आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरवाडीची शाळा आणि विद्यार्थ्यांचे रूप लवकरच पालटणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळाली प्रवरा- राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ठाकरवाडी (पुनोबाचीवाडी) प्राथमिक शाळेत नव्याने बदली झालेल्या शिक्षक द्वयींनी अतिदुर्गम भागातील या शाळेचे रुप पालटून टाकले आहे. लवकरच ही शाळा डिजिटल करण्याचा संकल्प शिक्षक व पालकांनी केला आहे. 


ठाकरवाडीला बदली म्हटले की, शिक्षकांच्या अंगावर काटा येत असे. तथापि, या अतिदुर्गम भागातसुद्धा चांगले काम करता येते, असा विश्वास दत्तात्रय डोईफोडे व वैशाली खरमाळे या शिक्षकांनी निर्माण केला आहे. पन्नास वर्षांच्या इतिहासात या शाळेवर प्रथमच महिलेची नेमणूक झाली. 


ठाकरवाडी, वावरथहून राहुरीला येण्यासाठी मुळा धरण ओलांडावे लागते. नदीच्या काठावर तासभर होडीची वाट पहावी लागते. अर्धा तास पाण्यातून प्रवास केल्यानंतर पंधरा किलोमीटर दुचाकी किंवा पायी चालत राहुरी गाठावी लागते. संध्याकाळी सातनंतर होडी बंद होते. उशीर झाला, तर सकाळ होण्याची वाट पहाणे हाच पर्याय. या वाडीवरील जिल्हा परिषद शाळेत दत्तात्रय डोईफोडे व वैशाली खरमाळे हे शिक्षक बदलून आले आणि बदलला सुरुवात झाली. या शाळेत ४२ विद्यार्थी आहेत. शिक्षकांनी त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. पहिल्याच बैठकीत पालक-शिक्षक मिळून शाळा विकास निधीसाठी २६ हजारांची रक्कम जमा झाली. या रकमेबरोबरच पालकांनी एक लॅपटॉप शाळेला भेट दिला. 


पालकांचा चांगला प्रतिसाद बघून शिक्षकांनी योगदान देत शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला. दैनिक दिव्य मराठीशी बोलताना शिक्षिका खरमाळे म्हणाल्या, हा अतिदुर्गम भाग आहे. येथे आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. येथील विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता अत्यंत उत्तम असून सर्वजण विनयशील आहेत. मोठ्या गावांशी संपर्क नसल्याने ते अनोळखी व्यक्तीशी खूपच कमी बोलतात. त्यामुळे नवीन व्यक्तीला ते अबोल, अप्रगत वाटतात. ठाकरवाडी हेच त्यांचे विश्व आहे. बाहेरच्या जगाशी संपर्क होण्यासाठी लहान शैक्षणिक सहल काढली. या हुशार व चुणचुणीत मुलांसाठी नवनवीन उपक्रम शाळेत राबवण्यात येणारं आहेत. 


नुकताच या शाळेच्या इमारतीला रंग देण्यात आला. पुनोबाची वाडी ही शिक्षणाच्या बाबतीत पुण्यवाडी व्हावी, त्यासाठी आम्ही पालक या नात्याने सर्व कष्टाची कामे करू असे नामदेव जाधव व मंगेश जाधव या पालकांनी सांगितले. 


बोलक्या भिंती व शाळा सजावटीसाठी राहुरी तालुका कलाध्यापक संघाचे सर्व सदस्य सुटीत दोन दिवस वेळ देऊन रंगरंगोटी करून देणार असल्याचे संघाचे अध्यक्ष विशाल तागड, उपाध्यक्ष अर्जुन करपे, तसेच कला शिक्षक बाळासाहेब पाचरणे, सतीश तेलोरे, देविदास जगधने, सुनील भुजाडी यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...