आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुसफुसलो : रुसण्यात उगीच ते हसणे... खडसेंऐवजी कन्या रोहिणी; बावनकुळे, तावडेंनाही डच्चू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीचा फाॅर्म्युला जाहीर केला. तसेच युतीत सारे काही आलबेल असल्याचा दावा केला. मात्र, प्रत्यक्षात दाेन्ही पक्षांत बंडखाेरीचा पूर आल्याचे दिसते. विद्यमान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विनाेद तावडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह विद्यमान १६ ते १७ आमदारांची तिकिटे भाजपने कापली. यापैकी काहींनी बंडाचा झेंडा हाती घेत आपल्याच पक्षाला आव्हान दिले आहे. दुसरीकडे शिवसेना-भाजपच्या काही नेत्यांनीही एकमेकांच्या उमेदवारांविरुद्ध अपक्ष उमेदवारी दाखल करून दंड थाेपटले आहेत. दरम्यान, ‘बंडखाेरी करणाऱ्यांची गय करणार नाही,’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

नागपूरच्या कामठी मतदारसंघातून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उमेदवारीचा निर्णय अखेरपर्यंत ताणून भाजपने अखेर त्यांचे तिकीट कापले. मंत्री विनोद तावडे बोरिवलीतून इच्छुक होते. परंतु, त्यांनाही घरचा रस्ता दाखवला. एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरमध्ये नाट्यमय घडामाेडीनंतर त्यांची मुलगी राेहिणी यांना अखेरच्या दिवशी उमेदवारी देण्यात आली.  

लातूर ते नाशिक...बंडाचे झेंडे : लातूर ग्रामीणमध्ये उमेदवारी न मिळाल्याने रमेश कराड यांनी बंडखाेरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. तर, मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना तिकीट नाकारून त्यांच्या कन्या राेहिणी यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील त्यांच्याविरुद्ध बंड करत अपक्ष म्हणून मैदानात उतरले. तर, नाशिक पूर्वचे आमदार बाळासाहेब सानप यांचे तिकीट कापून भाजपने राहुल डिकले यांना संधी दिली. त्यामुळे सानप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत थेट उमेदवारी मिळवली.

प्रताेद राज पुराेहित यांनाही घरचा रस्ता : कुलाब्याचे आमदार व प्रताेद राज पुरोहित यांनाही भाजपने शेवटपर्यंत अंधारात ठेवले. त्यांच्या जागी राष्ट्रवादीतून आलेल्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. ‘भाजपमध्ये ज्यांना घ्यायचे त्यांना मीच घेऊन आलो. परंतु नार्वेकर भाजपमध्ये कधी आले मला ठाऊक नाही. आता मी भाजपचे उपरणे त्यांच्या गळ्यात घालतो आणि त्यांना अधिकृतरीत्या भाजपमध्ये घेतो,’ अशी उपरोधिक टीका करत पुराेहित यांनी नाराजी व्यक्त केली. नार्वेकर हे सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. 

माताेश्रीबाहेर दाेन सेना आमदारांचा ठिय्या : वांद्रे पूर्वमधून आमदार तृप्ती सावंत यांच्याएेवजी महापाैर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे नाराज सावंत यांनी मध्यरात्रीच माताेश्रीबाहेर ठाण मांडले हाेते. तसेच भांडुपचे आमदार अशोक पाटील यांचेही तिकीट कापून रमेश कोरगावकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पाटील आणि समर्थकांनी मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. मात्र उद्धव ठाकरेंनी त्याची दखल घेतली नाही. बुलडाण्यातही शिवसेनेचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवारी दाखल केली.

कणकवलीत भाजपच्या राणेंविराेधात शिवसेनेचे सावंत : काल पक्षात आलेल्या नितेश राणे यांना भाजपने कणकवलीतून उमेदवारी दिली. त्यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला. राणेंचे कट्टर समर्थक असलेले सतीश सावंत यांनी नुकतीच राणेंची साथ साेडली. त्यांना शिवसेनेने पक्षात घेऊन राणेंविराेधात उमेदवारी दिली. त्यामुळे राज्यात युती असलेले शिवसेना-भाजप कणकवलीत एकमेकांविराेधात शड्डू ठाेकून उभे आहेत.

  • प्रकाश मेहता समर्थकांनी फाेडली भाजप उमेदवार शहांची गाडी

पैशामुळे तिकीट दिल्याचा आरोप
अनियमिततेच्या आराेपामुळे मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेले प्रकाश मेहता यांची घाटकाेपर पूर्वचे तिकीट कापून मुंबईतील श्रीमंत नगरसेवक पराग शहा यांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज मेहता समर्थकांनी शहा यांची मिरवणूक अडवून त्यांची गाडी फोडली. शहा यांनी मुंबई महापालिका निवडणुकीवेळी आपल्याकडे ६९० कोटींची संपत्ती असल्याचे घोषित केले होते. पैशामुळेच त्यांना उमेदवारी देण्यात आली, असा आराेप मेहता समर्थक करत आहेत.

  • तीन-चार जागा वगळता काँग्रेस मंुंबईत पराभूत होईल : निरुपम

आपण केलेल्या एका उमेदवाराची शिफारस टाळल्याने काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी शुक्रवारी पुन्हा पक्षावर हल्ला चढवला. ते म्हणाले, तिकिटांचे वाटप पाहता मुंबईत ३-४ जागा वगळता सर्वच मतदारसंघांत काँग्रेसची अनामत रक्कम जप्त होईल. काँग्रेसमध्ये षड््यंत्र सुरू असून राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांनाही महत्त्व देण्यात आलेले नाही. आपण पक्षाचा प्रचार करणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

  • सारथ्य कन्येकडे, आता माजी मंत्री एकनाथ खडसे बॅकसीटवर

जळगावात काही वर्षांपूर्वीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ खडसे यांच्या वाहनाचे सारथ्य राेहिणी खडसे यांनी केले हाेते. आता मुक्ताईनगरातून उमेदवारी मिळाल्याने जळगावच्या राजकारणात त्या फ्रंटसीटवर आल्या आहेत, तर खडसे बॅकसीटवर गेले आहेत.

  • दोन ठिकाणी आघाडीचे परस्परांविरुद्ध उमेदवार

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या स्थानिक नेत्यांतही कुरघोडीचे राजकारण रंगले. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसमधून आलेल्या भारत भालकेंना उमेदवारी दिली. विशेष म्हणजे आघाडीत ही जागा काँग्रेसची असल्याने पक्षानेही तेथे शिवाजीराव कलंुगे यांना उमेदवारी दिली. याचा वचपा राष्ट्रवादीने सोलापूर शहर मध्यमध्ये प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध जुबेर बागवान यांना उमेदवारी देऊन काढला.

बातम्या आणखी आहेत...