्या सभांना उमेदवारांकडून मागणीही जास्तच असते. मात्र सत्ताधारी व विराेधी पक्षांतील काही मातब्बर स्टार प्रचारक व नेते या वेळी स्वत:च्याच मतदारसंघात अडकून पडल्याचे दिसते. 

भाजपने आपल्या प्रचाराचे हुकमी एक्के पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांचा धडाका लावला आहे. फडणवीस तर स्वतः नागपुरातून उभे आहेत, मात्र आपला प्रचार पदाधिकाऱ्यांच्या भरवशावर साेडून ते राज्यभर फिरताना दिसतात. मात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हे ‘नवख्या’ काेथरूड मतदारसंघात अडकून पडले आहेत. उशिरा जाहीर झालेली उमेदवारी व नाराजांची वाढती संख्या यामुळे त्यांचा वेळ मतदारसंघातच जात असल्याने ते राज्यभर फिरू शकत नाहीत. स्वतः पाटील यांनीही याची कबुली दिली आहे. युवा सेनेचेे प्रमुख आदित्य ठाकरे प्रथमच वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आदित्य राज्यभरही प्रचार दाैरे करत आहेत.
 

एकनाथ खडसे : स्वत:ची उमेदवारी पक्षाने कापल्यानंतर मुलीच्या प्रचारामध्ये व्यग्र 
नाथाभाऊ भाजपचे स्टार प्रचारक आहेत. परंतु मुक्ताईनगरमध्ये त्यांच्या मुलीला रोहिणीला उमेदवारी मिळाल्याने आणि शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केल्याने त्यांनी पूर्ण लक्ष याच मतदारसंघावर केंद्रित केलेले आहे. दुसरीकडे जामनेरमधून निवडणूक लढवत असलेले मुख्यमंत्र्यांचे ‘ब्ल्यू आय बॉय’ गिरीश महाजन मात्र सुरक्षित मतदारसंघ असल्याने राज्यभर प्रचार करताना दिसतात.
 

विजय वडेट्टीवार : मतदारसंघात सेनेच्या उमेदवाराने तगडे आव्हान दिल्याने गोची
काँग्रेसचे आक्रमक नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ब्रह्मपुरीतून (जि. चंद्रपूर) निवडणूक लढवत आहेत. शिवसेनेने संदीप गड्डमवार यांनी त्यांना तगडे आव्हान दिल्याने वडेट्टीवारांना मतदारसंघातच अडकून राहावे लागत आहे. विदर्भातील दुसऱ्या उमेदवाराच्या प्रचारात ते अभावानेच दिसतात. यामुळे काँग्रेसच्या प्रचाराची धुरा काँग्रेसमधील इतर नेत्यांवर आली आहे.
 

पृथ्वीराज चव्हाण : दोन्हीही राजे भाजपत गेल्याने ‘रिस्क’ घेण्याच्या तयारीत नाहीत
दक्षिण कराडमधून पृथ्वीराजबाबांसमाेर यंदाही भाजपचे अतुल भाेसले आहेत. यंदा जिल्ह्यातील दिग्गज नेते उदयनराजे व शिवेंद्रसिंह भाेसले भाजपत गेले आहेत. त्यामुळे चव्हाण ‘रिस्क’ घेण्याच्या तयारीत नाहीत.  सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदे यांना शिवसेनेच्या दिलीप मानेंचे तगडे आव्हान असल्याने माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेही सोलापूरमध्येच तळ ठोकून आहेत.

अशाेक चव्हाण : लोकसभेलाही अडकले होते, आता विधानसभेतही तशीच परिस्थिती
लोकसभेला भाजपने काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेड मतदारसंघात अडकवून ठेवले. आताही तसेच केले आहे. लाेकसभेत पराभवामुळे ते आता ताकही फुंकून पीत आहेत. भाेकरमध्ये भाजपने त्यांच्याविराेधात राष्ट्रवादीतून आलेले बापूसाहेब गाेरठेकर यांच्या रूपाने तगडे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे यापूर्वी राज्यभर फिरणारे चव्हाण आता भाेकरपुरतेच मर्यादित राहिलेत. 
 

बाळासाहेब थोरात : विखे भाजपवासी झाले, आता आपल्याच मतदारसंघात प्रचारात गुंग 
संगमनेरमधून थाेरात यांना आजवर एकहाती विजय मिळत हाेता. मात्र या वेळी शिवसेनेचे रावसाहेब नवले यांचे आव्हान आहे. त्यातच पूर्वाश्रमीचे काँग्रेसी नेते राधाकृष्ण विखे भाजपत गेल्याने थाेरातांना या वेळी जास्त मेहनत घ्यावी लागत आहे. खरे तर प्रदेशाध्यक्षपदी असल्याने थाेरातांवर संपूर्ण राज्याची जबाबदारी आहे. मात्र मतदारसंघात अडचण असल्याने ते माेजक्याच ठिकाणी प्रचाराला जातात.

तटकरे, भुजबळ, पाटील : एकेकाळच्या दिग्गज नेत्यांची आपल्या जागेसाठी झुंज 
इस्लामपूर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटांचा गड. मात्र या वेळी जयंतरावांनीही सेनेच्या गौरव नायकवडी यांचे आव्हान गांभीर्याने घेतलेले दिसते. छगन भुजबळ येवल्यातच अडकून आहेत, तर सुनील तटकरे श्रीवर्धनमधून मुलगी अदितीच्या प्रचारात आपली ताकद लावत आहेत. धनगर समाजाचे नेते गाेपीचंद पडळकर यांना भाजपने बारामतीतून उभे केल्याने अजित पवारांनाही मतदारसंघांवर लक्ष ठेवावेच लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...