आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्ध सहजीवनाची साठवण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘अमलताश’ हे डॉ. सुप्रिया दीक्षित-संत लिखित नितांत सुंदर पुस्तक. दीर्घकाळ मनात रेंगाळणारं. लेखिकेचं हे पहिलंच पुस्तक. पण वाक्यावाक्यातून व्यक्त होणाऱ्या हळुवार तरल भावना, प्रसंगाचं अचूक वर्णन वाचताना आपण संतांच्या कुटुंबाचे सभासद होऊन जातो. सर्व व्यक्ती, प्रसंग, घटना, परिसर लेखिका डोळ्यांपुढे अचूक उभे करते. व्यवसायाने डॉक्टर असूनही सहज, साध्या भाषेत आयुष्यातले प्रसंग शब्दांत गुंफण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.


अमलताश म्हणजे बहावा. लेखिकेने हौसेनं बांधलेल्या आपल्या घराचे नाव अमलताश असे ठेवले आहे. त्या वृक्षाप्रमाणेच रसरशीत पिवळ्याजर्द भरघोस फुलांसारखे सर्वार्थाने जीवन जगलेल्या डॉ. सुप्रिया आणि प्रकाश यांच्या सहजीवनाचे उत्कट वर्णन म्हणजेच हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या पानापानावर लेखिकेसह पती प्रकाश संत, सासूबाई इंदिरा संत आणि त्यांचे कुटुंब येते. लेखिकेने त्या मानाने स्वत:बद्दल खूपच कमी लिहिले आहे. त्यामुळे या पुस्तकाला सरसकट आत्मचरित्र म्हणणे योग्य ठरणार नाही. 


सुधा बाळकृष्णन ओळकर म्हणजेच लेखिका ४-५ वर्षांची असताना वडलांचे घर सोडून आईबरोबर आजोळी बेळगावला आईच्या वकील वडलांकडे, रामराव नळगुंदकरांकडे येते. बेळगावमधलं प्रतिष्ठित, सधन, सर्वार्थाने संपन्न कुटुंब, भरपूर गोतावळा, कडक शिस्तीचे, दरारा असलेले, घरादारावर बारीक लक्ष असलेले आजोबा, आणि त्यांना साथ देणारी देखणी, सुगरण आजी असं हे कुटुंब. वडलांचे घर का सोडावे लागले याबाबत लेखिकेच्या मनात कुतूहल आहे. पण कालांतराने जाणत्या वयात लेखिका त्या भावना मनात बंद करून टाकते. त्याबद्दल कळत्या वयात आईला, परिस्थितीला यापैकी कुणालाच दोष देत नाही. हाही मनाचा मोठेपणात. पितृप्रेमाला पारखी झालेली लेखिका आजी-आजोबा, मामा-मामी, मामेभावंडांच्या प्रेमात रमते. कालांतराने आईला एकटीने काढाव्या लागणाऱ्या आयुष्याबद्दल अंतर्मुख होऊन विचार करते. आईला जास्तीत जास्त सुख देण्याचा विचार करते. आईला असणाऱ्या दम्याच्या त्रासामुळे डॉक्टर होण्याचा निर्णय घेऊन अनेक अडथळ्यांमधून आपले ध्येय गाठून डॉक्टर बनते. 


इंदिरा संत आणि लेखिकेची आई एकाच महाविद्यालयात नोकरीनिमित्त एकत्र येतात. त्यांची मैत्री होते. इंदिरा संतांचा मोठा मुलगा चंदू (प्रकाश संत) सुधाच्याच वयाचा. तो घरी येऊ लागतो. लहान वयातच त्याला असलेली वाचनाची, चित्रकलेची, संगीताची आवड त्या दोघांमधली मैत्री वाढवायला, बहरायला कारणीभूत ठरते. बालवयातली निरागस मैत्री बहरतांना एक धागा समान असतो. चंदूसुद्धा वडलांशिवाय वाढत असतो. वडलांचे टायफॉइडने अकाली निधन झाल्यामुळे आईने म्हणजे इंदिरा संतांंनी नोकरी करून तीन लहान मुलांना वाढवलेले असते. अवघ्या नवव्या वर्षी झालेल्या वडिलांच्या निधनानं चंदूच्या बालमनावर मोठाच आघात केलेला असतो. तो अकाली गंभीर बनलेला असतो. अबोल झालेला असतो. पण वडलांच्या संस्कारांची शिदोरी त्याने जपून ठेवलेली असते. त्याला असलेली स्वच्छतेची, टापटीपेची आवड, त्याचा हळुवार मृदू स्वभाव, अशा चंदूशी सुधाची मैत्री बहरू लागते. चंदू इंग्रजी अभिजात साहित्य, संगीत, चित्रकला याबाबत सुधाच्या ज्ञानात भर घालतो. मुळातच रसिक असलेली सुधा चंदूमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतत जाते. चंदूही सुधाच्या प्रेमात पडतो. दरम्यान, सुधाला वैद्यकीय शिक्षणासाठी बेळगाव सोडून मंुबईला जावे लागते. चंदू पदवीपर्यंतचे शिक्षण बेळगावात घेत असतो. 


लेखिका मुंबईला शिक्षणासाठी आल्यावर तिचे विश्वच बदलते. वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर, वसुमती, शैला, मंजुळा या वर्गमैत्रिणींबरोबर जुळलेले आयुष्यभराचे भावबंध, अभ्यास, रोज  नवे शिकण्याचे नावीन्य, अत्यंत बुद्धिवान शिक्षकांकडून मिळणारे ज्ञानामृत, त्याचा आयुष्यावर पडलेला प्रभाव, वेळात वेळ काढून चंदूशी चाललेला पत्रव्यवहार असे लेखिकेचे आयुष्य सुरू असते. लेखिकेच्या आयुष्यात पत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात प्रियकर-पती म्हणून चंदूला लिहिलेली पत्रे, सासूबाईंना, स्वत:च्या आईला, मुलाला, मुलीला, सून आणि जावयाला तसेच आजोबांना इंग्रजीत लिहिलेली पत्रे प्रत्येक प्रकरणाचा एक सुंदर भागच बनली आहेत. कदाचित मोबाइल सर्वव्यापी झाले नसल्याच्या परिणामी, लेखिकेच्या आयुष्यात पत्रांना असलेले महत्त्व पानापानातून जाणवते. अशाच एका पत्रामधून चंदू आपले प्रेम व्यक्त करतो. सुधाचेही प्रेम असतेच. मात्र, तिचे वैद्यकीय शिक्षणाचे दुसरे सत्र सुरू असते. आपण आताच प्रेमाला होकार दिला तर कडक शिस्तीचे आजोबा आपलं शिक्षण बंद करतील म्हणून घाबरून पत्रातून नकार कळवताना सुधाची झालेली द्विधा मन:स्थिती, नकार कळाल्यावर हळव्या, संवेदनशील मनाच्या चंदूच्या होणाऱ्या मन:स्थितीची कल्पना करून सुधा कोलमडून जाते. अभ्यासात स्वत:ला गुंतवून घेते. दोन वर्षे सुधा-चंदूचा पत्रव्यवहार नसतो. अखेर डॉक्टर झालेली सुधा गावी परत येते. चंदूचे लग्न झालेले नाही याची खात्री करून घेते. आई-आजोबांकडे चंदूबद्दलच्या भावना कळवून त्याच्याशी लग्नाची पत्राद्वारे परवानगी मागते.  सुधाच्या नकाराने खचलेला चंदू, सुधाच्या होकारानं आनंदलेला चंदू आणि पती बनलेला चंदू अशी चंदूची सर्व रूपे हळुवार अमलताशमध्ये उलगडतात. लग्नानंतर वेगवेगळ्या प्रसंगांनी सुधा व चंदूला वेगळे राहावे लागते. त्यामुळे झालेली मानसिक कुचंबणा, त्यातच अकस्मात उद्भवलेले आजारपण, रोजच्या प्रापंचिक विवंचनांमधून मार्ग काढताना कऱ्हाडमधल्या भाड्याच्या घरात बहरलेले सहजीवन, मुला-मुलीच्या जन्मानं दोघांच्या आयुष्यात आलेले सुखद क्षण, त्या मुलांना वाढवताना लाभलेली निसर्गाची साथ, जिऑलॉजी विषयातली प्रकाश संतांची महाविद्यालयातली प्रगती, घरातच थाटलेल्या दवाखान्यात सुधाचा बसलेला जम, असाध्य आजारांमधली एकमेकांची साथ, आयुष्यात भेटलेल्या अनेक नामांकित लेखक-कलाकारांनी घातलेली समृद्ध भर अशा वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक घटनांचा संदर्भ पानोपानी आहे.  आयुष्य बहरत असतानाच नियतीच्या फटकाऱ्यानं डॉ. प्रकाश संतांचा झालेला अपघाती मृत्यू सुधाचे आयुष्य गोठवून टाकतो. एकटेपणाची, प्रकाश आपल्या सोबत नसण्याच्या जाणिवेने बधीर झालेली सुधा हळूहळू जागी होते आणि आठवणींना शब्दरूपात गुंफते, ‘अमलताश’च्या रूपात.

- विद्या आठल्ये, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...