आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनय क्षेत्रातील ‘कमांडर’ हरपला..रमेश भाटकरांचे निधन, मुंबईतील \'एलिझाबेथ\'मध्ये घेतला अखेरचा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- आपल्या शारीरिक आणि अभिनयाच्या उंचीच्या जोरावर कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टरमधील पोलिस अधिकार्‍याची भूमिका चपखलपणे सादर करणार्‍या आणि त्याच ताकदीने नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये लाल्यासारख्या अन्य भूमिकाही अजरामर करणारे प्रख्यात अभिनेते रमेश भाटकर यांचे सोमवारी मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये कर्करोगाने निधन झाले. सोमवारीच जागतिक कर्करोग दिन होता आणि याच दिवशी त्यांचे कर्करोगानेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी न्यायमूर्ती मृदुला भाटकर, मुलगा हर्षवर्धन आणि सून असा परिवार आहे.

 

रात्री 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर चित्रपटात त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका अत्यंत उत्कृष्टरित्या साकारली होती. हा त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणावा लागेल.

 

३ ऑगस्ट १९४९ रोजी जन्म झालेल्या रमेश भाटकर यांनी गेली तीन-साडेतीन दशके अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. केवळ चित्रपटच नव्हे, तर मालिका व नाटकांमध्येही त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या होत्या. "हॅलो इन्स्पेक्टर', "कमांडर' अशा टीव्ही मालिकांमधील त्यांच्या इन्स्पेक्टरच्या भूमिका प्रचंड गाजल्या होत्या. वयाची सत्तरी गाठली तरी त्यांच्यावर वार्धक्याचा परिणाम दिसत नव्हता. या वयातही ते एखाद्या तरुणाप्रमाणेच कार्यरत होते. नाटकांमधून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केलेल्या रमेश भाटकर यांचे "अश्रूंची झाली फुले' नाटक विशेष गाजले. या नाटकातील त्यांची लाल्याची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. "केव्हा तरी पहाटे', "अखेर तू येशीलच', "राहू-केतू', "मुक्ता' आदी नाटकांमधील त्यांचा अभिनय जबरदस्त होता. १९७७ मध्ये "चांदोबा चांदोबा भागलास का' या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर आगमन केले. त्यानंतर "अष्टविनायक', "दुनिया करी सलाम', "आपली माणसं', गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला "भावेश जोशी सुपरहीरो' आदी ९० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी "तू तिथे मी' आणि "माझे पती सौभाग्यवती' मालिकांमध्येही अभिनय केला होता. गेल्या वर्षीच ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये त्यांचा "जीवनगौरव' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. 

 

नेत्यांकडून शोक व्यक्त, अभिनयातला 'कमांडर' गेला 
हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी, कमांडर, बंदिनी अशा मालिकांमुळे घराघरांत प्रसिद्ध रमेश भाटकर यांच्या निधनाने अभिनयातला 'कमांडर' गेला. रंगभूमी, सिनेमा व मालिका अशा तिन्ही प्रकारांमधून अभिनयाची छाप सोडणारा हरहुन्नरी कलाकार गमावला आहे. - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
 
चतुरस्र अभिनेता हरपला 
रमेश भाटकर यांच्या निधनामुळे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील चतुरस्र अभिनेता हरपला. त्यांच्या 'माहेरची साडी' या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम प्रस्थापित केले. त्यांनी साकारलेल्या धाडसी पोलिसाच्या भूमिका कायम स्मरणात राहतील. - अशोक चव्हाण, खासदार, काँग्रेस 

 

चटका लावणारी एक्झिट 
रमेश भाटकरांच्या निर्भीड, निडर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिका पाहून एकेकाळी अनेकांना पोलिस दलात भरती होण्याची स्फूर्ती मिळायची. त्यांचे निधन चाहत्याच्या मनाला चटका लावणारे असून, आठवणींच्या रूपात ते कायम प्रत्येकाच्या हृदयात राहतील. -राधाकृष्ण विखे पाटील, आमदार 

बातम्या आणखी आहेत...