आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखेंपाठाेपाठ रणजित माेहितेही भाजपच्या गळाला; आज प्रवेश, माढ्यातून मिळणार भाजपची उमेदवारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज । डॉ. सुजय विखे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन काँग्रेसला माेठा धक्का देणाऱ्या भाजपने आता राष्ट्रवादी काँग्रेसलाही पश्चिम महाराष्ट्रात माेठा हादरा दिला. पक्षाचे विद्यमान खासदार विजयसिंह माेहिते यांचे पुत्र तथा राष्ट्रवादीचे सरचिटणीस रणजितसिंह यांना बुधवारी भाजपत प्रवेश दिला जात आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम हाेईल. माढा (जि. साेलापूर) मतदारसंघातून त्यांना उमेदवारीही मिळणार आहे. 


२०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत माेदी लाट असतानाही विजयसिंह माेहितेंनी माढा मतदारसंघात पक्षाला प्रतिनिधित्व मिळवून दिले हाेते. मात्र गेल्या ५ वर्षांत पक्षाने त्यांना अडगळीत टाकले. त्यातच आताच्या लाेकसभा निवडणुकीत स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी रिंगणात उतरण्याची घाेषणा करून माढा मतदारसंघाची निवड केली. मात्र माेहिते पाटील समर्थकांच्या प्रचंड विराेधामुळे व घराणेशाहीच्या आराेपामुळे शरद पवारांनी माघारीचा निर्णय घेतला. तरीही या मतदारसंघात माेहितेंना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत शंकाच हाेती. त्यामुळे विजयसिंह यांचे पुत्र रणजित माेहिते यांनी थेट भाजपचा पर्याय निवडला. आपणही भाजपमध्ये जाणार का, या प्रश्नावर खासदार विजयसिंह म्हणाले, 'रणजितसिंह यांची जी भूमिका आहे त्याला माझे समर्थन आहे, याचा अर्थ समजून घ्यावा.' 

 

गिरीश महाजनांशी चर्चेनंतर निर्णयावर शिक्कामाेर्तब 
रणजित माेहिते पाटील यांनी गेल्या ८ दिवसांत भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याशी दाेन वेळा गाठीभेठी करून भाजप प्रवेशाचा निर्णय पक्का केला. साेमवारी रात्री मुंबईत झालेल्या चर्चेत त्यावर शिक्कामाेर्तब करण्यात आले. त्यानंतर विजयसिंह माेहिते पाटील व रणजित माेहिते पाटील यांनी मंगळवारी अकलूजमध्ये समर्थकांची मते जाणून घेण्याची आैपचारिकताही पूर्ण केली आणि समर्थकांच्या आग्रहाखातर आता आपण भाजपच्या वाटेने जाणार असल्याचे स्वत: रणजित माेहितेंनी जाहीर केले. 

 

राजीनाम्याच्या चर्चेचे राधाकृष्ण विखेंकडून खंडन 
काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे -पाटील यांचा मुलगा डाॅ. सुजय यांच्या भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात मंगळवारी दिल्लीत चर्चा झाली. आघाडीत लोकसभेच्या ५ मतदारसंघांची अदलाबदलबाबतही त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, विखेंनी विराेधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे साेपवल्याची माध्यमांमधून चर्चा हाेती. मात्र स्वत: विखे पाटील यांनी या वृत्ताचे खंडन केले. 

 

आणखी पाच-सहा नेते संपर्कात : गिरीश महाजन 
लोकसभा निवडणुकीच्या ताेंडावर पक्षप्रवेशाचे साेहळे सुरू झाले आहेत. आणखी पाच ते सहा माेठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. लाेकांचा भाजपवरील विश्वास वाढला आहे. तरुण, नवीन पिढी भाजपत येत असून त्यांचा काँग्रेस व राष्ट्रवादीवरील विश्वास कमी झाला आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले. 


बारामतीकरांवर राेष 
आजवर आमच्याच पक्षाने कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेची थट्टा केली. भाजप सरकारने मात्र ही याेजना यशस्वी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळेच आपण भाजपत प्रवेश करत आहाेत, असे रणजितसिंह म्हणाले. बारामतीकरांनी आपली खूप हेळसांड केली त्यामुळे आता निर्णयापासून मागे हटू नका, असा त्यांच्या समर्थकांचा सूर हाेता. 

बातम्या आणखी आहेत...