राजीनामा / त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू वि.ल. धारूरकरांचा राजीनामा; लाच घेतल्याचा व्हिडिओ झाला होता व्हायरल

या व्हिडिओमुळे धारूरकर यांनी मार्गदर्शन केलेल्या पीएचडी पदव्यांच्या विश्वासार्हतेवर चर्चा सुरू झाली आहे

वृत्तसंस्था

Sep 08,2019 07:59:00 AM IST

आगरतळा - त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वि. ल. धारूरकर यांनी शनिवारी दुपारी राजीनामा दिला आहे. एका ठेकेदाराकडून तसेच नोकरी देण्यासाठी लाच घेत असल्याचा धारूरकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दोन दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तवाहिनीने हे स्टिंग ऑपरेशन केले होते. हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा धारूरकर यांनी केला होता. हा मला तसेच विद्यापीठाला बदनाम करण्याचा डाव असल्याचेही धारूरकर यांनी म्हटले होते. मात्र या व्हिडिओतील चित्रण १०० टक्के खरे असून त्यासाठी आम्ही कोणत्याही चौकशीस आणि न्यायालयीन लढ्यास तयार असल्याचा दावा त्या वृत्तवाहिनीच्या संपादकांनी केला होता. काँग्रेसप्रणीत एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यव्यापी बंद करण्याचा इशारा दिला होता. धारूरकर यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे त्यांचा राजीनामा पाठवला आहे. या व्हिडिओमुळे धारूरकर यांनी मार्गदर्शन केलेल्या पीएचडी पदव्यांच्या विश्वासार्हतेवर चर्चा सुरू झाली आहे.

X
COMMENT