आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूल शाळेत टिकावं म्हणून...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहान मुलं शाळेच्या पहिल्या दिवशी रडतात. गोंधळ करतात. वर्गात बसायची त्यांची इच्छा नसते. मुलांना शाळेची गोडी लागावी, ते शाळेत टिकून राहावेत म्हणून हल्ली शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांचं स्वागत केलं जातं. त्याबद्दल सांगताहेत पालघरचे आपले शिक्षक वाचक.

 

मोठ्या उन्हाळी सुट्यांनंतर १७ जूनपासून राज्यातल्या सर्व शाळा सुरू झाल्या. महिनाभर ओस असलेले शाळांचे आवार पुन्हा बालगोपाळांच्या किलबिलाटाने गजबजून गेले आहे. यात पहिलीत प्रवेश घेतलेले, घर सोडून पहिल्यांदाच शाळेत येणारे बालगोपाळदेखील आहेत. कुटुंबासोबत आणि परिसरात वावरणारे हे चिमुकले जेव्हा पहिल्यांदाच शाळेत दाखल होतात तेव्हा कावरेबावरे झालेले असतात. नवख्या परिसरात या नवख्यांचं रडणं, ओरडणं सुरू असतं.  मुलांना शिक्षणाची आणि शाळेची गोडी लागण्याच्या दृष्टीनं शाळेचा हा पहिला दिवस खूप महत्त्वाचा असतो. मुलांना शाळा आवडली नाही, त्यांचं मन रमलं नाही, शाळा घरासारखी वाटली नाही तर त्यांच्यात शाळा - शिक्षक यांच्याबद्दल भीती व अनास्था निर्माण होते. मुलं शाळेत येण्यास टाळाटाळ करतात. परिणामी काही मुले शिक्षण व्यवस्थेपासून कायमची दुरावतात. 


मात्र, असे होऊ नये यासाठी राज्यातील सर्व शाळांमधे पहिल्या दिवसापासून विविध उपक्रम राबवले जातात. नवागतांचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाते. सजवलेल्या बैलगाड्या, चारचाकी वा फेरीच्या माध्यमातून मुलांची गावभर मिरवणूक काढली जाते. पुष्पहार, औक्षण, खाऊ देऊन मुलांचे मोठ्या आनंदात स्वागत केले जाते. पाहिला दिवस असा आनंदात पार पडल्यावर मुलांची शाळेबद्दलची, शिक्षकांबद्दलची भीती कमी होते. मात्र, ही मुले रोज शरीराने व मनाने शाळेत उपस्थित राहावीत म्हणून नवीन मुलांसाठी विविध उपक्रम राबवावे लागतात, तरच ती शाळेत टिकतात आणि शिकतात. पालघर जिल्ह्यातदेखील अशा नवीन दाखल मुलांसाठी त्यांचे बाल मानसशास्त्र व बोलीभाषा लक्षात घेऊन विविध उपक्रम राबवले जातात. जिल्ह्यात बहुतांश मुलांची आदिवासी बोलीभाषा आहे. त्यांना प्रमाण भाषेचा अधिक परिचय नसल्याने मुलांना सुरुवातीचे काही महिने त्यांच्या बोलीभाषेतून शिक्षण दिले जाते. त्यामुळे घरची व शाळेची भाषा वेगळी नसून एकच आहे ही भावना मुलांच्या मनात निर्माण होते. ती बोलीभाषेकडून प्रमाण भाषेकडे जाऊ शकतात. नवागत मुलांच्या बोलीभाषेचा स्वीकार शिक्षकांकडून केला गेल्यास मुलांना शाळेत आत्मविश्वास वाटतो.  मुलांना गाणी गोष्टी नाचून, गाऊन ऐकवल्या जातात. सुरुवातीलाच मुलांवर शिक्षणाचा जास्त ताण येऊ नये, ते कृतिशील राहावेत, त्यांना आळस येऊ नये यासाठी सांघिक, वैयक्तिक खेळ व कृती घेतल्या जातात. हळूहळू मूल शाळेत रुळते. रमते. मूल शाळेत रुळण्यासाठी पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन सदस्य यांचे एकत्रित प्रयत्न लाभले की अशा शाळांची पटसंख्या व गुणवत्ता वृद्धिंगत होते. 

बातम्या आणखी आहेत...