आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हर्षवर्धन पाटील, गणेश नाईकांच्या हाती भाजपचा झेंडा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभेला दिलेले आश्वासन राष्ट्रवादीने पूर्ण न केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे बुधवारी मुंबईत एका भव्य कार्यक्रमात शक्तिप्रदर्शन करत भाजपमध्ये प्रवेश केला.  या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता इंदापूरची जागाही आपल्याकडे आल्याचे सांगत एक प्रकारे इंदापूरची उमेदवारी हर्षवर्धन पाटील यांनाच मिळेल, असे संकेत दिले. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत करत पाच वर्षांपूर्वीच भाजपमध्ये आले असते तर बारामतीही जिंकली असती, असे उद्गार काढले. हर्षवर्धन पाटील यांनी आपण कोणत्याही अटीविना भाजपमध्ये प्रवेश करत असून जी जबाबदारी दिली जाईल ती पार पाडू, असे आश्वासन भाजप नेत्यांना दिले. हर्षवर्धन पाटील यांचाच फक्त भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याने त्यांचे शेकडो समर्थक बुधवारी गरवारे क्लब येथे जमा झाले होते. मंचावर हर्षवर्धन पाटील येताच त्यांच्या नावाच्या घोषणांसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजपसाठीही घोषणा देण्यात आल्या.  मुख्यमंत्री म्हणाले, आमच्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. गेल्या ५ वर्षांपासून आम्ही त्यांच्याकडे डोळे लावून बसलो होतो. मात्र, आता त्यांचा योग्य वेळी प्रवेश झाला आहे. भाजप हा एक परिवार असून त्यांच्यासारखा अनुभवी नेता पक्षात आल्याने पक्षाला बळकटी मिळेल. त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांचे बुलेट जॅकेट म्हणून काम केले आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना आमच्या बुलेट ते अडवायचे. या वेळच्या निवडणुकीचा निकाल जनतेने ठरवला आहे. लोकसभेला जनतेने ठरवले होते तसेच झाले. नरेंद्र मोदी यांनी जनतेत विश्वास तयार केला असल्यानेच भाजपकडे ओढा वाढू लागला आहे. जनतेच्या मनात आमच्याबद्दल सकारात्मक भावना आहे. समस्या, आव्हाने आहेत पण हे सरकार न्याय देईल, असा विश्वास जनतेला आहे. त्यामुळेच महायुती भक्कमपणे सत्तेत येईल आणि आता त्यात इंदापूरच्या जागेचा समावेश झाला आहे, असेही ते म्हणाले.

मी काँग्रेससाेबत : अंकिता 
हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांची मुलगी अंकिता विशेषत्वाने उपस्थित होती. अंकिता काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा परिषद सदस्या झालेल्या आहेत. तुम्हीही भाजपमध्ये प्रवेश करणार का, असे विचारता अंकिता यांनी सांगितले, बाबांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि माझ्याबाबत अजून काही निर्णय झाला नाही. मी सध्या काँग्रेसमध्ये आहे.