आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बावनकुळेंच्या उमेदवारीच्या चर्चेला अखेर पूर्णविराम, पत्नी ज्याेती यांच्या नावाची चर्चाही मागे पडली, टेकचंद सावरकर यांच्या गळ्यात माळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमेदवारी नाकारल्यानंतर कोराडी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या गराड्यात निराश बावनकुळे. - Divya Marathi
उमेदवारी नाकारल्यानंतर कोराडी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या गराड्यात निराश बावनकुळे.

नागपूर - क्रिकेटच्या अत्यंत अटीतटीच्या हाय व्होल्टेज सामन्याप्रमाणे कामठी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीबद्दलची उत्कंठा शुक्रवारी शिगेला पोहोचली. दिल्लीतील नेतृत्वाने उमेदवारी नाकारल्याची कल्पना स्वत: मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी मध्यरात्री नागपुरातील एका हॉटेलात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिली. त्यामुळे शुक्रवार उजाडताच बावनकुळे यांच्या जागी कोण? याविषयीची उत्कंठा हाेती. बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती.. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल निधान.. ही नावे चर्चेत आली. मात्र अर्ज दाखल करण्यास केवळ काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना टेकचंद सावरकर हे अनपेक्षित नाव पुढे करून भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पहिल्या तीन याद्यांमध्ये बावनकुळेंचे नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात हाेते. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांसह नागपुरातील सर्व सहा भाजप उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्या वेळीही चर्चा रंगली ती बावनकुळे यांचीच. या गाेंधळात बावनकुळे यांच्या गोटात अस्वस्थता होती. ‘साहेबांचे नाव फायनल झाले.. लवकरच यादीत नाव येणार..’ अशी माहिती त्यांचे समर्थक देत हाेते. मात्र त्यांचीही निराशा झाली. 

  • दिल्लीतून कापले तिकीट

गुरुवारी रात्री फडणवीस नागपुरात दाखल झाले. नागपुरातील एका हॉटेलात मुख्यमंत्री आणि बावनकुळे अशी दोघांचीच बैठक झाली. दिल्लीतून पक्ष नेतृत्वाने तुम्हाला उमेदवारी देण्यास नकार दिल्याचा निरोप मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला. त्याच वेळी बावनकुळे यांना कामठीसाठी तीन संभाव्य उमेदवारांची नावे मागण्यात आली होती, अशी माहिती भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

  • पत्नीने घेतला अर्ज, मात्र त्यांच्या पदरीही निराशाच

दुपारी एक वाजता बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलमध्ये पोहोचल्या. मुख्यमंत्र्यांनी बावनकुळे यांना विदर्भाची जबाबदारी दिल्याने भाजपकडून आपण अर्ज दाखल करत असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र शेवटच्या क्षणी भाजपने टेकचंद सावरकर यांची उमेदवारी पुढे करत या चर्चांना पूर्णविराम दिला. टेकचंद हेच अधिकृत उमेदवार असल्याचे पक्षाकडून सांगितले.