आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय बांगर यांची सुट्टी, विक्रम राठोड असतील भारतीय संघाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- माजी सलामीवीर फलंदाज विक्रम राठोड यांना संजय बांगर यांच्या जागेवर भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नेमण्यात आले आहे. त्यांच्यासोबतच भरत अरुण आणि आर श्रीधर अनुक्रमे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्त्वातील समितीने या पदांसाठी प्रत्येकी तीन-तीन नावांची शिफारस केली होती आणि सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ज्या प्रशिक्षकाचे नाव वरच्या स्थानावर होते, त्याची निवड करण्यात आली.
 
विक्रम राठोड यांच्याकडे पुरेसा अनुभव असून बीसीसीआयला त्यांच्या कौशल्यावर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी दिली. निवडसमितीच्या शिफारशीनुसार संजय बांगर दुसऱ्या आणि इंग्लंडचे माजी फलंदाज मार्क रामप्रकाश तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतीय संघ व्यवस्थापनाचे स्वतःचे एक मत होते, पण आम्हाला नव्या सहाय्यक स्टाफची आणि नव्या चेहऱ्यांची आवश्यकता वाटली, असेही जोहरी यांनी सांगितले. मुंबई इंडियन्सचे माजी फिजिओ नितीन पटेल यांना पुन्हा एकदा भारतीय संघाचे फिजिओ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. ते यापूर्वी 2011 मध्ये या पदावर होते. इंग्लंडचे ल्यूक वुडलहाऊस यांना अनुकूलन प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विद्यमान प्रशासकीय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांची सुट्टी निश्चित आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन त्यांना महागात पडले. सुब्रमण्यम यांच्या जागी गिरीश डोंगरी यांना हे पद देण्यात आले आहे.

विक्रम राठोड यांचा परिचय?
विक्रम राठोड(50) हे भारताकडून 1996 मध्ये 6 कसोटी सामने आणि 7 वन डे सामने खेळले आहेत. त्यांना या सामन्यात काही खास कामगिरी केली नसली, तरी रणजी क्रिकेटमध्ये त्यांनी पंजाबकडून चांगली कामगिरी केली होती. ते काही वर्षांपूर्वी म्हणजे 2016 पर्यंत संदीप पाटील यांच्या नेतृत्त्वातील बीसीसीआयच्या निवड समितीचे सदस्यही होते. यापूर्वी राठोड यांनी एनसीए फलंदाजी सहाय्यक आणि अंडर 19 फलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता, पण तो अर्ज राखून ठेवण्यात आला.