आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सांस्कृतिक अजेंड्याचे बळी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिरल गावंडे-इंगोले

सध्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या माहितीपटांना आणि चित्रपटांना मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने नाकारले आहे. असे काय आहे या माहितीपटांमध्ये ज्याची सरकारला, सरकार पुरस्कृत निवड समितीला आणि आयोजकांना इतकी धास्ती वाटते. "मिफ'ने नेमके कोणते माहितीपट नाकारले आहेत हे जरा जाणून घेऊयात..

विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खुनी तुम्ही पकडणार नाही... जेएनयू मधून बेपत्ता झालेल्या नजिबचा शोध लागला नसल्याचे कारण देऊन तुम्ही त्याची फाईल बंद करणार... स्कॉलर रोहित विमुलाच्या आत्महत्येनंतर सुरू झालेल्या देशभरातल्या विद्यार्थी आंदोलनावर तुम्ही गोळीबार करणार... गुजरात दंगलीत सहभागी झालेल्या आरोपींची तुम्ही निर्दोष मुक्तता करणार आणि त्याच दंगलीत होरपळून निघालेल्या दंगल पीडितांच्या निर्वासित छावण्यांना वाऱ्यावर सोडून देणार... आणि त्याही पुढे जात या सगळ्या घटनांवर भाष्य करणाऱ्या कलाकृतींवर एकतर बंदी तरी घालणार किंवा त्या कुठेही प्रदर्शित होणार नाहीत यासाठी सबंध व्यवस्था कामाला लावणार... मुंबईत सुरू असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (मिफ)निमित्ताने नेमकं हेच घडलं असून पुन्हा एकदा या देशात समांतर सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा उपस्थित झाला आहे.

सध्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या माहितीपटांना मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाकारण्यात आल्याने एकप्रकारे मागील दाराने सेन्सॉरशिप होत आहे, असा आरोप दिग्दर्शक आनंद पटवर्धन व पंकज ऋषिकुमार यांनी केला आहे. पटवर्धन यांच्या ‘विवेक/रिझन', तर कुमार यांच्या ‘जननी ज्युलिएट' व ‘टू फ्लॅग्ज' या माहितीपटांना या महोत्सवात प्रवेश नाकारण्यात आला. केवळ या  दोन दिग्दर्शकांचेच माहितीपट वगळण्यात आले नसून, असे अनेक माहितीपट, जे सरकारला अडचणीत आणणारे, त्यांच्या धोरणांवर टीका करणारे, त्यांच्या विचारसरणीच्या विरुद्ध असणारे आहेत, अशा सर्व माहितीपटांना मिफमध्ये प्रवेश नाकारण्यात आला आहे. "रिझन या माहितीपटाला अॅमस्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तर, जननी ज्युलिएट या माहितीपटाला केरळ आंतरराष्ट्रीय माहितीपट महोत्सवात पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे या दोन्ही माहितीपटांनी २०२० च्या अॉस्करसाठी अधिकृतपणे पात्रता मिळवली होती. असे असूनही मिफच्या आयोजकांनी या माहितीपटांना नाकारले आहे.


असे काय आहे या माहितीपटांमध्ये ज्याची सरकारला, सरकार पुरस्कृत निवड समितीला आणि आयोजकांना इतकी धास्ती वाटते. 

‘विवेक / रिझन’ :  भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विविधतेमुळे परस्परविरोधी अनेक राजकीय मतप्रवाह समोरासमोर येऊन उभे राहणेे अपरिहार्य आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत राजकारण झपाट्याने बदलतंय. राजकीय विचारांमागे धार्मिक-जातीय अस्मितेचा पगडा दिसून येतो. कट्टरपंथी हिंदुत्ववादी संघटना भारताच्या लोकशाही विचारधारेला कसा सुरुंग लावत आहे याचं विस्तृत चित्रण आनंद पटवर्धन यांच्या ‘विवेक'मध्ये आहे. बुद्धिप्रामाण्यवादी नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या आणि त्यामागचा कार्यकारणभाव शोधताना फॅसिस्ट विचारधारेच्या उत्पत्तीपर्यंत पोहोचत पटवर्धन यांनी जोडलेले धागेदोरे हे शोधपत्रकारितेचा उत्तम नमुना आहे.

‘जननी ज्युलिएट’ : पंकज ऋषी कुमार यांचा ‘जननी ज्युलिएट’ हा माहितीपट जात, वर्ग, लिंग यावर उभ्या राहिलेल्या समाजाचा वेध घेतो. कौसल्याच्या कुटूंबाने त्यांच्यावर केलेल्या हल्लेत तिने तिचा नवरा शंकर गमावला. का, तर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. भारतात होणाऱ्या अॉनर किलिंगच्या घटनेने विचलित झालेले, इंडियनोस्ट्रम नावाचा पाँडिचेरी येथील नाट्यकर्मी जात, वर्ग आणि लिंग यांचे परिणाम नाटकातून दाखवतो. शेक्सपियरचे प्रसिद्ध नाटक रोमियो व ज्युलिएट वर हा माहितीपट आधारित असून त्याला २०१९मध्ये केरळ इंटरनॅशनल डॉक्युमेंट्री अँड शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट दीर्घ माहितीपट म्हणून पुरस्कार मिळाला आहे.

‘अवर गौरी’ : पत्रकार, विचारवंत गौरी लंकेश यांची गोळया धाडून हत्या करण्यात आली. गौरी लंकेश या सातत्याने भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह, कडव्या हिंदुत्ववादी संघटनांवर सातत्याने टीका करत, लिखाण करत होत्या, त्यांच्या तकलादू विचारांचा परखडपणे भंडाभोड करत होत्या. मात्र हेच काहींना रुचले नाही, त्यांच्याशी युक्तिवाद करण्याची, चर्चा करण्याची धमक त्यांच्या विरोधकांत नव्हती, म्हणूनच त्यांना संपवण्यात आले. दिग्दर्शक प्रदीप के पी (दिपू) यांची ‘अवर गौरी’ गौरी लंकेश यांना दिलेल्या श्रद्धांजलीपेक्षा पुढे जाऊन त्यांचा राजकीय प्रवास, त्यांनी कशासाठी आवाज उठवला, त्यांचे विचार, जातीय सलोख्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंतचा त्यांचा संघर्ष या सगळ्यावर माहितीपटातून भाष्य केले आहे.

‘अम्मी’ : दिग्दर्शक सुनिल कुमार यांची ‘अम्मी’ ही फिल्म म्हणजे एका महिलेचा न्यायासाठी दोन वर्षांचा लढा आहे. मुलाच्या बेपत्ता होण्याबाबत बऱ्याच सरकारी संस्थांकडून सांगण्यात आले की, चौकशी सुरू असून त्यात तथ्य नाही, तरीही ती आई ठामपणे उभी आहे, लढा देत आहे. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथून १ अॉक्टोबर २०१६ रोजी नजिब नावाचा विद्यार्थी बेपत्ता होतो. विविध तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात आजपर्यंत कोणतीही प्रगती झालेली नाही. उजव्या विचारसरणीच्या युवा संघटनेकडे संशयाची सुई वळत असते. 


‘अम्मी’ : दिग्दर्शक सुनिल कुमार यांची ‘अम्मी’ ही फिल्म म्हणजे एका महिलेचा न्यायासाठी दोन वर्षांचा लढा आहे. मुलाच्या बेपत्ता होण्याबाबत बऱ्याच सरकारी संस्थांकडून सांगण्यात आले की, चौकशी सुरू असून त्यात तथ्य नाही, तरीही ती आई ठामपणे उभी आहे, लढा देत आहे. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथून १ अॉक्टोबर २०१६ रोजी नजिब नावाचा विद्यार्थी बेपत्ता होतो. विविध तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात आजपर्यंत कोणतीही प्रगती झालेली नाही. उजव्या विचारसरणीच्या युवा संघटनेकडे संशयाची सुई वळत असते. 


मात्र जेव्हा उजव्या विचारसरणीच्या सरकारच्या काळात आपण त्याच विचारसरणीचे, संघटनेचे युवा विंग असता तेव्हा कुणालाही गायब करणे सोपे होते. भारतातील जातींवरील दृष्टीकोन, चर्चा बदलणाऱ्या या ऐतिहासिक चळवळीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न या चित्रपटात आहे.

‘वी हॅव्ह नॉट  कम हियर टू डाय’ :  दिग्दर्शक दिपा धनराज यांची ‘वी हॅव नॉट हियर टु डाय’ ही फिल्म भारतात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या जातिविरोधी चळवळीवर भाष्य करते. दलित, संशोधन अभ्यासक रोहित वेमुला याने एक कट्टरपंथी विद्यापीठ प्रशासनाला आणि प्रबळ जातीच्या वर्चस्ववाद्यांच्या छळाला कंटाळून  विद्यापीठातच आत्महत्या केली. त्याची सुसाईड नोट ‘माणसाची तात्काळ ओळख म्हणजे जात ही व्यक्तीची किंमत कमी करते’ यावर युक्तीवाद करणारी आहे. मागील वर्षभरात देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी विद्यापीठांमधील जातीभेदाच्या त्यांच्या अनुभवाविषयी मौन तोडले आहे आणि एक शक्तिशाली जातिविरोधी चळवळ सुरू झाली आहे, यावर ह फिल्म भाष्य करते.

‘दिल्ली यादो की महफील’ : दिग्दर्शक युसुफ सईद यांची ‘दिल्ली यादो की महफील’ ही फिल्म दिल्लीतील समकालीन इतिहासावर आधारित आहे. यात १५ ज्येष्ठ नागरिक आणि विद्वानांच्या मुलाखतीतून शतकानुशतके दिल्लीमध्ये मुस्लिम, हिंदू आणि जैन यांचे कसे सह अस्तित्त्व आहे हे दाखवले गेले आहे.  


‘विरह / अबसेन्स’ : दिग्दर्शक एकता मित्तल यांची ही फिल्म पंजाबी सुफी कवितेच्या माध्यमातून दु:ख, क्लेश आणि वेगळेपणाचे दु:ख दर्शवणारी आहे. एका दुर्गम गावात महिला त्यांचे पती, मुले आणि प्रिय जनांची वाट पाहत आहे. ते अचानक बेपत्ता झाले, जे घरी परत आलेले नाही त्यांच्या विरहात वाट पाहत आहे. शिवकुमार बटालवी यांच्या विरह या कवितांच्या माध्यमातून हा चित्रपट विभक्ततेमुळे होणारी वेदना, विलाप आणि तळमळ यांवर भाष्य करतो. हा चित्रपट हरवलेल्या लोकांचा शोध घेतो, ज्यांनी आपली घरे दूरच्या शहरांमध्ये काम करण्यासाठी सोडली होती आणि अद्याप परत आले नाहीत. 

‘सिटीझन नगर’ : ‘सिटीझन नगर’ ही दिग्दर्शक डेबोलिना मजूमदार यांची फिल्म गुजरातच्या विकासात्मक मॉडेलमध्ये असे सिटीझन नगर आहे, जिथे राज्यातील अदृश्य नागरिक वास्तव्य करतात, याचे चित्र दर्शवते. २००२ च्या गुजरात नरसंहारानंतर निर्वासित छावणी म्हणून बांधलेला हा परिसर आता न्याय किंवा मृत्यूच्या प्रतीक्षेत बंदी म्हणून असलेल्या नरोदा पाटियामधील वाचलेल्यांसाठी झोपडपट्टी वसाहत आहे. सतरा वर्षांनंतर, या कत्तलीनंतरचे तुकडे हा चित्रपट जोडतो आणि या लोकांचे जीवन दर्शवतो. 

‘शट अप सोना’ : दिग्दर्शक दिप्ती गुप्ता यांची ‘शट अप सोना’ ही फिल्म सोना महापात्रा या गायिकेच्या आधुनिक काळातील महिलांच्या समान जागेसाठीच्या अविरत संघर्षावर भाष्य करते. ती उपरोधकपणे तिच्या गाण्यातून देशाशी असलेल्या असुविधाजनक नात्याबद्दल भाष्य करते. या ९० मिनीटांच्या माहितीपटात आजच्या भारतातील द्वैत आणि आधुनिक भारतीय महिलेचे प्राक्तन सादर केले आहे.

‘इफ शी बिल्ट अ कंट्री’ :  दिग्दर्शक महिन मिर्झा यांची ही फिल्म छत्तीसगडच्या रायगडमधील बहादुर आदिवासी स्त्रियांच्या कथांचे वर्णन करते. या महिला केवळ त्यांची जमीन आणि उदरनिर्वाहासाठीच धडपडत नाहीत... स्वत:साठी, आपल्या समुदायसाठी आणि आपल्या नंतरच्या पिढीसाठी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत... तर त्या आपल्या सर्वांसाठी सध्याच्या काळातील अत्यंत क्रुर असा प्रश्न ‘विकासाचा नेमका अर्थ काय?’ यातून आपल्या भविष्याची कल्पना करतात. 

‘चाय दरबारी’ : १९९२ पासून अयोध्या हे निवडणूकीय राजकारणाचे आणि वादविवादाचे महत्त्वपूर्ण क्षेत्र आहे. सत्यता न तापसता आणि राजकीय हेतूने प्रेरित असे व्हायरल होणारे सध्याच्या व्हिडीयोमुळे हा मुद्दा आणखीनच गुंतागुंतीचा झाला आहे. एकीकडे या व्हिडिओमध्ये एकमार्गी संवादात्मक संभाषण आहे तर दुसरीकडे अयोध्याच्या भवतालचे सर्व युक्तीवाद तेथील रहिवाशांच्या अनेक वास्तविकतेकडे दुर्लक्ष करते. एकीकडे अयोद्धेत ही वास्तविकता अंतहिन अशा चाय पे चर्चा मध्ये रुपांतरीत करते तर दुसरीकडे शहरांमध्ये होणाऱ्या भाषणांचे वेगळे स्वरुप पहायला मिळते. दिग्दर्शक प्रतिक शेखर यांची ‘चाय दरबारी’ ही फिल्म अशाच काही संभाषणांची एक छोटी टेपेस्ट्री आहे. 

जेव्हा बाब धर्मचिकित्सा, राजनैतिक चिकित्सा व त्यामागील आपली भूमिका सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याची असते, तेव्हा वातावरण कुठल्याच सत्तेच्या काळात पोषक नसते. विवेक गहाण पडलेल्या समाजाच्या अधःपतनाची कहाणी जर कुणी सांगू पाहत असेल तर टोकाच्या रोषाला सामोरे जावे लागते. सिनेमा म्हणजे केवळ पडद्यावर तरलपणे मांडलेली कविता नसते आणि दोन घटकांचं मनोरंजन ही नसतो. सिनेमा असा तसा कसाही असू शकतो हे ज्यांना उमगलं आहे ते ह्या माध्यमाचा उपयोग वास्तव दर्शनासाठी किंवा आपली भूमिका मांडण्यासाठी प्रभावीपणे करू शकतात. आणि त्यापैकीच हे काही दिग्दर्शक आहेत ज्यांनी माहितीपटाच्या माध्यमातून धार्मिक-राजकीय स्थित्यंतरे आणि हादरवून टाकणारे दस्तऐवजीकरण केले आहे. प्रश्न फक्त इतकाच आहे की अशा दस्तऐवजीकरणाचा त्रास कुणाला होत आहे? संपर्क - ९३७०८६३१९९