आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजे आत्राम यांचा अर्ज नाकारला अन् तलांडे बिनविरोध आमदार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतुल पेठकर | नागपूर

विदर्भाच्या इतिहासात प्रथमच एक उमेदवार विधानसभेत बिनविरोध निवडून येण्याची घटना ३९ वर्षांपूर्वी घडली. त्या अंतर आजतागायत कोणीही बिनविरोध निवडून आलेले नाही. अहेरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पेंटा रामा तलांडे हे उमेदवार बिनविरोध आले होते. 

१९८० च्या निवडणुकीची पार्श्वभूमी थोडी वेगळी होती. जुलै १९७८ मध्ये काँग्रेसचे सरकार पाडून शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही आघाडीचा प्रयोग केला. त्यांच्या साेबत काँग्रेसमधील शंकरराव चव्हाण यांच्यासारखी मातब्बर मंडळी होती. पवार मुख्यमंत्री असलेले पुलोआ सरकार इंदिरा गांधींनी १९८० मध्ये केंद्रात सत्तेवर येताच बरखास्त केले होते. त्यामुळे दोन वर्षातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या. इंदिरा गांधींना सोडून गेलेली अनेक मंडळी पक्षात परत येत होती.

या वेळी पक्षात “७८ चे निष्ठावान’ व “उपरे’, असा वाद उफाळून आला होता. १९७७-७८ मध्ये इंदिरा गांधींच्या संकटकाळात साथ देणारे स्वत:ला “७८ चे निष्ठावान’ म्हणवून घेत होते. १९८० मध्ये परत आलेल्यांना ते उपरे आणि सत्तेसाठी आलेले म्हणत होते. मात्र सुदैवाने १९८० च्या निवडणुकीत हा वाद केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला. १९८० च्या निवडणुकीत  इंदिरा  काँग्रेसने िवदर्भातील ६६ पैकी ५५ जागा जिंकल्या.या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकीत इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. पण, त्यांच्या विजयाची सुरुवात िवदर्भातून झाली हे विशेष!

पेंटा रामा तलांडे हे त्या वेळी युवक काँग्रेसचे एक सामान्य कार्यकर्ते होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. निवडणूक लढवायलाही त्यांच्याजवळ पैसे नव्हते. त्या वेळी अहेरी मतदारसंघात राजे सत्यवान आत्राम नाग विदर्भ आंदोलन समितीतर्फे सिरोंचा येथून उभे होते. त्यांच्याविरोधात इंदिरा काँग्रेसकडून पेंटा रामा तलांडे उभे होते. सिरोंचा मतदारसंघातून राजघराण्यातीलच उमेदवार निवडून येत असे आणि येतो हा इतिहास आहे. निवडणुकीच्या अर्जात राजे सत्यवान आत्राम यांनी जातीच्या रकान्यात आपली जात “राजगोंड’ अशी लिहिली. पण, निवडणूक निर्णय अधिकारी परांजपे यांनी राजगोंड ही जात एसटी प्रवर्गात येत नाही म्हणून राजेंचा अर्ज नाकारला. त्यामुळे पेंटा रामा तलांडे बिनविरोध निवडून आले. इंदिरा गांधींच्या विजयाची सुरुवात िवदर्भातून झाली. तलांडे यांचा विजय त्या वेळी राष्ट्रीय बातमीचा विषय झाले. ही निवडणूक संपूर्ण देशभरात गाजली, अशी आठवण गडचिरोलीतील ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली यांनी सांगितली.

  • पुन्हा कधी आमदार बनले नाही

महाराष्ट्राच्या विधानसभेवर एकदा बिनविरोध निवडून आल्यानंतर पेंटा रामा तलांडे पुढे कधीही आमदार म्हणून निवडून आले नाही. गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे आदिवासींसाठी राखीव आहे. त्यामुळे त्यानंतर ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यांच्या पत्नी सगुणा तलांडे यांनाही विधानसभा निवडणुकीत यश आले नाही. दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या तलांडे यांना मराठी, हिंदी, गोंडी, तेलगू व इंग्रजी भाषा अवगत हाेत्या. क्रिकेट, व्हाॅलीबाॅल व हाॅकी त्यांचे आवडते खेळ होते.

बातम्या आणखी आहेत...