आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्ट सुखी संसाराची

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याजवळ काय आहे याचा नेहमी विचार केला पाहिजे. आपल्या परिस्थितीचा विचार करून एकमेकांना समजून संसार चालवला म्हणजे मन दुःखी होऊन त्रास होत नाही.

 

मागच्या शनिवारी आम्ही डीमार्टला गेलो. महिन्याच्या ज्या काही जिन्नस लागतात त्या घेण्याकरिता.
मी सर्व वस्तू घेऊन बिलाची रक्कम अदा करून चेक आऊट करून बाहेर निघालो. सामान जास्त होते व माझ्याकडे पिशवी नव्हती म्हणून मी कार्टमध्ये वस्तू घेऊन बाजूला बाहेर उभा होतो. तेवढ्यात एक जोडपं चेक आऊट करून नुकतंच बाहेर आलं होतं. त्यांच्या लग्नाला अंदाजे २-३ वर्षं झाली असतील. मी बाहेर असाच कार्ट घेऊन उभा होतो.  त्यांच्यामधील संवाद मला ऐकू आला. 
ती- “आज ना आपण बाहेर जेवण करू.”
तो- “नाही, सध्या आपलं बजेट नाही.” 
आणि तो बोलतो न बोलतो तोच एका झटक्यात तिचा चेहरा हिरमुसून गेला. सायंकाळी सूर्यफुलाने जसा चेहरा खाली टाकावा अगदी त्याच प्रकारे तिचा चेहरा झाला होता. त्याला कदाचित तिच्या हिरमुसण्याचा अंदाज आला.  खिशातून काही मोजके पैसे काढत, चल, आपण खाली आइस्क्रीम खाऊ, असं म्हणत तो तिला घेऊन गेला, तसा तिचा पडलेला चेहरा, सकाळचे ऊन सूर्यफुलावर पडावे आणि त्या फुलाने पुन्हा उमलून आनंदाने डोलावे तसा झाला. मी त्यांच्याकडे काही वेळ बघत राहिलो. जीवन जगणे किती सहज असते. एका क्षणात आलेली मरगळ, हिरमुसणं झटकून पुन्हा आनंदी होणं इतकं सोपं असतं हे त्या दिवशी कळलं. एकमेकांना समजून घेतले तर सहज संसार रथ चालवला जाऊ शकतो. असं म्हणतात, तुझ्या-माझ्या संसाराला आणि काय हवं.. एकमेकांनी एकमेकांना समजून घेतले तर संसारातील गोडवा इतर गोष्टींची कमतरता असली तरी टिकून राहतो. आपलं बजेट पाहून खर्च करणारा हिशेबी नवरा आणि आपली छोटीशी इच्छा पूर्ण न झाल्याने थोडीशी नाराजी व्यक्त करणारी पत्नी, तिला समजून घेणारा समजूतदार पती, आइस्क्रीमवर वेळ भागवून आपली इच्छा मारणारी तेवढ्याच मोठ्या दिलाची पत्नी. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद उपभोगता आला पाहिजे. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून दुःखी न होता, आपल्याजवळ काय आहे याचा नेहमी विचार केला पाहिजे. आपल्या परिस्थितीचा विचार करून एकमेकांना समजून संसार चालवावा. म्हणजे मन दुःखी होऊन त्रास होणार नाही.
 

बातम्या आणखी आहेत...