आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भाचे नाना पटोले विधानसभा अध्यक्ष, भाजपकडून किसन कथोरे यांचा अर्ज मागे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : राज्याच्या १४ व्या विधानसभा अध्यक्षपदावर महाराष्ट्र विकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांची बिनविरोध निवड. भाजपाने आपले उमेदवार किसन कथोरे यांचा अर्ज मागे घेतला आहे.  किसन कथोरे भाजपचे ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचे तर नाना पटोले हे विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे काँग्रेस आमदार आहेत.  विधानसभेत ठाकरे सरकारकडे १६९ सदस्यांचे बळ आहेत, तर भाजपला ११४ सदस्यांचा पाठिंबा आहे. ४ सदस्य तटस्थ आहेत. अध्यक्ष निवडणूक जिंकण्यासाठी १४५ सदस्यांचा पाठिंबा हवा आहे. अध्यक्षांची निवड बिनविरोध करण्याची प्रथा आहे. शनिवारी सकाळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. त्यात नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याला दिल्लीहून पक्षश्रेष्ठींची मंजुरी घेण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण हे अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. पण राष्ट्रवादीच्या विरोधामुळे नाना पटोले यांची अखेर वर्णी लागली. सध्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील हंगामी अध्यक्ष आहेत. अध्यक्षाच्या निवडीनंतर ते पदभार सोडतील. अध्यक्षपद मिळाल्यामुळे आघाडी सरकारातील उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार हे स्पष्ट झाले आहे. विधानसभा अध्यक्षपद हे स्थायी व अत्यंत मानाचे असते. सभागृह चालवण्यात व कामकाज करण्यासंदर्भात अध्यक्षाची भूमिका कळीची असते. म्हणून हे पद राष्ट्रवादी काँग्रेसला हवे होते. मात्र, या पदावर काँग्रेसकडून दावा करण्यात येत होता. तसेच अशोक चव्हाण आणि पृथ्वराज चव्हाण यांचे नाव चर्चेत होते. मात्र, अखेरीस नाना पटोले यांचे नाव निश्चित करण्यात आले.

विदर्भाला झुकते माप

नाना पटोले १९९९ ते २०१४ पर्यंत काँग्रेस आमदार होते. २०१४ मध्ये ते भाजप खासदार झाले. मोदींवर नाराज होऊन त्यांनी खासदारकी सोडली. या वेळी त्यांनी मंत्री परिणय फुके यांचा पराभव केला. आमदारकीची त्यांची चौथी टर्म आहे. सध्या ते राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. शेतकरी व कुणबी नेते असलेले पटोले हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक होत.

बातम्या आणखी आहेत...