आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्या गावंडे
समुपदेशनाच्या माध्यमातून किशोरी विकास प्रकल्पाच्या समन्वयक वंदना कसारे यांनी ७० मुलींचे बालविवाह रोखले आहेत. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या दीडशेहून अधिक मुलींना त्यांनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले.
मैं दुल्हन नहीं बन पाऊंगी। हूं अभी बहुत ही छोटी-सी,
बस बच्चा धर्म निभाऊंगी। बचपन के नीले अंबर में,
मुझको भी कुछ दिन उड़ने दो।
मुझको अपने अरमानों की, सीढ़ी को चढ़ने गिनने दो।
या प्रभुदयाल श्रीवास्तव यांच्या ओळींचा आधार घेत त्या बालमनाला समजून घ्या. मुलींचा बालविवाह करू नका... असा संदेश देण्याचे काम शहरातील हडको परिसरात राहणाऱ्या वंदना उत्तम कासारे करत आहेत. मुलींसाठी सुरक्षित वातावरण नाही, हलाखीची परिस्थती, दोन वेळच्या जेवणाचेही जिथे वांधे तिथे पोरींना शिकवायचं कसं? शिकवलं तर तिच्या तोलामोलाचा नवरा आणायचा कसा? अशा प्रश्नांचा काच धरलेले मायबाप रोज आपल्या आसपास दिसतात. पण याच मायबापांना शिक्षणाच महत्त्व पटवून देत कमी वयात होणाऱ्या विवाहाचे परिणामही सांगायला हवेत. म्हणून त्यांच्या मनातील असुरक्षिततेची भावना समुपदेशनाच्या माध्यमातून किशोरी विकास प्रकल्पाच्या समन्वयक वंदना कसारे यांनी ७० मुलींचे बालविवाह रोखले आहेत. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या दीडशेहून अधिक मुलींना त्यांनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले. पण हे काम सोपं नाही. यासाठीची सुरुवातही संघर्षपूर्ण होती. कधी शिवीगाळ तर कधी मनस्तापही सहन करावा लागल्याचे वंदनाताई सांगतात. वंदनाताई या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित डॉ. हेडगेवार रुग्णालयांतर्गत सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या किशोरी विकास प्रकल्पाच्या समन्वयक म्हणून काम करतात. त्यांचे काम प्रामुख्याने ब्रिजवाडी, मिसारवाडी, नारेगाव, सिंधीबन वसाहतींमध्ये चालते. गेल्या दहा वर्षांपासून वंदनाताई या वस्तीमध्ये मुलींना किशोर वयात होणारे बदल, आरोग्य, कमी वयामध्ये होणारे लग्न, कमी वयातील लग्नाचे शारीरिक आणि मानसिक परिणाम याविषयी मार्गदर्शन करतात. चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी स्वत:च्या पायावर उभं राहणंही आवश्यक आहे. इथल्या कुटुंबांना नेहमी प्रोत्साहन देतात. मात्र प्रत्येक वेळी त्यांचे मार्गदर्शन या कुटुंबांना रुचेलच असे नाही. त्यामुळे अनेक व्यसनाधीन कुटुंबप्रमुखांनी त्यांना घरातून हाकलून दिले. आम्ही आमच्या पैशांनी पितो. मुलीला शाळेत पाठवणार नाही. तिच्या लग्नाची आणि सुरक्षेची जबाबदारी घेता का तुम्ही? असे खडे बोलही लोकांनी ऐकवल्याचे वंदनाताई सांगतात. वस्तीमधून फारसा प्रतिसाद मिळत नाही. वारंवार समुपदेशन करावे लागते. या सर्व परिस्थितीवर वंदनाताई म्हणतात, वैयक्तिक आयुष्यानेही मला खूप काही शिकवलं आहे. हा अपमान-संषर्घ पाहून मी थकले नाही, उलट काम करण्याची जिद्द वाढत गेली. हा अपमान सहन करत आज ७० मुलींचे बालविवाह मी रोखू शकले. दीडशे मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले याचे समाधान आहे. पण खूप काम करावे लागणार आहे. शासनाच्या योजना खूप आहेत. मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय लग्नासाठी १८ असावं असं म्हणतात.पण नियम पाळला जात नाही. केवळ ग्रामीणच नाही तर शहरी भागांमध्येही वस्तीच्या ठिकाणी छुप्या पद्धतीने बालविवाह आजही होत आहेत. अठराविश्व दारिद्रय, खाणारे दहा आणि कमावणारा एक, बापाला दारूचं व्यसन, माय रोजमजुरी करणारी. मग घरातलं लहान पोर मुलींनीच सांभाळायचं. मग तिची शाळा बुडली तरी चालेल अशी स्थिती आजही आहे.
या सर्व परिस्थितीत आणखी एक मोठे आव्हान म्हणजे या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे करत वस्तीत वातावरण चांगलं नाही, व्यसनी पोरं दिवसाढवळ्या मुलींना त्रास देतात. मग काय यावर उपाय म्हणून सर्रास मुलींची लग्नं कमी वयात करून दिली जातात. त्यामुळे अनेक कुटुंबांचे केवळ समुपदेशनाच्या माध्यमातून मनपरिवर्तन करून बालविवाह रोखण्याचे काम वंदनाताई करत असून त्यांच्या या कामाने सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
असं होतंय प्रबोधन
प्रत्येक महिन्यात एक विषय घेऊन चर्चा करणे, मुलींना कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, पालकांना भेटणे, किशोरी भेटीतून संवादिनीताईच्या माध्यमतून वंदनाताई या किशोरी तसेच युवतींचे आरोग्य, शिक्षणासाठी काम करत आहेत. वस्तीतील प्रत्येक मुलगी ही किमान बारावी शिकावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी डॉ. दिवाकर कुलकर्णी, सविता कुलकर्णी, वर्षा पाटील, डॉ. प्रसन्न पाटील, डॉ. प्रतिभा फाटक, डॉ. प्रसाद वायकर, डॉ. संदीप डाफळे यांचे सहकार्य मिळते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.