आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीचा विजय असो!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी पावसाळ्यात गवत वाढतच असते. आमच्या परिसरातील पडीक जागेत झाडेझुडपे व गवताचे प्रमाण जास्तच वाढलेले आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो. आमच्या वॉर्डातून निवडून आलेला नगरसेवक आमच्या घराजवळच राहतो. संपूर्ण वसाहतीत गवत वाढलेले असताना, त्या नगरसेवकाने फक्त आपल्याच घराशेजारील गवत सफाई कर्मचा-यांना बोलावून काढून घेतले. इतर भागातील गवत काढण्यास का सांगितले नाही, असे विचारले असता कसनुसा चेहरा करून म्हणाला, ऐकतच नव्हते हो! परंतु त्यांच्या हातापाया पडून आणले आणि गवत काढून घेतले. विचारणा-यांची तोंडे हिरमुसल्यासारखी झाली. काही दिवसांनंतर वसाहतीतील कार्यालयासमोरील गवतावर तृणनाशकाची फवारणी करण्यात आली.

त्याचबरोबर संबंधित अधिका-यांच्या आणि कर्मचा-यांच्या निवासस्थानाभोवती फवारणी करण्यात आली. उर्वरित ठिकाणी फवारणी करण्यासाठी टाळाटाळ करण्याचे धोरण दिसले. त्यासंदर्भात विचारले असता या परिसरातील ‘रिझल्ट’ पाहून फवारणी करण्यात येईल, असे उत्तर मिळाले. जनतेचे सेवक म्हणवल्या जाणा-या नगरसेवकांच्या घराभोवतीचे गवत काढले जाते, अधिका-यांच्या घराभोवती तृणनाशकाची फवारणी करण्यात येते.

वास्तविक पाहता जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी कार्यरत असतात. पण ही मंडळी जनतेची कामे करण्याचे सोडून आपल्याच घराची स्वच्छता ठेवण्यात धन्यता मानतात. जनता जगली काय अथवा मेली काय, त्यांना काही देणेघेणे नाही. या लोकांचे वर्तन पाहता स्वदेशी इंग्रजांचाच अनुभव घेतो आहोत. या लोकांचे पगार, त्यांच्या पेन्शनचे आकडे ऐकून डोके गरगरू लागते. सर्वसामान्य जनता उपाशीपोटी राहत असताना आमदारांना 40 हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याचे समजले. याबाबत फारसा गवगवा कोणी केला नाही. आमच्यासारख्या सर्वसामान्यांना मात्र वाढत्या गवताच्या जंगलातूनच वाट काढावी लागते.