आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या गावंडे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई : 'दिव्य मराठी'च्या औरंगाबाद आवृत्तीतील पत्रकार विद्या विष्णू गावंडे यांना वर्ष २०२० चा कै. त्र्यंबक अासरडाेहकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला अाहे.

कै. त्र्यंबक आसरडोहकर हे पहिल्या पिढीतील ग्रामीण साहित्यिक होते. ते एक अभ्यासू पत्रकार, लेखक व ग्रामीण कथाकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांची स्मृती व कार्य नव्या पिढीसमोर कायम राहावे या विधायक हेतूने हा पुरस्कार अंबाजोगाई येथील आसरडोहकर प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकार व पत्रकारिता क्षेत्रातील युवा प्रतिभांना २०१० पासून दरवर्षी दिला जातो. यंदाच्या नवव्या पुरस्कारासाठी औरंगाबाद येथील दैनिक दिव्य मराठीच्या पत्रकार विद्या विष्णू गावंडे यांची निवड केल्याची माहिती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पत्रकार किरण देशमुख यांनी दिली. प्रिंट मीडियातून सातत्याने ग्रामीण विकासाच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विधायक व सुसंस्कृत पत्रकारितेचा वसा व वारसा त्या जोपासत आहेत. तसेच शिक्षण, महिला सबलीकरण, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रांतील दैनंदिन घडामोडींवर लक्ष वेधून घेणारी विधायक व विकासात्मक पत्रकारिता हा त्यांच्या आवडीचा विषय आहे. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे (मुंबई) यांच्या हस्ते व ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात विद्या गावंडे यांना प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह, रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे आहे, अशी माहिती किरण देशमुख यांनी दिली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...