आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे घेऊन प्रिया दत्तने दिली तिकिटे, राहुल गांधींविरोधात कटकारस्थान - काँग्रेस नेत्यांचा आराेप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसला गटबाजीचे लागलेले ग्रहण विधानसभेच्या ताेंडावर अधिक गडद हाेत आहे. अनेक नेत्यांनी पक्ष साेडल्यामुळे गलितगात्र झालेल्या काँग्रेसमधील नेत्यांना मात्र अजुनही अंतर्गत वादातून फुरसत मिळेनासी झाली आहे. ‘माजी खासदार प्रिया दत्त यांनी कलिनाची उमेदवारी पैसे घेऊन केली. राहुल गांधी यांच्या विरोधातही पक्षात कट सुरु आहे,’ असा खळबळजनक आराेप पक्षातून हाेत आहे. काँग्रेसचे नगरसेवक ब्रायन मिरांडा यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून प्रिया दत्तवर गंभीर आराेप केले. ‘प्रिया दत्त पुन्हा एकदा कलिना विधानसभेचं तिकीट विकण्यात यशस्वी ठरल्या असून त्यांनीच जॉर्ज अब्राहम यांना उमेदवारी मिळवून दिली. सुनील दत्त यांच्या मृत्यूनंतर या कुटुंबाने सन्मान गमावलाय. त्यांच्या भावाच्या (संजय दत्त) कारनाम्यांची तुम्हाला माहिती असेलच. आजही त्याचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत. जेव्हा या गोष्टी समोर येतील तेव्हा तुम्हाला आपल्या निर्णयावर पश्चाताप होईल,’ असेही ब्रायन मिरांडा यांनी पत्रात नमूद केले. प्रिया दत्त आणि त्यांच्यात झालेल्या संभाषणाची ध्वनीफितही माध्यमांकडे प्रसारित केली. दुसरीकडे काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या संजय निरुपम यांनी गुरुवारी पक्षाचा प्रचार करणार नसल्याची भूमिका जाहीर केली. ‘मुंबईच्या तीन-चार जागा सोडल्या तर काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांची अनामत रक्कमही जप्त हाेईल,’ असे भाकितही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन वर्तवले. ‘काँग्रेसमध्ये सिस्टिमॅटिक फॉल्ट झाला असून केवळ माझ्याच नव्हे, खुद्द राहुल गांधी यांच्या विरोधातही कट रचला जात आहे. हे सुरळीत न झाल्यास पक्ष बरबाद होईल. मी सुचवलेल्या उमेदवारांशी खरगे यांनी साधी चर्चाही केली नाही. मुस्लिम मतदार काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करतात. त्यामुळे मुंबईत मुस्लिमांना संधी द्यायला हवी, पण माझे ऐकले नाही,’ असेही ते म्हणाले.

  • आउटगाेईंग वाढले : चाैकशीच्या धास्तीने पक्षांतर

अशी झाली आघाडीत बिघाडी, २० नेत्यांनी घड्याळ काढले

*दिलीप सोपल (बार्शी) *शिवेंद्रराजे भोसले (सातारा) *राहुल नार्वेकर (मुंबई) *नमिता मुंदडा (केज) *उदयनराजे भोसले (सातारा) *गणेश नाईक (नवी मुंबई) *संदीप नाईक (नवी मुंबई) *वैभव पिचड, मधुकर पिचड (अकाेले) *रश्मी बागल (करमाळा) *भास्कर जाधव (गुहागर) *संजय दिना पाटील (भांडूप) *सचिन अहीर (वरळी) *राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद) *अवधूत तटकरे (श्रीवर्धन) *पांडुरंग बरोरा (ठाणे) *जयदत्त क्षीरसागर (बीड) *चित्रा वाघ (मुंबई).

  • ११ नेत्यांनी ‘हात’ सोडला

*हर्षवर्धन पाटील (इंदापूर) *दिलीप माने (सोलापूर) *कालिदास कोळंबकर (नायगाव) *अब्दुल सत्तार (औरंगाबाद) *रवीशेठ पाटील (पेण) *जयकुमार गोरे(माण) *गोपालदास अग्रवाल (गडचिरोली) *निर्मला गावित (इगतपुरी) *कृपाशंकर सिंह (मुंबई) *आनंदराव पाटील (कऱ्हाड) *भारत भालके (पंढरपूर)

  • आघाडीतील गळतीची कारणे :

१. भ्रष्टाचाराची प्रकरणे भाजप सरकारकडून उघड करण्याची भिती. 

२. अडचणीत आलेल्या सूतगिरण्या व साखर कारखाने व त्याच्या कर्जाला राज्य सरकारकडून थकहमीची अपेक्षा

३. स्वपक्षाच्या नेतृत्वावरचा उडालेली विश्वास. 

४. स्वपक्षाने गमावलेला जनाधार व  निवडणुकीत पराभूत होण्याची भीती. 

५. आघाडी निश्चिती व मित्रपक्षाच्या वाट्यास मतदारसंघ 

६. ऊर्जा प्रकल्प, शैक्षणिक संस्था, सूतगिरणी, साखर कारखाने व रिअर इस्टेटचे रखडलेले प्रकल्प, त्याच्या फाईल्स क्लीअर करण्याची मुख्यमंत्र्यांकडून हमी.

७. ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांवर प्रशासक व सल्लागार नेमून फडणवीस सरकारने केलेली अडचण. 

८. मतदारांचे झालेले ध्रुवीकरण, भाजप- शिवसेनेकडे मतदारांचा वाढता काैल, आघाडीतील पक्षांना नाकारण्याचे प्रमाण वाढले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार व खासदारसमान सुमारे ३१ नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम ठाेकला. त्यातील १९ नेते भाजपमध्ये गेले, ११ नेत्यांनी शिवसेनेचे धनुष्य हाती घेतले. काँग्रेसचा १ नेता राष्ट्रवादीत गेला.