आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीचे ठरू शकणारे भाजप नेते ‘फडणवीस नीती’ने अडगळीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - २०१४ मध्ये एकहाती सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये अनेक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली हाेती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत त्यांच्याकडे ही जबाबदारी साेपवली. मात्र हे पद न मिळाल्याने निराश झालेल्या भाजपमधील काही असंतुष्टांनी फडणवीस यांच्याविराेधी कारवाया सुरू केल्या. मात्र त्याची वेळीच भनक लागल्याने फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांत यापैकी एकेका स्वपक्षीय नेत्याला नामाेहरम केले. विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर फडणवीस यांनी विराेधी पक्षातील अनेक नेत्यांना आपलेसे केले, तर पक्षातील स्पर्धकांची मात्र तिकिटे कापून त्यांना अडगळीत टाकल्याचे दिसून येते.

  • एकनाथ खडसे

विराेधी पक्षनेतेपद गाजवणाऱ्या एकनाथ खडसे यांचा ज्येष्ठतेनुसार मुख्यमंत्रिपदावर दावा होता. परंतु खडसेंनी वेळाेवेळी खंत जाहीरपणे व्यक्त केली हाेती. नंतर त्यांचे भूखंड घाेटाळ्याचे प्रकरण बाहेर निघाले आणि पक्षश्रेष्ठींनी मंत्रिपदावरून पायउतार हाेण्यास सांगितले. क्लीन चिट मिळाल्यानंतरही खडसेंना पुन्हा मंत्रिपद मिळणार नाही याची ‘खबरदारीही’ फडणवीसांनी घेतली. आता तर विधानसभेचे तिकीटही व पुन्हा मंत्रिपद न मिळण्याची ‘साेय’ही करून ठेवण्यात आली.

  • विनाेद तावडे

शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे हे ‘आपणच प्रति मुख्यमंत्री’ या आविर्भावात ते गेली ५ वर्षे वावरले आणि तेथेच त्यांचा घात झाला. सर्वप्रथम बोगस डिग्रीचे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर मुंबै बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले असताना त्याच बँकेतून शिक्षकांना पगार देण्याचे प्रकरण, शाळांमध्ये अग्निशमन यंत्रे आणि फोटो खरेदी घोटाळा बाहेर आला. यानंतर विनोद तावडे यांचा आवाज बंद झाला खरा. नंतर त्यांचे  शिक्षण खातेही काढून घेतले व आता तिकीट कापले.

  • प्रकाश मेहता

अमित शहा यांचे निकटवर्तीय प्रकाश मेहतांकडे गृहनिर्माण मंत्रिपद हाेते. परंतु एका जमीन प्रकरणात त्यांनी फडणवीसांना न सांगताच ‘मुख्यमंत्र्यांना अवगत केले’ असा शेरा फाइलवर मारला. खुद्द मुख्यमंत्र्यांना टेकन फॉर ग्रँटेड घेण्याचा निर्णय त्यांच्या अंगलट आला. या शेऱ्यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले आणि त्यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे मेहता यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. तसेच आता तर उमेदवारीही मिळाली नाही.

  • पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडेंचे भाजपत महत्त्वाचे स्थान हाेते. मंत्रिमंडळात त्यांना ग्रामविकाससारखे महत्त्वाचे खाते मिळाले. मात्र ‘आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असे त्यांनी जाहीर केले अन‌् ते फडणवीसांना खटकले. तेव्हापासून पंकजांचे महत्त्व कमी झाले. त्यांच्याकडील जलसंधारणाचे खाते काढून घेण्यात आले. त्यांच्या खात्यातील घाेटाळे बाहेर आले. मग पंकजांचा आवाज बंद झाला. त्यातच विनायक मेटेंना मुख्यमंत्र्यांनी जवळ केल्याने पंकजा नाराज झाल्या.

  • चंद्रकांत पाटील

अमित शहांचे निकटवर्तीय. भाजपत मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांनंतर पर्यायी नाव. विधानसभेसाठी दादा इच्छुक नव्हते, मात्र मुख्यमंत्र्यांच्या आग्रहास्तव त्यांनी काेथरूड मतदारसंघ निवडला. मात्र आमदार मेधा कुलकर्णींचे तिकीट कापल्याने ब्राह्मण महासंघाने पाटलांना विराेध दर्शवला. विराेधी पक्षांनी एकत्र येत एकच उमेदवार दिला, त्यामुळे दादांसमाेर कडवे आव्हान निर्माण झाले. ते निवडून आले तर ठीक अन‌् पडले तर फडणवीसांचा सुंठीवाचून खोकला जाणार आहे.