आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माल्ल्याचा गौप्यस्फोट:देश सोडण्याआधी जेटलींना भेटलो, सेटलमेंटसाठी प्रस्तावही दिला होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन/ नवी दिल्ली- फरार मद्य व्यावसायिक विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणप्रकरणी लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने बुधवारी निकाल राखून ठेवला. मल्ल्याचे प्रत्यार्पण होणार किंवा नाही याचा निकाल १० डिसेंबरला कोर्ट देईल. दरम्यान, मल्ल्या याने केलेल्या नव्या दाव्यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे. बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून देश सोडून जाण्यापूर्वी आपण तडजोडीसाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती, असे मल्ल्या याने म्हटले आहे. मात्र, हा दावा जेटली यांनी खोडून काढला. हे वक्तव्य अर्धसत्य असल्याचे सांगून “मी मल्ल्यास भेटीसाठी वेळच दिला नव्हता’, असे जेटली म्हणाले. विजय मल्ल्या खासदार असल्याने त्याने या पदाचा दुरुपयोग करून भेटण्याचा प्रयत्न केला होता, असे जेटली यांनी म्हटले आहे.


प्रत्यार्पण प्रकरणात सुनावणीसाठी ब्रिटनमध्ये कोर्टात हजर राहण्यास गेलेल्या मल्ल्यास पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला होता. देश सोडून जाण्यापूर्वी तडजोडीचे काही संकेत मिळाले होते का, या प्रश्नावर मल्ल्या म्हणाला, ‘मला जिनिव्हात एका बैठकीसाठी जावयाचे होते. तेव्हा रवाना होण्यापूर्वी मी अर्थमंत्र्यांना भेटलो. बँकांच्या थकीत कर्ज प्रकरणात तडजोडीचा प्रस्ताव मी दुसऱ्यांदा ठेवला. हेच सत्य आहे.’ अर्थमंत्र्यांच्या या भेटीबाबत सविस्तर सांगण्यास मात्र मल्ल्या याने नकार दिला. २०१६ मध्ये विजय मल्ल्या भारतातून पळाला. तेव्हा जेटली अर्थमंत्री होते.


मल्ल्या म्हणाला, “मला या प्रकरणात बळीचा बकरा केले आहे. दोन्ही राजकीय पक्षांना मी नको आहे. कर्जाची तडजोड करण्यासाठी मी १५ हजार कोटी रुपयांची माझी मालमत्ता-संपत्ती कर्नाटक हायकोर्टात दाखवली होती.’ कर्जफेडीसाठी मी केलेल्या प्रयत्नांना बँकांनी मदत का केली नाही, हे बँकांनाच विचारा, असेही माल्याने पत्रकारांना सांगितले.


मल्ल्याने कधीच भेट घेतली नाही
मल्ल्याने केलेल्या दाव्यावर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फेसबुक ब्लॉगवर खुलासा केला. भेटीसाठी मी मल्ल्याला कधीच वेळ दिला नव्हता, असे स्पष्ट करून मल्ल्याचे हे वक्तव्य धादांत खोटे आहे. २०१४ पासून आजवर मल्ल्याने कधीच माझ्या भेटीची वेळ मागितलेली नाही. त्यामुळे त्याला भेटण्याचा प्रश्नच उद््भवत नाही,  असे जेटलींनी म्हटले आहे.


९ हजार कोटींची बँकांची फसवणूक
बँकांची फसवणूक केल्याचे प्रकरण उजेडात आल्यानंतर विजय मल्ल्या भारत सोडून ब्रिटनमध्ये पळाला. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याच्या प्रत्यार्पणासंबंधी वॉरंट बजावण्यात आल्यानंतर ६२ वर्षीय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये जामिनावर आहे. भारतीय बँकांची सुमारे ९ हजार काेटी रुपयांची फसवणूक केल्याचा आणि मनी लाँडरिंगचा आरोप मल्ल्यावर आहे.


मल्ल्यास देश सोडण्याची परवानगी कशी मिळाली - काँग्रेस
अरुण जेटलींची भेट घेतल्याचा दावा करणाऱ्या मल्ल्या यास देश सोडून जाण्याची परवानगी मिळालीच कशी, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केला. जेटली-मल्ल्या भेटीत नेमके काय शिजले, हे देश जाणून घेऊ इच्छित आहे, असे ते म्हणाले.


... मग नेमके घडले काय?
जेटली म्हणतात, मल्ल्या राज्यसभेत खासदार होते. कधीतरी सभागृहात येत. या संधीचा त्यांनी गैरवापर केला. मी सभागृहाबाहेर पडताच एकदा ते माझ्यासोबत चालू लागले. आपण तडजोडीसाठी तयार असल्याचे सांगू लागले. माझ्याशी चर्चा करून फायदा नाही, असे मी त्यांना बजावले. बँकांसमोर ही तडजोड करा, असा सल्लाही दिला. मी ती कागदपत्रेही घेतली नाहीत.


तुरुंगाचा व्हिडिओ दाखवला
प्रत्यार्पणानंतर विजय मल्ल्या यास जेथे ठेवले जाईल त्या आर्थर रोड तुरुंगाचा व्हिडिओ भारतीय अधिकाऱ्यांनी वेस्टमिन्स्टर कोर्टात दाखवला. प्रत्यार्पणानंतर त्याला १२ क्रमांकाच्या बराकीत ठेवले जाणार आहे. प्रत्यार्पणाचे वॉरंट बजावल्यानंतर मल्ल्या याने युक्तिवाद करताना भारतीय तुरुंगांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचा युक्तिवाद ब्रिटनच्या कोर्टात केला होता.

 

बातम्या आणखी आहेत...